सातारा : 'साखरवाडीचा संघ खूप डेंजर खेळतो' : साताऱ्याच्या मुलींच्या खो-खो संघाची देशभर हवा

    • Author, प्राजक्ता ढेकळे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

जसं कुस्तीसाठी हरियाणाने, टेनिससाठी आंध्र प्रदेशने आणि फुटबॉलसाठी इशान्य भारताने नाव कमावलंय, तसंच लौकिक सातारा जिल्ह्यातल्या साखरवाडीने खो-खोच्या राष्ट्रीय मैदानावर मिळवलंय. इथल्या मुलींचा धसका राष्ट्रीय पातळीवरच्या खो-खो खेळाडूंनी घेतला आहे. पाहूया त्यांच्या 'दंगल'ची बीबीसी मराठीनं 2018 साली प्रसिद्ध केलेली ही कहाणी -

"स्पर्धेला कुठेही खेळायला गेलो की आधीच 'साखरवाडीचा संघ खूप डेंजर खेळतो', अशी हवा तिथे तयार व्हायची. त्यातही अनेक प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू विचारायचे, 'प्रियंका आली आहे का?' हो म्हणताच त्यांना खेळण्याआधीच आपण आज हरणार, असं वाटू लागायचं. आणि व्हायचंही तसंच," प्रियंका येळे सांगते.

नुकतीच पदवीधर झालेल्या प्रियंका येळेने वयाची 20 वर्षं उलटण्याच्या आतच जानकी, वीरबाला, राणी लक्ष्मीबाई आणि शिवछत्रपती असे खेळातील सर्वच पुरस्कार मिळवले आहेत. कारण तिचा खेळ तिच्या अख्ख्या गावासाठी उत्साहवर्धक आहे, किंवा असं म्हणावं, हे अख्खं गाव तिच्याएवढ्याच उत्साहाने खो-खो खेळतं.

प्रियंका साखरवाडीच्या त्या मुलींपैकी एक आहे, ज्यांचा खो-खोच्या मैदानात दरारा आहे. मैदानावरच्या त्यांच्या चपळाईनं प्रतिस्पर्ध्यांना तर धडकी भरतेच, शिवाय पाहणारेही थक्क होतात. आजवर या गावातून शंभराहून जास्त राष्ट्रीय खेळाडू घडले आहेत. एवढंच नव्हे तर गावातल्या एकाच माध्यमिक शाळेतल्या 4 विद्यार्थिनींना शिवछत्रपती पुरस्कारही मिळाला आहे.

म्हणूनच साखरवाडी म्हणजे 'खो-खोची पंढरी', हे बिरूद फक्त महाराष्ट्रतच नव्हे तर देशभरात पोहोचलं आहे.

साखरवाडी आणि खोखो

पुण्यापासून साधारण 87 किमी अतंरावर आहे साखरवाडी. उद्योजक भाऊराव आपटे यांनी या गावात साखर कारखाना सुरू केला. त्यामुळे गावाचं नाव साखरवाडी पडलं.

साखर कारखान्याबरोबरच तिथे काम करणाऱ्या कामगारांसाठी वसाहती आणि त्यांच्या मुलांसाठी साखरवाडी विद्यालयाची स्थापना करण्यात आली.

या विद्यालयात आजही साखर कारखान्यातील कामगारांच्या मुलांना प्रवेशात प्राधान्य दिलं जातं. अभ्यासाशिवाय अत्यंत कमी गुंतवणुकीचा खेळ म्हणून खो-खो इथे रुजू लागला. कालांतराने विद्यालयाच्या प्रांगणातच याचं व्यावसायिक प्रशिक्षण मिळू लागलं आणि बघता बघता गावात प्रत्येक घरी एक खो-खोपटू तयार होऊ लागला.

आज कोणतीही अद्ययावत सुविधा उपलब्ध नसताना ग्रामीण भागातील या मुली जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर राष्ट्रीय पातळीवर खेळू लागल्या आहेत, गावासाठी आणि राज्यासाठी नाव कमावू लागल्या आहेत.

'मैदानावर आमचा दरारा असतो'

साखरवाडीच्या कामगार वसाहतीतल्या एका दहा बाय दहाच्या घरात प्रियंका राहाते. तिच्या घरात इतर कोणत्याही वस्तूपेक्षा खो-खोमध्ये कमावलेली पदकं भिंतीवर मांडलेली दिसतात.

प्रियंकामध्ये या खेळाविषयीची आवड कशी तयार झाली, ती सांगते - "चौदा वर्षीय वयोगटात खेळत असताना वेळेत न पोहोचल्यामुळे राष्ट्रीय स्तरावरील एक स्पर्धा खेळण्याची माझी संधी हुकली. तेव्हापासून मी कधीच खेळायला जाण्यास उशीर केला नाही आणि जिद्दीनं स्पर्धा जिंकत गेले. त्यामुळेच वयाची 20 वर्षं उलटण्याच्या आतच मी जानकी, वीरबाला, राणी लक्ष्मीबाई आणि शिवछत्रपतीसारखे खेळातील सर्वच पुरस्कार मिळवू शकले."

आता होतं कौतुक

करिश्मा, मुस्कान आणि खुशबू या तिघी बहिणी साखरवाडीच्या खो-खो संघात वेगवेगळ्या वयोगटातून खेळतात. सर्वांत मोठी मुलगी असलेली करिष्मा नगारजे हिने जेव्हा खो-खो खेळायला सुरुवात केली, तेव्हा तिला घरातून तर पाठिंबा मिळाला पण नातेवाईकांनी जोरदार विरोध केला.

करिष्मा सांगते, "सुरुवातीला नातेवाईक म्हणायचे की, 'मुलींना कशाला खेळायला पाठवता, तेही एवढे तोकडे कपडे घालून? सगळ्या जगासमोर खेळण्याची काय गरज? मुली खेळून काय करणार? लग्नच तर करणार ना?' आता तेच म्हणतात, चांगलं खेळतात मुली."

तिच्या या यशामुळेच दोन धाकट्या बहिणींचा मैदानाच्या दिशेनं मार्ग खुला झाला.

मुलींच्या खेळाविषयी बीबीसीशी बोलताना शहीदा नगारजे म्हणाल्या, "शाळेत खेळणाऱ्या इतर मुलींना मिळणारं यश बघून आम्हीदेखील मुलींना खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं. सुरुवातीला मोठ्या मुलीला खो-खोमध्ये सहभागी होण्यास पाठबळ दिलं."

"खेळात तिची कामगिरी चांगली होतीच. आम्ही मग इतर दोघी मुलींनाही खेळायला पाठवलं. तिन्ही मुलींच्या खेळाला प्राधान्य देत असताना आमची ओढाताण होते. मात्र पोरींचे अब्बू म्हणाले, मोठ्या झाल्यावर त्यांच्यासाठी काही तरी करायचं आहे ना, त्यापेक्षा आताच पाठिंबा दिला तर पोरींचं नशीब तरी बदलेल," असं शहीदा सांगतात.

अशी बदलली मानसिकता

पण मुलींच्या खेळाला होणारा विरोध एकट्या करिश्माच्या नशिबी नव्हता. 1996 साली जेव्हा साखरवाडीच्या शाळेत प्रशिक्षक संजय बोडरे रुजू झाले, तेव्हा खो-खोच्या खेळालाच पालकांचा विरोध होता.

"पण जसजसं मुलींनी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा जिंकायला सुरुवात केली, तसतसं आई-वडिलांना कौतुक वाटू लागलं," असं पहिल्या खेळाडूंपैकी एक असलेल्या प्रियंका भोसले यांनी बीबीसीला सांगितलं. "खेळून काय होणार? शाळेत चांगलं शिकलं पाहिजे. खेळण्यात पोरगी गुंतली तर त्याचा अभ्यासावर मोठा परिणाम होईल, असं आमच्या आईवडिलांना वाटायचं."

असा विरोध होत असताना, मुलींचा खो-खोचा सराव हा शाळेच्या वेळातच होईल आणि खेळामुळे अभ्यासात त्यांचं दुर्लक्ष होणार नाही, याची जबाबदारी बोडरे सरांनी घेतली.

वेळ आणि कामाची तडजोड झाली तरीही 'गावात कुठे मुली सर्वांसमोर चड्ड्यांमध्ये खेळतील', हा मूळ प्रश्नच लोकांच्या डोक्यातून जात नव्हता, बोडरे सर सांगतात.

त्यामुळे आधी मुली पंजाबी ड्रेस घालूनच खेळायच्या, पण त्यात खेळताना मुलींना त्रास व्हायचा, कधी त्या कुठेतरी अडखळायच्या. म्हणून त्यांना खेळण्यासाठी योग्य हाफ पॅंट आणि टी-शर्टची आवश्यकता होती.

पण मुलींना भीती होती, की कशीबशी खेळायला परवानगी देणारे पालक आता असा पोशाख सांगितला तर पूर्ण खेळच बंद करून टाकतील.

प्रशिक्षक संजय बोडरे सांगत यांनी यावर एक उपाय शोधून काढला. "मी मुलींच्या पालकांची एक बैठक बोलावली. मुलींना खेळताना जाणवत असलेली अडचण मी पालकांना सांगितली. त्यावर ते म्हणू लागले 'आता अख्ख्या गावासमोर पोरी चड्ड्या-शर्ट घालून खेळणार का? लोक काय म्हणतील?'"

मग बोडरे यांनी राष्ट्रीय स्तरावर स्पर्धांच्या मिळवलेल्या काही CD तिथे आणल्या आणि पालकांना त्या स्पर्धांमधले खेळाडूंचे व्हिडीओ दाखवले. "आपल्या मुलींना जर असा योग्य पोशाख मिळाला तर त्यासुद्धा खूप चांगलं खेळू शकतात. तेव्हा कुठे पालक तयार झाले. मात्र मुली सराव करत असताना रिकामटेकड्या पोरांना तिथं घुटमळून द्यायचं नाही, असं ठरलं. अन् खो-खोचा संघ कोणत्याही अडचणीशिवाय खेळू लागला," असं बोडरे यांनी सांगितलं.

आज मुलींच्या खो-खोमधल्या यशामुळेच गावाला मान आहे, म्हणून सध्या गावकरीही खूश आहेत.

"संजय बोडरे सरांमुळे खरंतर मुली खेळू लागल्या. सुरुवातीला लोकांना वाटायचं 'कशाचा खेळ अन् काय? पोरींनी आपली चांगली शाळा शिकावी. खेळताना पडलं, अधू झालं, तर आधीच ती पोरीची जात. कोण तिला बघणार?' अशी आमची समजूत होती. पण जेव्हा पोरी स्पर्धा जिंकू लागल्या, पंचक्रोशीत साखरवाडीच्या नावाची चर्चा होऊ लागली, तेव्हा गावातील लोकांना चांगलं वाटू लागलं. त्यानंतर कुणीही मुलींच्या खेळण्याला विरोध केला नाही."

कडधान्यातूनच पोषक आहार

मुलींची खेळात प्रगती होत असताना, गरज होती ती योग्य आणि पोषक आहाराची. बऱ्याच खेळाडू मुली या कामगार वसाहतीत राहणाऱ्या होत्या, त्यामुळे आहारात कायम कडधान्य आणि पालेभाज्यांचा समावेश होता.

प्रत्येकीला सुकामेव्याचा आहार घेणं शक्य नव्हतं. मात्र उपलब्ध कडधान्यांना मोड आणून त्यांचा आहारात योग्य पद्धतीने समावेश केला गेला. विशेष म्हणजे, हा अत्यंत कमी खर्चात आणि सहज शेतात उपलब्ध असणारा आहार होता.

दररोज सकाळी शाळा भरण्याच्या दोन तास आधी आणि शाळा सुटल्यानंतर तास-दीड तास मुलींचा सराव सुरू झाला. सुरुवातीच्या काही महिन्यातच जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत मुलींनी बाजी मारली. बक्षिसं मिळाली तेव्हा गावातील लोकांना चांगलं वाटलं.

सुरुवातीपासून मिळालेल्या या यशाचा आलेख चढताच राहिला आहे. आज साखरवाडी विद्यालयातून लहान, मध्यम आणि मोठ्या वयोगटातल्या मुलींचे संघ खेळतात.

आणि हे सगळं घडू लागलं ते प्रशिक्षक संजय बोडरे यांच्या गावात आगमनानंतरच. म्हणून त्यांना उत्कृष्ट प्रशिक्षणासाठी वयाच्या 37व्या वर्षीच महाराष्ट्र शासनाच्या दादोजी कोंडदेव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

"आजवर एवढ्या कमी वयात दादोजी कोंडदेव पुरस्कार मिळवणारा मी पहिला प्रशिक्षक आहे," असं पुरस्कार चिन्हाकडे पाहून बोडरे सांगतात. एरवी बोलताना अत्यंत मृदू स्वभावाचे वाटणारे बोडरे मैदानावर सरावादरम्यान प्रशिक्षकाच्या भूमिकेत जातात तेव्हा अत्यंत कडक आणि शिस्तप्रिय असल्याचं जाणवतं.

आज साखरवाडीमधील साखर वसाहतीत आणि गावातील अनेक घरांमध्ये भिंतींवर ठेवलेल्या पदकांची रांग, हे चित्र सहजपणे बघायला मिळू लागलं आहे. खो-खो खेळातील स्वत:चेच अनेक विक्रम साखरवाडी गावानं मोडले आहेत. शिवछत्रपती आणि दादोजी कोंडदेव हे राज्यस्तरावरील प्रतिष्ठित सन्मान एकाच वर्षी गावात आले.

शिक्षणाबरोबरच उत्कृष्ट खेळाची सांगड घालता येते, हे गावानं दाखवून दिलं आहे. या साखरवाडीत तयार झालेल्या शंभरहून अधिक राष्ट्रीय खेळाडूंपैकी अनेक जण आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आज प्रशासनात कार्यरतही आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)