You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
स्वीडनहून सुरतला आलेल्या किरणला आई भेटलीच नाही, पण...
- Author, शैली भट्ट
- Role, बीबीसी प्रतिनिधी
किरण स्वीडनमध्ये आणि त्यांच्या आई भारतात. त्या कुठे आहेत, कशा आहेत ठाऊक नाही. त्या जिवंत आहेत की नाही हेही ठाऊक नाही. पण किरण यांचा जन्मदात्रीचा शोध सुरूच आहे.
नयनरम्य स्वीडनच्या पर्वतराजींच्या कुशीत वसलेल्या घरात किरण गुस्ताफसोन आपल्या भावंडांबरोबर खेळत असते. लहान बहीण एलन आणि भाऊ बियोर्न या भावंडांचं गुळपीठ जास्त असल्याचं किरणच्या लक्षात आलं.
अतिशय प्रेमळ आणि काळजी घेणारे आईवडील किरणच्या नशिबात होते. सगळ्या सुखसोयी आपल्या मुलीला मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील असत. मात्र तरी किरणला कसली तरी उणीव भासत होती.
स्वीडनपासून खूप दूर असलेल्या भारत नावाच्या देशातल्या गुजरात राज्यातल्या सूरतमधून तुला आम्ही दत्तक घेतलं आहे, असं किरणच्या आईवडिलांनी तिला सांगितलं.
दत्तक म्हणजे काय? हे कळण्याचं तिचं वयही नव्हतं.
"मी तीन वर्षांची असताना स्वीडनला गेले. भारताविषयी मला काहीही आठवत नाही. स्वीडनच्या एअरपोर्टवर मला आईबाबा भेटले. तो दिवस होता 14 मार्च 1988. एक वकील आणि त्यांची पत्नी स्वीडनपर्यंत माझ्याबरोबर होते. कोर्टात दत्तक घेण्याबाबत सगळी कार्यवाही त्यांनीच पूर्ण केली होती. आम्ही गोथेनबर्गच्या लँडव्हेटर एअरपोर्टच्या दिशेनं निघालो. तिथे पहिल्यांदा माझी आईवडिलांची भेट झाली," असं किरण यांनी स्वीडनहून बीबीसीशी बोलताना सांगितलं.
किरण यांचं बालपण सुखाचं होतं. मला कधीही परक्यासारखं वाटलं नाही असं किरण सांगतात. किरण यांच्या आई मारिया वरनॅन्ट या निवृत्त शिक्षिका आहेत तर वडील चेल ओक्या गुस्ताफसोन हे उद्योगपती आहेत. याव्यतिरिक्त ते फोटोग्राफीही करतात.
"माझ्या पालकांनी कधीच परक्यासारखं वागवलं नाही. तू जशी आहेस तशीच रहा असे ते मला सांगत. त्यांनी मला काहीही कमी पडू दिलं नाही," असं किरण यांनी सांगितलं.
मात्र तरी किरण यांना आईवडिलांशी जिव्हाळा वाटत नसे. आपल्या आयुष्यात काहीतरी रितेपण आहे अशी जाणीव त्यांना होत असे. गेल्या दोन वर्षात हे उणेपण आणखी तीव्र झालं.
आणि शोध सुरू झाला
आपले खरे आईवडील कोण हा अनुत्तरित प्रश्न किरण यांना अस्वस्थ करत असे. याच प्रश्नाच्या उत्तरासाठी किरण यांनी 2000मध्ये स्वीडनमधील आपल्या पालकांसह सुरत गाठलं.
किरणनं जन्मदात्या पालकांचा शोध घ्यावा यासाठी स्वीडनच्या या पालकांचा तिला पाठिंबा होता.
हिऱ्यांचं शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुरत शहरातल्या रेसकोर्स रस्त्यावरच्या नारी संरक्षण गृहाला भेट दिली. याच ठिकाणाहून स्वीडनच्या दांपत्यानं किरणला दत्तक घेतलं होतं.
माझं मूळ समजून घेण्यासाठी स्वीडनच्या आईवडिलांनी सुरतवारी केली. पाच वर्षांनंतर किरण पुन्हा सुरत शहरात होत्या. यावेळी निमित्त होतं सोशॉलॉजी आणि ह्यूमन राइट्स विषयांच्या अभ्यासाचं.
नारी संरक्षण गृहाकडून म्हणावी तशी मदत न मिळाल्यानं किरण यांच्यासमोरचे प्रश्न कमी होण्याऐवजी वाढतच गेले. स्वीडनला परतल्यानंतर किरण यांनी आपल्याला दत्तक कोणी दिलं याविषयी कसून शोध घेतला. नारी संरक्षण गृहाविषयी सविस्तर माहिती घेतली. 2010 मध्ये किरण यांनी आपल्या जन्मदात्या आईचा शोध घ्यायला सुरुवात केली. पण सुरुवात कुठून करावी त्यांना कळेना.
स्वीडनमधल्या पालकांना याबाबत काही वावगं वाटलं नाही. आम्हाला तुझा अभिमान आहे आणि आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे असं ते किरण यांना सांगत असत.
जसा काळ पुढे जात होता तसा आईचा शोध घेण्याचा विचार मागे पडला. मात्र आईला भेटण्याची किरण यांची ओढ तीव्र होती.
शिक्षण पूर्ण झाल्यावर किरण स्वीडनमधील एका कंपनीत करिअर काऊंसेलर झाल्या.
दोन वर्षांपूर्वी कोपनहेगन येथे आयोजित अरुण डोहले यांच्या व्याख्यानास किरण गेल्या होत्या. लहान मुलांची तस्करीविरोधात काम करणाऱ्या नेदरलँड्सस्थित एका स्वयंसेवी संस्थेचे डोहले सहसंस्थापक आहेत.
भारतात जन्म झालेल्या अरुण यांना एका जर्मन दांपत्यानं दत्तक घेतलं.
लहान मुलांचे हक्क आणि शोषणाविरोधात काम करणाऱ्या अरूण यांनी पालकांचा शोध घेणं शक्य असल्याचं किरण यांना सांगितलं. जन्मदात्या आईचा शोध घेण्यासाठी अरुण यांना प्रचंड कायदेशीर लढा द्यावा लागला.
किरण यांनाही जन्मदात्या आईचा शोध घ्यायचा होताच. अरुण यांना भेटल्यावर किरण यांचा निग्रह पक्का झाला. काय प्रक्रिया करावी लागेल हे जाणून घेण्यासाठी त्यांनी अरूण यांच्याशी संपर्क केला. अरूण यांनी किरण यांची ओळख लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अंजली पवार यांच्याशी करून दिली. अंजली पुण्यात कार्यरत आहेत. लहान मुलांच्या तस्करीविरोधात काम करणाऱ्या ACT या नेदरलँडमधील संस्थेच्या त्या सल्लागार आहेत.
भारतभेटीचा धक्का
किरण यांच्याशी बोलणं झाल्यानंतर अंजली यांनी सुरत इथल्या अनाथालयाशी संपर्क साधला. मात्र सुरुवातीला त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.
"मी त्यांना CARA (सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स ऑथॉरिटी) विषयी सांगितलं. याअंतर्गत जन्मदात्यांविषयी माहिती मिळणं मुलांचा अधिकार आहे. कागदपत्रांनुसार किरण एक वर्ष आणि 11 महिन्यांची असताना सोडून गेल्या. मात्र त्यानंतर त्या किरणला भेटत होत्या. किरण यांना दत्तक घेतल्याचं त्यांना कळलं होतं. म्हणूनच त्यांनी आपल्या ऑफिसचा पत्ता अनाथालयाला दिला होता," असं अंजली यांनी सांगितलं.
किरण यांच्या आईचं नाव सिंधू गोस्वामी असल्याचं अंजली यांना कळलं. सुरत शहरातच त्या धुणीभांड्यांचं काम करत असत. सिंधू यांनी अनाथालयाला पत्ता दिला होता. अंजली यांनी त्याठिकाणाला भेट दिली. पण सिंधू यांची भेट होऊ शकली नाही.
दरम्यान, किरण यांनी आणखी एक भारतवारी केली आणि यावेळी त्यांच्यासोबत एक मित्रही होता. त्यांची जन्मदात्री आई ज्यांच्या घरी काम करत असत त्या सगळ्यांना किरण भेटल्या.
स्थानिक प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या दबावानंतर त्या लोकांनी किरणच्या आईबाबत थोडी माहिती सांगितली. मात्र जन्मदात्या आईपर्यंत पोहोचण्यासाठी एवढी माहिती पुरेशी नव्हती. सिंधू कुठे राहतात किंवा आता त्या जिवंत आहेत का याविषयी कोणाही ठामपणे काहीही सांगू शकलं नाही.
आईचा शोध घेण्याची मोहीम सुरू असताना किरण यांना अश्रू अनावर होत. एवढं जंग जंग पछाडूनही हाती काहीच लागत नसल्याने त्या निराश होत. तो टप्पा अवघड होता.
अंजली यांनी प्रयत्न करून अनाथालयातील जन्मदाखल्यांचं रजिस्टर मिळवलं. किरण यांचा जन्मदाखल्यातली माहिती वाचून अंजली यांना धक्का बसला. कारण किरण यांना जुळा भाऊही असल्याचा उल्लेख जन्म दाखल्यात होता.
"ते अविश्वसनीय होतं. आईची आठवण येण्याचं कारण मला उमगलं. मला सख्खा भाऊ आहे समजणं अनोखं होतं. मला प्रचंड आनंद झाला," असं किरण यांनी सांगितलं. किरण यांच्या स्वीडनमधील पालकांना जुळ्या भावाविषयी कल्पना नव्हती.
जन्मदात्या आईची भेट आणि भावुक निरोप
स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने किरण आणि त्यांच्या मित्राने जुळ्या भावाचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यांना फार शोध घ्यावा लागला नाही. सुरत शहरातल्या एका उद्योगपतीने त्याला दत्तक घेतलं होतं. मात्र भावाची भेट एवढी सोपी नव्हती.
'भावाला ज्या कुटुंबांने दत्तक घेतलं होतं त्यांनी त्याला दत्तक घेण्यासंदर्भात काही माहिती दिली नव्हती. इतक्या वर्षांनंतर मुलाला दत्तक प्रक्रियेविषयी सांगावं की नाही याबाबत वडील संभ्रमात होते', असं अंजली यांनी सांगितलं.
अंजली तसेच किरण यांनी भावाच्या वडिलांना खूप समजावलं. अखेर भावाला दत्तक प्रकियेविषयी सांगण्यास ते तयार झाले. भावाची भेट व्हावी यासाठी किरण प्रयत्न करत असल्याचं सांगावं, असं किरण यांनी वडिलांना सांगितलं.
भावाला भेटण्याचा क्षण किरण यांच्या लख्ख स्मरणात आहे. 32 वर्षांनंतर किरण यांना त्यांचा सख्खा जुळा भाऊ भेटला. त्या व्यावसायिकांच्या सगळे घरी गेले. योगायोग म्हणजे भावानेच दरवाजा उघडला.
किरण आणि त्यांच्या भावाची नजरानजर झाली. दोघांनी एकमेकांना निरखून पाहिलं. ते दोघेही काही बोलले नाहीत.
सगळ्यांनी आइस्क्रीमचा आस्वाद घेतला. "त्याने मला घड्याळ भेट दिलं. तो खूपच चांगला मुलगा आहे. त्याचे डोळे माझ्यासारखे आहेत. पण त्याच्या डोळ्यांमध्ये वेदना दिसली," असं किरण यांनी सांगितलं.
दुसऱ्या दिवशी ते पुन्हा भेटले. किरण राहत असलेल्या हॉटेलमध्ये त्यांची भेट झाली. या भेटीवेळी किरण यांचे डोळे पाणावले. भेटीनंतर निरोप घेणं दोघांनाही कठीण झालं.
"आम्ही एकमेकांना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अनेक प्रश्न अनुत्तरितच राहिले. दु:ख भरून राहिलं होतं. माझा भाऊ खरंच चांगला आहे. मला त्याचा अभिमान आहे. तो खूप प्रेमळ आहे," असं किरण यांनी सांगितलं.
किरण यांना आपला भाऊ भेटला. आपल्याला भाऊ आहे हेच किरण यांना ठाऊक नव्हतं. आईचा शोध घेताना भाऊ सापडला. मात्र किरण यांचा आईचा शोध सुरूच राहील.
आई ज्यांच्याकडे काम करत होती त्यांच्यांपैकी एका घरी आईचा फोटो सापडला. आता तो फोटो किरण यांच्यासाठी आशेचा किरण आहे.
आम्ही एकमेकींसारख्या दिसतो असं किरण सांगतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)