दोन्ही पाय नसतानाही त्यांनी 69व्या वर्षी एव्हरेस्ट गाठला

1975 मध्ये एव्हरेस्ट शिखराजवळ गिर्यारोहण करताना शिया बोयू एका वादळात अडकले. त्यांनी त्यांची स्लीपिंग बॅग एका आजारी सहकाऱ्याला दिली होती. त्यामुळे त्यांच्या पायांना हिमबाधा (Frostbite) झाली आणि त्यामुळे त्यांना आपले दोन्ही पाय गमवावे लागले.

पण तो वादळाचा तडाखा त्यांच्या जिद्दीला खीळ घालू शकला नाही. आणि अखेर वयाच्या 69व्या वर्षी त्यांनी एव्हरेस्ट सर केलं!

असं करणारे ते दुसरेच डबल-अॅम्प्युटी (अर्थात अशी व्यक्ती जिच्या शरीरातला एखादा अवयव कापून काढण्यात आला आहे) ठरले आहेत.

यासोबतच ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह प्लेन यांनी सातही खंडांतील सर्वोच्च पर्वतरांगा सर्वांत जलद चढण्याचा विक्रम नोंदवला. आणि त्यांचा हा पराक्रमही काही साधारण नाही.

चार वर्षांपूर्वी सर्फिंग करताना प्लेन यांच्या मानेला दुखापत झाली होती.

'नशिबाने दिलेलं आव्हान'

1975 मधल्या वादळामुळे शिया बोयू समद्रसमाटीपासून 8,000 मीटर उंचीवरल्या 'डेथ झोन'मध्ये अडकून पडले होते. त्यांच्या टीमला तीन दिवस तिथंच तळ ठोकून थांबावं लागलं.

त्यांच्या पायांना हिमबाधा झाली आणि 1996मध्ये त्यांचे दोन्ही पाय गुडघ्यापासून कापावे लागले. पण त्यानतंरही त्यांनी शिखर गाठण्याचा विचार कधीही सोडला नाही.

"माउंट एव्हरेस्ट सर करणं हे माझं स्वप्न आहे," असं त्यांनी AFP वृत्तसंस्थेला एप्रिलमध्ये सांगितलं होतं. "पण मला हे लक्षात घ्यावं लागलं की, माझं हे स्वप्न म्हणजे एक वैयक्तिक आव्हान आहे, खरं तर नशिबाने दिलेलं आव्हान," असं ते म्हणाले होते.

1975च्या संकटानंतर त्यांनी 2014, 2015 आणि 2016 ही तीन वर्षं आणखी प्रयत्न केले. 2016मध्ये ते शिखराच्या जवळ पोहोचले, तेच हिमवादळाने त्यांना अडवलं.

नेपाळच्या प्राधिकरणानं गेल्या वर्षी डबल-अॅम्प्युटी असलेल्या तसंच अंध किंवा एकट्यानं शिखर सर करण्याऱ्या व्यक्तींच्या माऊंट एव्हरेस्ट मोहिमेत सहभागी होण्यावर बंदी घातली आहे.

सुरक्षिततेच्या दृष्टीनं असे नवीन नियम बनवण्यात आल्याचं प्राधिकरणाचं म्हणणं होतं. पण हे म्हणजे भेदभाव करण्यासारखं आहे, असं म्हणून न्यायालयानं या नियमांना रद्दबातल ठरवलं.

सोमवारी एका शेरपा टीमच्या मार्गदर्शनाखाली शिया शिखरापर्यंत पोहोचले, असं हिमालय टाईम्सनं म्हटलं आहे. तसंच नेपाळच्या बाजूनं शिखरापर्यंत प्रथमच कुणी डबल-अॅम्प्युटी व्यक्ती चढली आहे, असं या वृत्तात म्हटलं आहे.

या कामगिरीमुळे शिया हे हिमालयाच्या शिखरापर्यंत पोहोचलेले दुसरे डबल-अॅम्प्युटी व्यक्ती ठरले आहेत.

2006 मध्ये न्यूझीलंडचे मार्क इंग्लिस पहिल्यांदा शिखरापर्यंत पोहोचले होते. याच दरम्यान हिमबाधेमुळे त्यांनाही हातपाय गमवावे लागले होते.

स्टीव्ह प्लेन यांनी सात खंडांतील सर्वोच्च पर्वतरांगा सर्वांत जलद चढण्याचा विक्रम नोंदवला आहे.

शेरपा पथकानं या शिखरापर्यंत दोर फिक्स करण्याआधीच प्लेन आणि शिया यांनी चढाईला सुरुवात केली होती. यामुळे सातव्या खंडावरच्या सर्वोच्च शिखराच्या प्लेन अवघ्या 117 दिवसांत पोहोचू शकले. यामुळे त्यांना पूर्वीचा विक्रम अवघ्या नऊ दिवांनी मोडता आला.

प्लेन यांनी सर केलेली 7 शिखरं

  • विन्सन, अन्टार्टिका (4,892 मीटर उंची)
  • अकोनकागुआ, दक्षिण अमेरिका (6,962 मीटर उंची)
  • किलीमांजारो, आफ्रिका (5895 मीटर उंची)
  • कारस्टेन्झ पिरॅमिड, ऑस्ट्रेलेशिया (4884 मीटर उंची)
  • एलब्रस, युरोप (5642 मीटर उंची)
  • डेनाली, उत्तर अमेरिका (6,190 मीटर उंची)
  • एव्हरेस्ट, आशिया (8,848 मीटर उंची)

2014च्या उन्हाळ्यात सर्फिंग करत असताना एका लाटेनं प्लेन यांना धडक दिली आणि यात त्याच्या मानेला जबर मार लागला. याला वैद्यकीय भाषेत 'हँगमॅन्स फ्रॅक्चर' असं म्हणतात. यानंतर प्लेन चालू शकतील की नाही, अशी शंका डॉक्टरांनी व्यक्त केली होती.

"साडेतीन वर्षांपूर्वी मी हॉस्पिटलमध्ये मोडलेल्या मानेसह पडून होतो आणि तेव्हाच मी स्वत:साठी ध्येय निश्चित केलं," असं प्लेन यांनी फेसबुकवर लिहिलं आहे.

प्लेन सध्या सर्फ लाईफ सेव्हिंग असोसिएशन आणि स्पायनलक्युअर ऑस्ट्रेलिया या संस्थासाठी पैसे उभारण्याचा प्रयत्न करत आहेत. दुखापतग्रस्त झाल्यानंतर याच संस्थांशी प्लेन यांचा संबंध आला होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)