चिमुकलीच्या उपचारासाठी ही आई विकतेय स्वत:चं दूध

    • Author, केरी अॅलन आणि टॉम गर्कन
    • Role, बीबीसी मॉनिटरिंग आणि बीबीसी सोशल न्यूज

पोटच्या मुलीच्या उपचारासाठी चीनमध्ये एका आईनं स्वतःचं दूध विकण्याचा निर्णय घेतला आहे. डॉक्टरांनी तिच्या लेकीवर उपचारासाठी 100,000 युआन (अंदाजे 10 लाख रुपये) खर्च सांगितला आहे.

चीनच्या मियाओपाई व्हीडीओ वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या एका व्हीडिओमध्ये एक दांपत्य आपल्या मुलीच्या उपचारासाठी आईचं दूध विकून 100,000 युआन (जवळजवळ 10 लाख रुपये) जमवत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्यांच्या मुलीला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे, असं ते सांगत आहेत.

Sina Weibo या चीनमधल्या ट्विटरसारख्या प्लॅटफॉर्मवर हा व्हीडिओ 24 लाख लोकांनी पाहिला आहे तर 5000 लोकांनी यावर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

शेनझेन शहरातल्या बालोद्यानात हे जोडपं पैशाच्या बदल्यात स्तनपान करत असल्याचं या व्हीडिओमधून दिसत आहे. शेनझेन हे चीनमधील गुआनतोंग प्रांतातलं एक महत्त्वाचं शहर आहे.

"आमच्या जुळ्या मुलींपैकी एक मुलीला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे. तिच्या उपचारासाठी मी माझं दूध विकून त्वरित पैसा गोळा करत आहे. या मुलीवर शेनझेनच्या सरकारी हॉस्पिटमध्ये उपचार चालू आहे," असं संबंधित महिला सांगते.

त्या महिलेचे पती सांगतात, "आमची मुलगी एकदाची बरी झाली की तिच्यासाठी आम्हाला 100,000 युआन मोजावे लागतील, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे."

अलीकडेच चीनच्या सरकारी आरोग्यसेवेवर सतत टीका होत आहे. आरोग्य केंद्रांवर ताण वाढत असल्याचा आणि लोक अधिक पैसा देऊन तत्काळ उपचार घेत असल्याचा आरोप होत आहे.

सोशल मीडियावर याबाबत मोठ्या प्रमाणात सहानुभूती व्यक्त होत असून, सर्वत्र "दूध विका, मुलगी वाचवा," सारख्या कमेंट्स लिहील्या जात आहेत. या आईवडिलांना मदत करण्याचं आवाहनही सोशल मीडियावरून केलं जात आहे. "आम्हाला ते दिसले की आम्ही नक्की त्यांची मदत करू," असंही काही लोक म्हणत आहेत.

अशाच एका कमेंटला 3,000 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत - "समाजातले अत्यंत गरीब लोक आजारी पडले की त्यांना त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचित राहावं लागतं."

पण काहीनीं या आईवडिलांच्या निर्णयावर कडाडून टीका केली आहे. "मदत मागण्याचा ही एक अश्लील पद्धत आहे," असं काहींना वाटतं. "तुम्ही निराश आहात, मदतीच्या प्रतिक्षेत आहात, हे समजू शकतो. पण असं दूध विकून तुम्ही आत्मसन्मान कसा कायम राखू शकता?"

अशा नकारात्मक टीकेला उत्तर देत एका व्यक्तीनं लिहिलं, "हे असहाय्य आईवडिलांचं त्यांच्या मुलांसाठी प्रेम आहे. इंटरनेटवर असली असभ्य भाषा करणाऱ्यांनो, एकदा हाही विचार करा की जर हे तुमचं मूल असतं तर तुम्ही कशाचा विचार केला असता - तुमचा आत्मसन्मान वाचवायचा की तुमच्या मुलाच्या जीवाचा?"

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)