कर्नाटक निवडणूक 2023: एच. डी. कुमारस्वामी यांच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

काँग्रेसने कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवला आहे. यानिमित्ताने काँग्रेसचे प्रमुख नेते एच.डी.कुमारस्वामी यांच्या राजकीय वाटचालीचा घेतलेला आढावा.

2018 मध्ये कर्नाटकमध्ये 13 महिन्यांचं सरकार चालवल्यानंतर काँग्रेस-जेडीएसचं सरकार मंगळवारी कोसळलं. हे सरकार बनल्यापासूनच त्यावर धोक्याचं सावट होतं, असं राजकीय वर्तुळात म्हटलं जायचं, आणि गेल्या काही दिवसांपासून तर परिस्थिती अजूनच नाजूक होती.

कर्नाटक विधानसभेत पार पडलेल्या विश्वासदर्शक ठरावात बहुमत सिद्ध न करता आल्यामुळे काँग्रेस-जेडीएस सरकार पडलं. कुमारस्वामी हे चित्रपट निर्माते होते आणि त्यांच्या वादग्रस्त सरकारचा शेवटही फिल्मी झाला.

पाहा नेमकं काय घडलं

हरदनहळ्ळी देवेगौडा कुमारस्वामी यांना सिनेमाची मोठी आवड. सूर्यवंशा, गलाते अलियांद्रु, चंद्र चकोरी अशा कानडी चित्रपटांची निर्मिती कुमारस्वामी यांनी केली आहे. होलेनरसीपुरा या त्यांच्या शहरात त्यांच्या मालकीचं एक चित्रपटगृहसुद्धा आहे. त्यांच्या कारकिर्दीवर टाकलेली एक नजर.

37व्या वर्षी राजकारणात प्रवेश

हसन जिल्ह्यात 1959 साली जन्मलेल्या कुमारस्वामींनी बंगळुरूमध्ये B.Sc. केलं. सहा भावडांपैकी ते एक. त्यांना राजकारणापेक्षा चित्रपटसृष्टीत जास्त रस होता. कॉलेज संपल्यावर ते सिनेमा इंडस्ट्रीत निर्माता-वितरक म्हणून काम करू लागले.

वडील HD देवेगौडा राजकारणात असले, तरी कुमारस्वामींनी राजकारणात काहीसा उशीराच प्रवेश केला - वयाच्या 37व्या वर्षी!

1996 साली अटलबिहारी वाजपेयी याचं सरकार 13 दिवसांत पडल्यानंतर HD देवेगौडा यांना पंतप्रधान होण्याची संधी मिळाली होती. याच निवडणुकीत कुमारस्वामींचा राजकीय प्रवेश झाला होता. पदार्पणातच त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती.

सुरुवातीला कुमारस्वामी यांच्याबद्दल फारसं कुणाला माहीत नव्हतं. देवेगौडा पंतप्रधान झाल्यावर आणि त्याआधीही त्यांचं राज्यातलं राजकारण त्यांचा थोरला मुलगा HD रेवण्णा सांभाळायचे, असं बीबीसीसाठी बंगळुरूहून रिपोर्टिंग करणारे इम्रान कुरेशी सांगतात.

कुमारस्वामी यांनी 1996मध्ये कनकपुरा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली. पण त्या वेळचं केंद्रातलं अस्थिर सरकार पडलं आणि 1998मध्ये पुन्हा निवडणुका झाल्या. यावेळी कुमारस्वामींचा पराभव इतका मानहानिकारक होता की त्यांचं डिपॉझिट जप्त झालं.

त्यानंतर 1999मध्ये त्यांनी सथनूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. इथंही त्यांच्या पदरी पराभवच आला. दोन वेळा सपशेल पराभूत झालेल्या कुमारस्वामी यांना राजकारणात विजय मिळवण्यासाठी 2004पर्यंत प्रतीक्षा करावी लागली.

विजय आणि मुख्यमंत्रिपदही

2004मध्ये स्थापन झालेल्या काँग्रेसच्या धरमसिंह यांच्या सरकारला JDSनं पाठिंबा दिला होता. कुमारस्वामी यांनी त्यांच्या पक्षाच्या 40 आमदारांसह सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि 28 जानेवारी 2006 रोजी काँग्रेसचं सरकार कोसळलं.

"या घडामोडी एवढ्या वेगानं आणि गुप्तपणे घडल्या की हा कुमारस्वामी यांच्या मुत्सद्दीपणाचा विजय मानला गेला," असं इम्रान कुरेशी सांगतात.

"भाजपचे येडियुरप्पा त्यावेळी भाजप श्रेष्ठींचं काहीच ऐकण्यास तयार नव्हते. त्यांना आवरण्यासाठी भाजपनं विद्यमान रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे वडील वेदप्रकाश गोयल यांना बंगळुरूमध्ये पाठवलं होतं. पण त्याआधीच येडियुरप्पांशी संगनमत करत कुमारस्वामी यांनी सत्ता स्थापन केली," कुरेशी पुढे सांगतात.

त्यानंतर भाजपच्या पाठिंब्यासह आणि भाजपशी झालेल्या करारानुसार कुमारस्वामी यांनी 4 फेब्रुवारी 2006 रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तडजोडींनुसार 20 महिन्यांसाठी हे पद त्यांच्याकडे राहणार होतं.

त्यानुसार 9 ऑक्टोबर 2007 रोजी त्यांनी राजीनामा देणं अपेक्षित होतं. पण कुमारस्वामी यांनी राजीनामा द्यायला नकार दिला. भाजपनं त्यांना दिलेला पाठिंबा काढून घेतला आणि त्यांचं सरकार पडलं. अखेर JDSशी तडजोड झाल्यावर येडियुरप्पा यांनी सरकार स्थापन केलं. पण हे सरकारही अल्पकालीन ठरलं.

भावासोबत पटत नाही?

या सरकारमध्ये कुमारस्वामी यांचे मोठे भाऊ रेवण्णा मंत्री होते. या दोघांमध्ये स्पर्धा असल्याची चर्चा कायम असते.

त्यावर TV5 या कन्नड न्यूज चॅनेलचे राजकीय संपादक श्रीनाथ जोशी सांगातात, "दोन्ही भावांमध्ये कुठले वाद असल्याचं वरवर तरी दिसत नाही, पक्षामध्ये कुमारस्वामी यांना मोठा जनाधार आहे, त्यामुळेच ते मुख्यमंत्री पदाचे उमेदवार ठरले. वडील HD देवेगौडा जो सांगतील तो शब्द दोन्ही भावांसाठी अंतिम असतो."

2009मध्ये कुमारस्वामी दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. 2014 पासून कुमारस्वामी JDSचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आता झालेली 2018 सालची विधानसभा निवडणूकही जेडीएसने कुमारस्वामींच्या नेतृत्वाखाली लढवली.

"कुमारस्वामी हे अत्यंत धोरणी राजकारणी आहेत. ते त्यांचा कोणताही निर्णय अत्यंत तटस्थपणे घेतात. व्यावसायिक दृष्टिकोनातून राजकारण करणारा माणूस, असं त्यांचं विश्लेषण करता येईल. ते JDSऐवजी एखाद्या मोठ्या राष्ट्रीय पक्षात असते, तर त्यांनी त्यांचं वेगळं स्थान निर्माण केलं असतं," इम्रान कुरेशी निरीक्षण नोंदवतात.

पण कुमारस्वामी सत्तेसाठी आतुर आहेत आणि मुख्यमंत्रिपद जे कुणी देऊ करतील त्यांच्यासोबत ते जातील, असा त्यांच्यावर नेहमी आरोप होत असे.

'दोन लग्न झाल्याचा वाद'

सिनेमा इंडस्ट्रीतल्या एक अभिनेत्रीशी नाव जोडलं गेल्यामुळे ते अनेकदा वादातही सापडले. आधी लग्न झालेलं असताना 2006 साली अशी अफवा पसरली की कुमारस्वामींनी राधिका नावाच्या अभिनेत्रीशी दुसरं लग्न केलं.

हिंदू विवाह कायद्यानुसार एक पत्नी जिवंत असेल, तर दुसरं लग्न करणं हा गुन्हा आहे. त्यामुळे कुमारस्वामी अडचणीतही आले. त्यांच्याविरोधात जनहित याचिक दाखल करून त्यांची निवडणूक रद्द करण्याची याचिका करण्यात आली होती. पण कर्नाटक हायकोर्टानं पुराव्याअभावी हा खटला रद्द केला.

कोर्टाने निकाल दिल्यानंतरही या वादावर पडदा पडला नाही. ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्यावर नव्याने आरोप झाले. अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या रम्या यांनी 2016 साली पुन्हा कुमारस्वामींवर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या होत्या, "त्यांचं राधिकासोबत लग्न झालं आहे हे सगळ्यांना माहीत आहे. मी त्यांचे फोटोही पाहिले आहेत. कारण मी त्यांच्या सिनेमात काम केलं आहे."

याबाबत बोलताना TV5 या कन्नड वृत्तवाहिनीचे राजकीय संपादक श्रीनाथ जोशी सांगतात,"कुमारस्वामी यांचं दुसरं लग्न झाल्याची गोष्ट इथे सर्वांना माहीत आहे. त्यांच्या कुटुंबीयांनाही याबाबत माहिती आहे."

यावर आम्ही कुमारस्वामींची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या वतीने जेडीएसचे प्रवक्ते तनवीर अहमद म्हणाले, "कुमारस्वामी यांचं खासगी आयुष्य हा त्यांच्याविषयी मत तयार करताना निकष असू शकत नाहीत. जे कुणी असा आरोप करतात त्यांना हिंदू मॅरेज ऍक्ट 1976 माहिती आहे का? या कायद्यानुसार कुठला हिंदू पुरूष दुसरं लग्न करू शकतो का? नाही. असं असेल तर त्याबाबत क्रिमिनल केस का नाही? हे सर्व निराधार आहे, ते सर्व आरोप खोटे आहेत."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)