You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आफ्रिकेजवळ बेपत्ता जहाजावरच्या भारतीय नागरिकांची सुटका
पश्चिम आफ्रिकेच्या बेनिन किनारपट्टीवरून बेपत्ता झालेल्या मरीन एक्स्प्रेस जहाजावरील 22 भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे - "मर्चंट शिप मरीन एक्सप्रेसवरच्या 22 भारतीयांची सुटका करण्यात आली आहे. नायजेरिया आणि बेनिनच्या सरकारांचे आभार."
बेपत्ता झालेलं जहाज हाँगकाँगस्थित अँग्लो ईस्टर्न शिपिंग कंपनीचं होतं. गिनीच्या आखातातून हे जहाज बेपत्ता झाल्याचं सांगितलं जात होतं. गुरुवारपासून या जहाजाशी संपर्क झालेला नव्हता.
समुद्री चाच्यांनी या जहाजाचं अपहरण केलं असावं, अशी शक्यता वर्तवली जात होती.
काही दिवसांपूर्वी समुद्री चाच्यांनी याच परिसरातून आणखी एका जहाजाचं अपहरण केलं होतं. जानेवारी महिन्यात याच क्षेत्रातून एका जहाजाचं अपहरण करण्यात आलं होतं. मात्र सहा दिवसांनंतर पैसे दिल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
बेनिन नौदलातर्फे या जहाजाचा शोध सुरू असल्याचं द इंटरॅनशल मॅरिटाईम ब्युरोनं सांगितलं. बेपत्ता झालेलं मरीन एक्स्प्रेस जहाज 13,500 गॅसोलिन वायूच्या साठ्यासह प्रवास करत होतं.
'एमटी मरिन एक्स्प्रेस' नावाच्या तेलवाहू जहाजाच्या मालकांनी त्याच्या शोधार्थ मुंबईत जहाजबांधणीच्या महासंचालकाकडे मदत मागितली होती. याशिवाय जहाजाच्या तपासासाठी नायजेरिया आणि बेनिनच्या संपर्कात असल्याचं कंपनीने म्हटलं होतं.
सोमालियानजीकचा परिसर धोकादायक असल्याचं बीबीसीच्या विल रॉस यांनी सांगितलं, मात्र आंतरराष्ट्रीय युद्धनौकांनी या क्षेत्रात तळ ठोकल्यापासून परिस्थितीत सुधारणा झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)