You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
‘शेतकरी बाप आत्महत्या करतो तेव्हा लेकीवर काय बितते, कसं सांगावं…’
वडिलांनी आत्महत्या केल्यानंतर काय वाटतं? दुःख? नाही, प्रचंड अपराधी वाटतं. आपले वडील गेले आणि आपण ते थांबवू शकलो नाही, आपल्या वडिलांना हे पटवून देऊ शकलो नाही की या जगात जगण्यासाठी अनेक गोष्टी आहेत. दुनिया काही का म्हणेना आम्ही आहोत तुमच्या पाठीशी.
शेतकऱ्याने आत्महत्या केली की कोरड्या बातम्या होतात, सरकारी आकडे येतात, राजकीय पक्ष राजकारण करायला पाहातात, पण कधी जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय बापाविना वाढणाऱ्या पोरीचं, शेतकऱ्याच्या लेकीचं मन?
आज कोडगं झालंय हे मन, लोकांचे टोमणे ऐकून. एकट्या आईला होणारा त्रास पाहून. लोक म्हणतात तुमच्या वडिलांनी आत्महत्या केली ही तुमची चुक आहे. तुम्हीच त्यांना टेन्शन दिलंत.
आता त्यांना काय सांगणार, की आपले वडील कधी गळ्याला फास लावतील किंवा कधी विष पिऊन आत्महत्या करतील याचा भरोसा नाही हे सतत जाणवणं, त्या दडपणाखाली जगणं म्हणजे काय असतं.
आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर प्रत्येक स्त्रीला कठीण प्रसांगाना सामोरं जावं लागतं. त्यावेळी तिच्या मनावर होणाऱ्या परिणामांचा क्वचितच कुणी विचार करतं. 'बाईचं मन' या मालिकेतून आम्ही तिच्या मनात डोकावून पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. शेतकरी बाप आत्महत्या करतो तेव्हा लेकीला याची चाहुल लागलेली असते का? तिच्या मनात काय काहूर माजलेलं असतं? वडिलांनी आत्महत्या केल्यानंतर तिला काय वाटतं? ती या गोष्टीला कशी सामोरी जाते? तिला कशा प्रकारचा त्रास होतो ? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा या लेखात प्रयत्न केला आहे.
माझं नाव उज्ज्वला जनार्दन उइके. यवतमाळ जिल्ह्यात जरूर नावाचं माझं छोटसं गाव आहे. एरवी कोणाचं लक्षही जाणार नाही या गावाकडे, पण याच गावाचं नाव पेपरमध्ये आलं पुन्हा पुन्हा, चॅनलवर दिसलं, मोठे मोठे पुढारी येऊन गेले इथे, अनेकांनी या गावातल्या समस्येवर चर्चासत्र भरवली. कारण? या गावातल्या एका घरातल्या तीन शेतकऱ्यांनी एका पाठोपाठ एक आत्महत्या केल्या. ते घर माझं होतं.
एखाद्या वाईट, भयानक स्वप्नासारखं आयुष्य चाललंय. माणसाला वाईटाची चाहूल लागते म्हणतात ना, तसं काहीसं माझं झालं होतं.
आधी मोठ्या काकांनी शेतीच्या कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. अशोक उईके नाव त्यांचं. काकांची तीन एकर कोरडवाहू शेती होती, पण त्यात घरचं भागायचं नाही. काकू शेतमजूरीला जायची. कर्जांचा डोंगर इतका वाढत गेली की काकांना पेलवेनासा झाला, आणि एक दिवस त्यांनी विष पिऊन आत्महत्या केली. ती आमच्या घरातली पहिली आत्महत्या.
तेव्हा मनात धडकी भरली. चुलत भाऊ शेतीचं बघायला लागला. सतत एका भीतीच्या सावटाखाली आम्ही वावरायला लागलो. जरा कुठे वडील एकटे गेले, वडीलच कशाला, भाऊ, मामा, ओळखीतलं कुणीही पुरुष माणूस कोणीही बाहेर गेलं आणि वेळेत परत आलं नाही तर पोटात भला मोठा गोळा यायचा. आज तर तो दिवस नाही ना असं वाटायला लागायचं. वरचा श्वास वर आणि खालचा खाली राहायचा.
काळाने पुन्हा डाव खेळला आणि यावेळेस माझा चुलत भाऊ, सुदर्शन याला ओढून नेलं. तो शेती पाहात होता आणि त्यालाही कर्जाचा डोंगर पेलवेनासा झाला.
काकूची अवस्था भ्रमिष्टासारखी झाली. काकूचे हाल पाहावत नव्हते. पण अनिष्टाची चाहुल लागली होती. आपल्यावरही ही वेळ आली तर या विचाराने काळजाचा ठोका चुकायचा. घरची सगळी फवारणीची औषधं मी लपवून ठेवायचे. शेतात जरी फवारणी चालू असेल, तरी उरलीसुरली सगळी औषधं मी खड्डा खणून त्यात गाडून टाकायचे. एकही बाटली वडिलांच्या नजरेला पडू नये असा प्रयत्न असायचा.
काकूकडे बघून सारखं वाटायचं, असं काही आपल्याही बाबतीत तर होणार नाही ना? वडील फारसे शिकलेले नव्हते. मी सतत त्यांना धीर द्यायचे, सांगायचे बाबाजी एवढं टेन्शन नका घेऊ कर्जाचं. करू आपण काहीतरी. ते तेवढ्यापुरतं हो म्हणायचे.
माझ्या वडिलांचा स्वभाव हळवा होता. त्यांना कर्ज सहन होत नव्हतं. एकदा कापसाची गाडी लावली मार्केटला पण माल रिजेक्ट झाला. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. ते घरी आले तेव्हा गप्प गप्प होते. कापूस रिजेक्ट झाल्याचं त्यांनी सांगितलं नाही. मी त्यांना म्हटलं यावेळेस पावती दिली नाही का, तर नाही म्हणाले.
दोन तीन दिवसांनी मला जवळ बोलवून सगळे कागद दाखवले. बँकेचं किती कर्ज, सावकारचं किती, शेतीतून किती पैसा आला. आम्ही हिशोब केला, तर कर्ज फिटणार नव्हतंच. मी म्हटलं काळजी करू नका, पुढच्या वर्षी फेडू, जास्त व्याज भरू. तेव्हा काही बोलले नाहीत.
नंतर आठ दिवस फारसं बोलले नाहीत कोणाशी, माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती, पण तरी मी म्हटलं माझ्याच्या मनात वाईट विचार येतात. असं काही नसेल.
तुरीवर औषध फवारणी चालू होती. मला माहितीच नव्हतं. वडिलांनी सांगितलंही नाही. एके दिवशी सकाळी वडील शेताकडे गेले, आणि परत आले नाहीत. दुपारी एक वाजता आम्हाला कळालं. ज्या अघटिताची भीती माझ्या मनात घट्ट रुतली होती, ते घडलं.
बाबाजींनी एकदा मनातला सल बोलून दाखवला असता, एकदा माझ्याशी बोलले असते तर... या विचाराने रात्र रात्र डोळा लागत नाही. दोन वर्षं झाले त्यांना आत्महत्या करून पण अजूनही वाटतं, बाबाजी एकदा बोला ना माझ्याशी, सांगा तरी मी कुठे कमी पडले? लहानपणी तुम्ही होतात चुकलं तर सावरायला, आता फाटलेलं आयुष्य कसं सावरू? तुम्हाला जाण्यापासून थांबवू शकले नाही हा गिल्ट घेऊन आयुष्यभर कसं जगू? शेतकरी बाप आत्महत्या करतो तेव्हा लेकीवर बितते, कसं सांगावं…
बाबाजी, तुम्हाला माहितेय ना आईला कमी ऐकायला येतं. तिला आजकाल काही समजत पण नाही. घराची जबाबदारी माझ्यावर आहे. तुम्ही गेलात तेव्हा फायनल इयरची परिक्षा होती, तेव्हा शिक्षण सुटलं ते सुटलंच. आता आई आणि मी शेतमजूरीला जातो.
बापाविना लेक असली की काय काय ऐकवं लागतं. आम्ही तर दोघी, अनिता आणि मी. बाबाजी घरात पुरुष माणूस नसला की लोक कसंही वागतात. कधी कधी ऐकवत नाही इतकं घाण घाण बोलतात. टोमणे मारतात. म्हणतात, तुम्हाला मिळाले सरकारकडून एक लाख रूपये. मायलेक ऐश करतात आता. वडील तर गेले, आता कसलं टेन्शन. घरातल्या माणसाची कमी लाखभर रूपयांनी भरून निघते का?
इतक्यावर थांबतील ते लोक कसले. काही तर असंही म्हणतात की तुमच्यामुळेच तुमच्या वडिलांनी आत्महत्या केली. त्यांना तुमच्या लग्नाचं टेन्शन होतं, हुंड्यांचं टेन्शन होतं. त्यापायीच ते खचलं होते. बापाविना लेकीला असं ऐकवं लागतं बाबाजी. मी उसनं अवसान आणून त्यांना म्हणते खरं की, आमच्या घरात काय झालं ते आम्हाला माहीत, तुम्ही कोण बोलणारे.
पण कधी कधी वाटतं खरं बोलतायत का ते? तुम्हाला आमची धास्ती होती का? आमच्यामुळे तुम्ही असा टोकाचा निर्णय घेतला का? मग तुमच्या ऐवजी मीच का नाही गेले बाबाजी… विचार करून वेड लागायची पाळी येते.
शेतकऱ्याची लेक होते, पण शिक्षणात अडसर नको म्हणून बाबाजी तुम्ही कधी शेतात काम करायला लावलं नाही. आता दुसऱ्यांच्या शेतात मजूरी करतेय. आपली शेती होत नाही माझ्याकडून म्हणून आता विकायला काढलीये.
मागच्या पावसाळ्यात कौलं फुटली होती, मला टाकता येत नव्हती दुसरं कोणाला कौलं चढवायला सांगितलं तर त्यांची मजूरी कुठून आणू? अख्खा पावसाळा तसाच गेला. कौलातून पाणी गळत राहिलं आणि डोळ्यातूनही. आता बांधलंय घर पुन्हा. विटा वाहण्यापासून पडेल ते काम केलंय. तुम्हाला नसतं आवडलं मी अशी काम करणं. पण बिनबापाच्या लेकीला पर्याय नसतो.
तुम्ही गेलात तेव्हापासून घरात कधी तेल नसतं, कधी भाजी नसते तर कधी डाळ. पण त्याहीपेक्षा नसतो तो आधार.
सरकारी कार्यालयात खेटे घालत असते, कधी घरकुल योजनेसाठी, कधी शिलई मशीन मिळवण्यासाठी. 22-23 वर्षांची पोर म्हणून कधी कोणी मदत करतं, कधी कोणी हुसकून देतं. बरोबरीच्या पोरी पटापटा लग्न करून संसारात दंग होताना दिसतात.
आपणही लग्न करावं असा विचार मनात येतो, पण त्यालाही पैसा लागणार. तो कुठून आणू मी. लग्नाचा खर्च तर होईलच आणि हुंडा वेगळा. माझ्याच हुंड्यासाठी दुसऱ्याच्या शेतात जाऊन मजूरी करते. कधी कधी वाटतं, किती दिवस असा मनावर जू ठेवून जगत राहाणार, त्यापेक्षा संपवून टाकावं सगळं. नको आता आयुष्य हे. पण आई आणि बहीण दिसतात डोळ्यापुढे. मग पाऊल मागे घेते.
बाबाजी, तुम्हाला दिसतं का हो हे सगळं?
(शब्दांकन बीबीसी मराठी प्रतिनिधी अनघा पाठक)
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)