जगातल्या सर्वांत कठीण आणि अज्ञात रस्त्यांवरचे ते २२ दिवस

    • Author, राजेश गाडगीळ
    • Role, गिर्यारोहक

विरळ हवा, प्रखर सौर किरणं, तीव्र वारा आणि दररोज बदलणारं तापमान अशा परिस्थितीमुळे आजवर 'ईस्टर्न काराकोरम ट्रॅव्हर्स' करण्याचं धाडस कुणीही केलं नव्हतं. गतवर्षी जुलै-ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रातील सहा जणांच्या चमूनं ही मोहिम यशस्वीरित्या पूर्ण केली होती.

2017 या वर्षात भारतीयांनी हिमालयात तब्बल 85 मोहिमा केल्या. त्यातील सर्वोत्कृष्ट भारतीय मोहिम म्हणून 'काराकोरम ट्रॅव्हर्स' या मोहिमेला नुकताच (18 फेब्रुवारी 2018) जगदिश नानावटी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला. त्यानिमित्तानं...

जगातील सर्वांत उंच आणि धोकादायक शिखरं असलेल्या पर्वतरांगा म्हणून काराकोरमची ओळख आहे. हिमालयाचा उत्तर-पश्चिम विस्तार असलेल्या या पर्वतरांगा पाकिस्तान, भारत आणि चीनच्या सीमारेषेवर वसलेल्या आहेत.

याच अफाट पर्वतरांगांच्या कुशीत जगातील सर्वात अजस्र हिमनद्यांचा उगम होतो. खडकांची शिखरं आणि मोठे उतार अशा भौगोलिक रचनेमुळे या भागात मानवी वस्ती देखील अत्यल्पच.

आम्ही 2005 सालापासून पूर्व काराकोरममध्ये संशोधनात्मक मोहिमा करत आहोत. आवाका आणि वेळ लक्षात घेऊन दरवर्षी कोणतीही एक व्हॅली घ्यायची, त्यातली शिखरं सर करायची, रस्ते शोधायचे आणि त्याच व्हॅलीतून परत यायचं किंवा फारफार तर क्रॉसओव्हर करून पलिकडे जाऊन दुसरा मार्ग शोधून बाहेर पडायचं, असा आमचा कार्यक्रम असे.

त्यामुळे आमची मोहिम एक-दोन व्हॅलीपुरती मर्यादित राहत असे. त्यातही शिखर चढाई हा मुख्य उद्देश असायचा. परंतु दरवर्षी केवळ एकच व्हॅली करत राहिलो तर या जन्मात फार काही बघून होणार नाही. त्यामुळे एकाच मोहिमेत अनेक व्हॅलीज एकमेकांशी जोडता येतील का, असा विचार आम्ही करत होतो.

'माऊंटन ट्रॅव्हर्स' हा गिर्यारोहणचा एक प्रकार आहे. 'ट्रॅव्हर्स' म्हणजे विशिष्ट पर्वतरांग निवडून आणि पूर्वनियोजित अंतर ठरवून एकाच मोहिमेत संपूर्ण भूप्रदेश चालून जाणं आणि वाटेतील खिंडी पार करणं होय. यामध्ये तुम्ही एकाच खोऱ्यात शिरून बाहेर न येता, एका दिशेनं चालायला सुरुवात करून वेगवेगळ्या हिमनद्या पार करत दुसऱ्या दिशेनं बाहेर पडता. शिवाय ही संपूर्ण मोहिम स्वयंसिध्द होऊनच पूर्ण करावी लागत असल्यानं अधिक आव्हानात्मक ठरते.

आल्प्स आणि हिमालयाचे ट्रॅव्हर्स यापूर्वी झालेले आहेत. परंतु आजवर 'इस्टर्न काराकोरम ट्रॅव्हर्स' झालेला नव्हता. नागरी मोहिमा सोडा पण लष्करी मोहिमासुध्दा तेथे गेलेल्या नव्हत्या. त्यातच 'वेस्टर्न काराकोरम' पाकिस्तानच्या ताब्यात असल्याने तिकडे आपल्याला जाणं शक्य नाही. पण जो भाग आपल्या नियंत्रणात आहे तिथं अशी एखादी मोहिम राबवता येईल का असा विचार डोक्यात आला आणि 'इस्टर्न काराकोरम ट्रॅव्हर्स' करण्याचं ठरवलं.

संरक्षणाच्या दृष्टीनं अतिशय संवेदनशील असलेल्या या भागात जाण्याची परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. यापूर्वी याच भागातील 10-12 व्हॅलीत आम्ही केलेल्या यशस्वी मोहिमा आणि नव्वद वर्षे जुन्या नामांकित 'द हिमालयन क्लब'ची पुण्याई गाठिशी असतानाही लष्कर, संरक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय यांच्याकडून परवानगी मिळवण्याठी साडेतीन महिने खर्ची पडले.

नो न्यूज इज गुड न्यूज

काराकोरम व्हॅलीतील सर्व ट्रेक 10-12 हजार फुटांवरून सुरू होतात. 15-16 हजार फुटांवर ट्रॅव्हर्स आहेत आणि शिखर चढाई करायची असेल तर 20-22 हजार फुटांपर्यंत जावं लागतं. साधारणपणे एका व्हॅलीतून दुसऱ्या व्हॅलीत जाताना दोन्ही बाजूंनी सामानाची ने-आण करण्यासाठी मदत गटाची आवश्यकता असते. फारफार तर मधले 3-4 दिवस मदत गट सोबत नसतो. आमची मोहिम ही तब्बल 38 दिवसांची होती.

लडाखमधील रोंगदो गावातून आमच्या मोहिमेला सुरूवात झाली आणि 38 दिवसांनी नुब्रा व्हॅलीमध्ये तिचा समारोप झाला. परंतु या 38 दिवसांपैकी 'रोंगदो ला' येथून आत शिरून 'सकांग' व्हॅलीतून बाहेर पडेपर्यंतचे तबब्ल 22 दिवस आम्ही दहा जण अज्ञातवासात होतो.

हा अनुभव विलक्षण होता. वाटेत कुठली गावं नाहीत, इतर गिर्यारोहक नाहीत, जीवसृष्टीचा पत्ता नाही की मोबाईलला नेटवर्क नाही. हिमनद्या आणि उंचच उंच शिखरं या व्यतिरिक्त आमच्या साथीला केवळ आमचे आम्हीच. त्यामुळे काहीही झालं असतं तरी ते दहा जणांमध्येच निस्तरावं लागणार होतं.

काराकोरममध्ये एकही झाड काय साधं झुडूपही नाही. टळटळीत उन होतं. पण आमच्या नशिबानं आम्हाला फार वाईट हवामानाचा सामना करावा लागला नाही.

बावीस दिवस बाहेरच्या जगाशी कुठलाच संपर्क नव्हता. घरच्यांना याची आगाऊ कल्पना देऊन ठेवली होती की अगदी कुणी मेलं तरच बातमी येईल. त्यामुळे 'नो न्यूज इज गुड न्यूज' असं घरच्यांनाही पटवून दिलं होतं. सुदैवाने असं काहीच घडलं नाही.

खरंतर इतक्या वर्षात घरातल्यांनाही आमच्या चक्रमपणाची चांगलीच कल्पना आलेली आहे त्यामुळे ते बऱ्यापैकी बिनधास्त असतात.

पूर्व काराकोरमचा डेटा पहिल्यांदा जगासमोर आला

आमच्या आधी या भागात कुणीच गेलेलं नसल्यानं व्हॅलीतले रस्ते, खिंडी, नद्या, शिखरं यांची कोणतीही ठोस माहिती लिखित किंवा फोटो स्वरूपात कुणाकडेच उपलब्ध नव्हती. त्यामुळे दिवसाला किती अंतर कापायचंय, कुठे मुक्काम करायचा याचा देखील अंदाज नव्हता.

आम्ही एक मूलभूत आराखडा तयार केला. असं ठरवलं की रोंगदो व्हॅलीपासून सुरुवात करायची, तिथून साऊथ इस्ट ते नॉर्थ वेस्ट असं चालत राहायचं आणि इंदिरा कोल येथे ही मोहिम संपवायची.

ग्लोबल वॉर्मिंगच्या खूणा इथल्या शिखरांवर स्पष्टपणे दिसत होत्या. काही ठिकाणी तर बर्फ थराची उंची अगदी 100 फूटांपर्यंत खाली आली आहे. पूर्वी जिथे हिमनद्या होत्या तिथे आता पाण्याची नदी आहे. अनेक ठिकाणचा बर्फ गायब होऊन आता फक्त दगड माती दिसते. हिमनद्या आक्रसत आहेत हे पहिल्यांदा इतक्या जवळून बघायला मिळालं. खूप फॉसिल्स पाहायला मिळाली. हिमवादळात वाहून आलेली फुलपाखरं बर्फ, दगडांखाली गाडली गेलेली होती.

पूर्व काराकोरममधल्या मूळ हिमनद्या आणि पर्वत कसे दिसतात हे पहिल्यांदाच याची देही याची डोळा पाहायला मिळालं. डोंगराळ प्रदेशातून तब्बल 100 किलोमीटरहून अधिक पायी प्रवास झाल्यानं त्याचा डेटा आता जगभरातील गिर्यारोहकांसाठी उपलब्ध झाला आहे. सर्वाधिक उंचीच्या तीन खिंडी आम्ही ओलांडल्या. यातील 5800 मीटर उंचीचा अर्गन ला (ला म्हणजे खिंड) आणि झामोरीयन ला हे दोन पास पहिल्यांदाच ओलांडले गेले.

6165 मीटर उंचीवरच्या 'नगा कांगरी' या शिखरावरही पहिल्यांदाच चढाई झाली. लडाखी भाषेत कांगरी म्हणजे बर्फाळ शिखर. इथल्या आजूबाजूच्या शिखर समूहातील ते पाचव्या क्रमांकाचं शिखर आहे त्यामुळे ते नगा कांगरी.

आमच्या मोहिमेपूर्वी या खिंडी आणि शिखराची कुणाला माहितीच नव्हती. पण आम्ही ते पास ओलांडल्यामुळे आता त्याच्या खिंडी झाल्या आहेत. खिंड आणि शिखरांना नवीन नावं द्यायचे काही निकष आहेत.

आम्ही ते सर्व निकष विचारात घेऊन 'अर्गन ला', 'झामोरीयन ला' आणि 'नगा कांगरी' ही नावं दिलेली आहेत.

या नवीन खिंडी, शिखराचं नाव आणि मोहिमेतील प्रत्येक गोष्टीचा सविस्तर अहवाल आम्ही लष्कर, इंडियन माऊंटेनियरिंग फाऊंडेशन (आयएमएफ), संरक्षण मंत्रालय, सर्वे ऑफ इंडिया, जगभरातील गिर्यारोहणाची जर्नल्स, अल्पाईन क्लब या महत्त्वाच्या संस्थाकडे पाठवला आहे. त्यामुळे भविष्यात जेव्हा या भागाचा नकाशा नव्याने तयार केला जाईल तेव्हा आम्ही दिलेली नावं अधिकृतपणे नमूद करण्यात येतील.

हिमालयन क्लबच्या संकेतस्थळावरही ही माहिती सर्वांसाठी उपलब्ध असेल.

अनिश्चितता कायम

आतापर्यंत हा भाग अस्पर्शीत होता. त्यामुळे स्वयंपूर्ण बनून काम करायचं होतं. आम्हाला सकाळी हे माहीत नसायचं की आम्ही संध्याकाळी पोहोचणार आहोत. मोहिमेच्या शेवटपर्यंत ही अनिश्चितता कायम होती. बर्फाचा डोंगर किंवा एखादा पास समोर आला तर तो संध्याकाळच्या वेळेस क्रॉस करणं शक्य नव्हतं. मग त्याच्या पायथ्यालाच राहावं लागत असे. मग सकाळी लवकर उठून ते क्रॉस करणं आणि त्या दिवसाचं ठरवलेलं ठराविक अंतरही कापावं लागत असे.

मोहिमेच्या सुरूवातीलाच उंचावरील एका कॅम्पकडे कूच करताना आमचा सहकारी दिव्येशचा पाय एका हलणाऱ्या दगडावरून सरकल्याने त्याच्या डाव्या डोळ्याला इजा झाली. डोळ्याच्या बाजूने रक्त साकळलं. त्यामुळे ताबडतोब त्याला लडाखमधील रोंगदो गावी माघारी न्यावं लागलं. सुदैवाने ती जखम आठवडाभरातच बरी झाली आणि दिव्येश पुन्हा आमच्यात सामील झाला.

नुसताच बर्फ असतो तेव्हा त्यातून चालणं सोप्प असतं पण खडकाळ जमीन असेल तर त्यातून रस्ता काढत जाणं खूप आव्हानात्मक असतं. त्याचा आम्हाला अनेकदा प्रत्यय आला. पुन्हा एकदा सहकारी दिव्येशचाच पाय हिमनदीच्या मोठ्या भेगेत गेला. पण यावेळी त्याने स्वत:ला सावरलं. त्यामुळे बर्फाच्या पृष्ठभागावरून चालतानाही खूप सावधगिरीनं मार्गक्रमण करावं लागत होतं.

सांघिक कामगिरी महत्त्वाची

दिव्येश मुनी हा सी.ए. (मोहिमेचा नेता), मी (राजेश गाडगीळ) आणि हुझेफा इलेक्ट्रीकवाला व्यायसायिक, आशिष प्रभू हा कन्सल्टंट, सोनाली भाटीया ही ग्राफीक डिझायनर आणि विनिता मुनी ही आर्टीस्ट अशी आमची सहा जणांची टीम होती. त्याशिवाय आमच्यासोबत आदित्य कुलकर्णी हा सिनेमोटोग्राफर, दोन शेर्पा आणि दोन हिमाचली तरूण होते.

सर्वांच्या जबाबदाऱ्या ठरलेल्या होत्या. तंबू कोण लावणार, जेवण कोण तयार करणार, नकाशा कोण पाहणार, चढाईच्यावेळी प्रतिनिधित्व कोण करणार असं सर्वकाही. रोज रात्री उद्या काय करायचं ते ठरवायचो आणि त्या योजनेला चिकटून राहायचो. त्यामुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या.

जवळपास दीड महिन्याच्या मोहिमेमध्ये वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या मंडळींसोबत ट्युनिंग जमवणं हे खरंतर आव्हान असतं. कारण एकमेकांचे विचार न पटल्याने कित्येक मोहिमा बारगळलेल्या असल्याची अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत. आमच्या टीममध्ये दोन महिलाही होत्या. पण त्यांनी त्याचं कधी भांडवलं केलं नाही. जेवढी मेहनत आम्ही घेतली तेवढीच त्यांनीही घेतली. म्हणूनच आजघडीला मोहिमेनंतरही आम्ही सर्वजण खूप चांगले मित्र आहोत आणि हेच मोहिमेचं सर्वात मोठं यश आहे असं मला वाटतं.

या प्रदेशाची भौगोलिक रचना कशी आहे याचं पहिलं दर्शन आमच्यामुळे इतरांना होणार याचा आनंद आहे. शिवाय अशा कठीण मोहिमा आपणही पूर्ण करून शकतो हा आत्मविश्वासही यामुळे मिळाला.

(राजेश गाडगीळ आणि टीमसोबत बीबीसी मराठीसाठी प्रशांत ननावरे यांनी साधलेल्या संवादावर आधारित हा लेख आहे.)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)