You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
National Farmers' Day 2021: 'शेतकरी माय-बापाची रिटायरमेंट आम्ही साजरी केली कारण...'
- Author, प्रवीण कुमार
- Role, बीबीसी तेलुगू प्रतिनिधी
आज राष्ट्रीय शेतकरी दिवस. त्यानिमित्तानं शेतकरी आई-वडिलांची रिटायरमेंट साजरी केलेल्या मुलांची ही गोष्ट पुन्हा शेयर करत आहोत.
निवृत्ती म्हणजे वर्षानुवर्षे आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग झालेल्या कामातून बाजूला होणं. कर्मचाऱ्यांना, साहेबांना, खेळाडूंना, सैन्यात काम करणाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या वेळी जंगी निरोप दिला जातो. समारंभ आयोजित करून सन्मानित केलं जातं. मग शेतकऱ्याला का नाही?
तेलंगणाच्या खम्मम जिल्ह्यातील रघुनाधा पालम मंडळातल्या हरीया तांडा गावात नागुलू नावाचे शेतकरी राहतात. 40 वर्षं शेतीमध्ये काम केल्यानंतर, आता वडिलांनी आराम करावा असा निर्णय मुलांनी घेतला. वेगवेगळ्या नोकरी व्यवस्यात स्थिर झालेल्या तीनही मुलांनी शेतकरी वडील नागुलू यांच्या रिटायरमेंटचा दिवस साजरा करण्याचं ठरवलं.
आपली अख्खी हयात शेतीमध्ये घालवणाऱ्या या शेतकऱ्यासाठी ही बाब असामान्य होती. शेतकरी आयुष्यभर लोकांची सेवा करतात, पण कुणीही त्यांना सन्मान देत नाही, असं नागुलू यांच्या मुलांना वाटलं. मग त्यांनीच ही अनोखी कल्पना राबवण्याचा निर्णय घेतला.
29 मे 2018 रोजी एक जंगी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. सोहळ्यातील पाहुण्यांमध्ये नागुलू यांचे नातेवाईक, मित्रमंडळी आणि गावकऱ्यांचा समावेश होता.
वडिलांनी आपल्या शिक्षणासाठी घेतलेल्या कष्टांचं कौतुक म्हणून या तिघा भावांना यावेळी आई-वडिलांचा सन्मान केला. त्यांच्यामुळेच ते शिक्षण घेऊन विविध नोकरी-व्यवसायात स्थिरस्थावर होऊ शकले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
आता बाबांनी आराम करावा, असं त्या तिघांना वाटतं.
नागुलू यांचा मोठा मुलगा वियजवाडामध्ये एक्साइज कॉन्स्टेबल आहे. दुसरा मुलगा हैदराबादेत सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. तर सर्वांत लहान मुलाने नुकतंच M.A., B.Ed. केलं असून नोकरीचा शोध सुरू आहे.
नागुलू यांचा मुलगा रवी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "आम्ही तिघा भावांनी वडिलांना दिलेली ही छोटीशी भेट आहे. आमच्यासाठी आतापर्यंत त्यांनी घेतलेल्या कष्टांप्रती आमच्या भावना व्यक्त करण्यासाठीच आम्ही हा सोहळा आयोजित केला होता."
"आम्हाला स्वावलंबी बनवण्यासाठी वडिलांनी खूप कष्ट घेतले. त्यामुळेच त्यांची सेवानिवृत्ती साजरी करण्यासाठी हा सोहळा घेतला," ते म्हणाले.
"सरकारी असो किंवा खाजगी क्षेत्र असो, या क्षेत्रात काम करणारा कर्मचारी सेवानिवृत्त होताना तो दिवस साजरा करतो. पण ज्या वेळेस एखादा शेतकरी निवृत्त होतो, तेव्हा त्याच्यासाठी असा कुठलाही दिवस किंवा सोहळा नसतो, किंबहुना समाजाकडून या सेवेला तशी मान्यताही मिळालेली नाही. शेतकऱ्यांसाठीही असा सेवानिवृत्तीचा एक दिवस असावा. त्यांनाही अशी समाजमान्यता मिळावी, असं आम्हाला वाटलं म्हणून हा सोहळा साजरा करण्याचं आम्ही ठरवलं," रवी यांनी सांगितलं.
या सोहळ्यातून प्रेरणा घेऊन इतर मुलंही त्यांच्या वडिलांप्रती आदर व्यक्त करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
असा अनोखा सोहळा पार पडल्याची माहिती मिळताच तेलंगणाचे तत्कालीन कृषीमंत्री पोचाराम श्रीनिवास रेड्डी यांनी स्वतः त्यांना फोन करून आपल्या शुभेच्छा कळवल्याची माहिती रवी यांनी दिली.
कृषी खात्याचे अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहत नागुलू यांना शुभेच्छा दिल्याबद्दल त्यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केलं.
"माझ्या वडिलांकडे पूर्वजांची दीड एकर शेती आली. त्यानंतर त्यांनी मेहनतीने ही शेती कसत दहा एकरापर्यंत मजल मारली. इतक्या वर्षांपासून शेतीशी निर्माण झालेल्या नात्यापासून दूर जावं लागत असल्यानं वडील काहीसे भावूक झाले होते," रवी यांनी सांगितलं.
वयाच्या या टप्प्यावर वडिलांची काळजी घेणं, हे आमचं कर्तव्य असल्याचंही ते म्हणाले.
या सोहळ्याचे सत्कारमूर्ती नागुलू यांनाही आम्ही यावेळी बोलतं केलं.
"मी चाळीस वर्षं शेतीमध्ये पूर्णतः गुंतून गेलो होतो. माझ्या जीवनात अनेक चढ-उतार मी अनुभवले. असे अनेक प्रसंग आले जेव्हा मी शेती उत्पन्नातून नफा कमावला आणि अनेकदा गुंतवणूकही गमावून बसलो."
पण असमाधानकारक पाऊस आणि इतर आव्हानांनंतरही शेतीवरचा त्यांच्या विश्वास अजिबात कमी झाला नाही, असं ते आवर्जून सांगतात.
"जिथं मी माझं संपूर्ण आयुष्य काम केलं ते शेतीचं क्षेत्र सोडताना मला दुःख होत आहे. असं असलं तरी माझ्या मुलांनी शेतीतून आता निवृत्त होऊन आराम करण्याची केलेल्या विनंतीचा मी मान ठेवेन," असं ते म्हणाले.
जी शेती त्यांनी कसली तिचं आता काय करणार, असं विचारलं असता त्यांनी "मला आणखी शेती करायला आवडेल. पण आता मी शेती ठेक्यानं दिली आहे," अशी माहिती दिली.
"पण चिंता नाही. कारण माझ्या मुलांची लग्नं जेवढ्या धामधुमीत केली नाहीत, त्यापेक्षा जास्त मोठा सोहळा त्यांनी माझ्या रिटायरमेंटसाठी आयोजित केला," ते आनंदी होऊन सांगतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)