You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अहमदनगर : शेतकरी आत्महत्या रोखण्याची कविता सादर केली आणि वडिलांनी विष घेतलं
शेतात कष्ट करूनही तुझ्या डोक्याला ताप
बळीराजा नको करु आत्महत्या
पैसे नसूनही शाळेत शिकवता लेकरे
कसे उन्हात करतात शेती
पिक उगवणी करून मिळतात पैसे
शेती करूनही तुझ्या हाताला फोड
अरे बळीराजा नको करु आत्महत्या
हे शब्द मांडणाऱ्या प्रशांतला काही तासात आपल्यावरच ही परिस्थिती ओढवेल असं चुकूनही वाटलं नसेल. 'बळीराजा नको करू आत्महत्या' अशी कविता तिसरीत शिकणाऱ्या मुलानं शाळेत सादर केली. दुर्दैव असं त्याच रात्री त्या चिमुरड्याच्या वडिलांनी आत्महत्या केली.
कवितेत सादर केलेल्या कटू गोष्टी त्या लहानग्यावर प्रत्यक्षात ओढवल्या. अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी गावात असं होत्याचं नव्हतं झालं.
प्रशांत बटुळे असं या चिमुरड्याचं नाव. भारजवाडीतल्या हनुमाननगर इथल्या शाळेत तो तिसरीत शिकतो. प्रशांतने 'बळीराजा नको करू आत्महत्या' अशी कविता वर्गात सादर केली. दुर्दैवाने त्याच दिवशी प्रशांतच्या बाबांनी म्हणजेच मल्हारी बाबासाहेब बटुळे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली.
मल्हारी यांनी ट्रॅक्टर आणि शेतीसाठी बँकेतून कर्ज घेतलं होतं. अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान झालं. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला.
बटुळे कुटुंबीयांना काय मदत करता येईल यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. या विषयावर सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक आयोजित केली आहे.
दरम्यान बटुळे कुटुंबातील तिन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आमची असल्याचं विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केलं. भाजपतर्फे बटुळे कुटुंबीयांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.
"हा हृदय हेलावून टाकणारा प्रसंग आहे. सरकार कर्जमाफी करत असताना शेतकरी आत्महत्या होत आहेत. यावर विचार होणं गरजेचं आहे. सरसकट कर्जमाफी झाली असती तर ही वेळ आली नसती. सरकारने सरसकट कर्जमाफी न केल्याने ही आत्महत्या झाली आहे," असं दरेकर यांनी म्हटलंय.
प्रशांतने मराठी मातृभाषा दिनानिमित्त भारजवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत काव्यवाचन स्पर्धेत ही कविता सादर केली होती.
ही कविता स्वत: प्रशांतने लिहिली होती. प्रशांतने शेतकऱ्यांना या कवितेच्या माध्यमातून आत्महत्या न करण्याचा सल्ला दिला. मात्र, त्याच रात्री त्याच्या शेतकरी वडीलांनी विष प्राशन करून आपलं जीवन संपवलं. या घटनेमुळे संपूर्ण भारजवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)