You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शेतकरी विधवांचा संघर्ष : 'लेकरं डोळ्यासमोर आली की जगण्याचा मार्ग सापडतो'
- Author, निरंजन छानवाल
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
पतीनं आत्महत्या केली. बाहेरच्या जगाची काहीच माहिती नाही. अशा सगळ्या अडचणींवर मात करत या तिघींनी दाखवला जगण्याचा मार्ग.
"आधी घराबाहेर पडत नव्हते. त्यांच्या जाण्यानं आमच्यावर संकट कोसळलं. आता माझ्याशिवाय घर कोण चालवणार? कोरडवाहू शेतीतून काही निघत नाही. मग कधीकधी लोकांच्या शेतातही मजुरीला जावं लागतं," सारिका सांगत होत्या.
कर्जामुळे शेतकरी पतीनं आत्महत्या केली. त्यावेळी सारिका गरोदर होत्या. तीन मुलांची जबाबदारी अंगावर येऊन पडली. घरी अडीच- तीन एकर कोरडवाहू शेती आहे. मोठी मुलगी आठवीत शिकते.
कळंब शहरातून लातूरकडे जाताना खडकी आणि करंजकल्ला ही दोन गावं लागतात. हा मांजरा धरणाच्या बॅकवॉटरचा परिसर.
करंजकल्लामध्ये आम्हाला सारिका परमेश्वर पवार भेटल्या. साधारणतः 29-30 वर्षं वय. दोन मुली, एक मुलगा आणि सासू-सासरे- असं सहा जणाचं कुटूंब.
"दोन वर्षं दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीतून फारसं काही हाती लागलं नाही. त्यात बँकेचं आणि नातेवाईकांचं कर्ज होतं. डिसेंबर 2014 मध्ये यांनी (पती परमेश्वर पवार) आत्महत्या केली," सारिकाताई सांगत होत्या.
सरकार दरबारी शेतकरी आत्महत्येची नोंद झाली. पती गेल्यानंतर सारिका यांचा खरा संघर्ष सुरू झाला. वयोवृद्ध सासू सासऱ्यांसह तीन मुलांची जबाबदारी अंगावर येऊन पडली. कोरडवाहू शेतीवर सगळा गाडा उभा आहे.
"कोरडवाहू शेतीतून काही निघत नाही. मागच्या वेळेस सोयाबीन लावलं. सगळं करून हातात पाच-सहा हजार रुपये पडले. नोकरी करावीशी वाटते. पण मुलं लहान असल्यानं येऊन-जाऊन करता येईल अशी नोकरी मिळायला पाहिजे ना!" शिक्षण नववीपर्यंत झालं असलं तरी सारिका यांना नोकरी करायची इच्छा आहे.
"घरखर्च, लेकरांचा खर्च, आजारपण अशा सगळ्या गोष्टी आहेत. त्यांनी आत्महत्या करायला नको होती. माझ्यासारख्या अवेळी संसाराची जबाबदारी येऊन पडलेल्या अनेक मुली आहेत. जगणं खूप अवघड आहे. पण मी नाही यांचं करणार तर कोण करणार?" सारीकाताई सांगतात.
घरच्या शेतीत कष्ट घेताना कुटुंबाची जबाबदारीही त्या तितक्याच सक्षमपणे उचलतं असल्याचं त्यांच्या बोलण्यातून जाणवलं.
"आपल्याला कितीही कष्ट पडले तरी लेकरांना काही कमी पडू द्यायचं नाही. कधीकधी सगळ्याचा कंटाळा येतो. नकोसं वाटतं. पण लेकरं डोळ्यासमोर आली की जगण्याचा मार्ग सापडतो," सारीका म्हणाल्या.
किराणा दुकान टाकलं
पाच वर्षांपूर्वी अंबिका कदम यांचे पती संतोष कदम यांनी आत्महत्या केली. करंजकल्ला गावाच्याच अलीकडे खडकी गाव आहे. या गावात अंबिका यांचं किराणा दुकान आहे.
अंबिका दोन मुलांसह आईसोबत इथे राहतात. मोठी मुलगी आठवीत शिकते, तर मुलगा सहावीत आहे.
तीन एकर शेती होती. त्यातली आता फक्त 18 गुंठे शेती राहिली आहे. ते सासरे बघतात. शेतकरी आत्महत्या म्हणून पतीच्या आत्महत्येची नोंद झाली नाही. त्यामुळे मदतही मिळाली नाही, असं अंबिका सांगतात.
परित्यक्ता आणि विधवा महिलांचा एक बचत गट त्या चालवतात. अंबिका माहिती देतात, "पायामुळं शेतीचं काम करता येत नाही. ते (पती) गेल्यावर अनेक प्रश्न उभे राहिले. घर चालवण्यासाठी धडपड सुरू केली."
"पायानं अधू असल्यानं शेतीकाम करण्यात अडचणी येत होत्या. पर्याय संस्थेच्या मदतीनं बचत गट स्थापन केला. बचत गटाच्या माध्यमातून दहा हजार रुपयांचं कर्ज घेतलं. त्यावर किराणा दुकान टाकलं. त्यावरच आमचं कुटुंब चालतं.
"माझ्यासारख्या गावातील विधवा किंवा परित्यक्ता महिलांचा संसार उभा करण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत असतो.
मुलांना खूप शिकवायचं, त्यांना नोकरीला लावायचं हेच अंबिका यांचं स्वप्न आहे. सारिका आणि अंबिका यांना दोन वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळाच्या काळात हॅबिटॅट या स्वंयसेवी संस्थेतर्फे घर बांधून मिळाले.
गवंडी काम सुरू केलं
याच खडकी गावात आम्हाला सुनिता गायके भेटल्या. त्यांच्या पतीने 2007मध्ये आत्महत्या केली. अंबिका यांच्याइतक्या त्या नशीबवान नाहीत. पत्र्याचं घर पडल्यानंतर बाजूला असलेल्या दीराच्या घरात त्या दोन मुलांसह राहतात.
"पाच एकर शेती होती. ते (पती सुरेश गायके) असतानाच कर्जापायी शेती विकावी लागली. नंतर शेतमजुरी करायचो. शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद न झाल्यानं मदत मिळाली नाही. दोन्ही मुलं लहान होती," सुनिता सांगत होत्या.
सुनिता या गवंडी कामावर जातात. सिमेंट कालवण्यापासून स्लॅब टाकण्यापर्यंतची सगळी कामं त्या करतात.
"पती गेल्यानंतर कामासाठी मला घराबाहेर पडावं लागलं. आधी लोकांच्या शेतात शेतमजुरी करायची. आता गवंडी काम करते. एक दिवसही सुट्टी घ्यायला जमत नाही," सुनिता सांगत होत्या.
"आधी नुसती रडायचे. आजारी पडायचे. काय करावं कळतं नव्हतं. घरी राहून उपाशी मरण्यापेक्षा घराबाहेर पडले. समाजात चांगलं-वाईट दोन्ही असतं. विधवा महिलांकडं बघण्याचा काहींचा दृष्टिकोन वाईट असतो. मी संघर्ष केला. इथपर्यंत पोहोचले. मोठा मुलगा आता 13वीला शिकतो," सुनिता यांनी त्यांचा संघर्षपट उलगडून सांगितला.
30 गावात 665 तरुण विधवा
"उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी आणि कळंब तालुक्यात आम्ही 30 गावांचा सर्व्हे केला असता 20 ते 29 वर्षं वयोगटातील तब्बल 665 विधवा आढळल्या. शेतकरी आत्महत्या किंवा इतर कारणांनी पतीचं निधन झाल्यानं त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली," पर्याय संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्या सुनंदा खराटे यांनी माहिती दिली.
"नवऱ्याचं निधन झाल्यानंतर कामासाठी पहिल्यांदा घराबाहेर पडावं लागलेल्या महिलांची संख्या मोठी आहे. काही जणी घरचीच शेती कसत आहेत. काहींपुढे तर तोही पर्याय नाही."
"सरकारकडून विधवांना 600 रुपये पेन्शन मिळत असते. पण त्यासाठी कागदोपत्र जुळताना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. या महिलांची कागदोपत्री ओळख ही माहेरकडची असते. सासरकडचं नाव लावण्यासाठी संघर्ष करावा लागतो," सुनंदा खराटे यांनी माहिती दिली.
वारसा हक्क मिळणं आवश्यक
"शेतकरी पतीनं आत्महत्या केल्यानंतर किती महिलांना वारसा हक्काने पतीच्या नावावरची शेती तातडीने मिळते? नवऱ्याच्या नावावरची शेती तत्काळ त्या महिलेच्या नावावर करण्यास टाळाटाळ केली जाते, असं आम्हाला अनेक प्रकरणात आढळून आलं," बीडमधील सामाजिक कार्यकर्त्या मनिषा तोकले यांनी हा गंभीर मुद्दा उपस्थित केला.
"घरकुलातून घर मिळवायचं असेल तर अनेक प्रकरणात सासरचे लोक घरासाठी जागा नावावर करून देण्यास नकार देतात. वारसा हक्कासाठी सरकारने कॅंप लावले पाहिजेत," अशी मागणी त्यांनी केली.
16 वर्षांत मराठवाड्यात 6,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
मराठवाड्यात गेल्या 16 वर्षं आणि 3 महिन्यांमध्ये तब्बल 6,154 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यापैकी 2,016 शेतकऱ्यांच्या आत्महत्या या मदतीसाठी अपात्र ठरवण्यात आल्या. म्हणजेच या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सरकारतर्फे देण्यात येणारी प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत मिळालेली नाही.
शेतकरी आत्महत्येची एका मर्यादेत असलेली संख्या 2014 नंतर वाढतच गेली. मागील तीन वर्षांमध्ये मराठवाड्यात दरवर्षी साधारणतः एक हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. 2013 ते 2016 या दरम्यान मराठवाड्यात सलग दुष्काळी परिस्थिती होती.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)