ब्रेकअप के बाद : 'एकदिवस भूतकाळाचं ओझं खांद्यावरून उतरेल’

ते गाणं आहे ना, फिके वाटे जग सारे, येती पुन्हा पुन्हा साऱ्या आठवणी... ब्रेकअप के बाद! तसं काहीसं झालंय माझं. इतकी वर्षं होऊन गेली तरी मध्येच हताश वाटतं, रिकामं रिकामं वाटतं, कधी कधी वाटतं संपवून टाकावं आयुष्य. लोक याला प्रेम म्हणतील, माझे डॉक्टर मला क्लीनिकली डिप्रेस्ड म्हणतात.

माझं नाव... काहीही सांगितलं तरी काय बिघडतं, कारण जी काय थोडीफार मानसिक शांतता शिल्लक आहे, माझी नाहीच, माझ्या घरच्यांची, त्यासाठी मी माझं खरं नाव सांगणार नाही. नाव, गाव असं समजलं की बाकीची माहिती काढणं अवघड नसतं.

आज माझं वय 30 झालंय, मुलगी नाही, बाईच झालेय मी. गेल्या काही वर्षांपासून एकटी राहातेय. तुम्हाला प्रश्न पडले असतील त्यांची उत्तरं - नाही, लग्न केलं नाही. हो, घरचे अनेकदा मागे लागले होते, भांडणं झाली पण लग्न केलं नाही.

कारण करायची हिंमतच झाली नाही. आधी वाटायचं की माझं प्रेम ज्या मुलावर होतं, त्याच्याशी लग्न झालं नाही, माझ्या परिकथेचा शेवट 'आणि ते सुखात राहू लागले' असा झाला नाही, म्हणून त्या अधुऱ्या प्रेमासाठी मी लग्न केलं नाही.

पण मनात कुठेतरी माहीत होतं, हेच कारण नाहीये. रिलेशनशिप्सची इतकी भयंकर भीती बसली आहे, की आता वाटतं नाही, पुढे आयुष्यात दुसऱ्या कोणासोबत राहाता येईल किंवा कोणाशी जुळवून घेता येईल.

आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर प्रत्येक स्त्रीला कठीण प्रसांगाना सामोरं जावं लागतं. त्यावेळी तिच्या मनावर होणाऱ्या परिणामांचा क्वचितच कुणी विचार करतं. 'बाईचं मन' या मालिकेतून आम्ही तिच्या मनात डोकावून पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. हा लेख एक भाग आहे. या सीरिजचा भाग आहे. प्रेमभंग झाल्यानंतर एखाद्या तरूण मुलीच्या मनात काय चालतं? ती कोणकोणत्या प्रसंगातून जाते, एका नात्याचा अंत झाल्यानंतर ती परत दुसरं नातं स्वीकारू शकते का हे जाणण्याचा यात प्रयत्न केला आहे.

मी वयाच्या 18 व्या वर्षी धाडकन प्रेमात पडले, आणि अधून-मधून पडत राहिले. वय वाढलं तसं लक्षात आलं की क्रश असला तरी तो आपल्यासाठी योग्य मुलगा असेलच असं नाही.

मग 22व्या वर्षी भेटला आकाश (अर्थातच त्याचंही हे खरं नाव नाही). आमचं प्रेम कसं जुळलं, आम्ही रिलेशनशिपमध्ये कसे आलो हा या लेखाचा विषय नाही त्यामुळे ते सांगत बसत नाही. इतकंच की तो मला पाहाता क्षणी आवडला आणि रप्पकन प्रेमात पडले.

आम्ही इंजिनिअरिंग करायला आपआपली गावं सोडून मोठ्या शहरात आलोच होतो. नव्या शहरातलं नवं स्वातंत्र्य, नवं नातं झिंग आणणारं होतं. स्वतःच्या गावात असणारी बंधन नव्हती, पप्पा पाहातील, मावशीच्या एरियात जायला नको अशी भीती नव्हती.

एकमेकांबरोबर फिरून फिरून दमलो तेव्हा ठरवलं की एकत्र राहायचं. लिव्ह-इनचा फंडा तेव्हा नवा नवा आला होता, त्याचं आकर्षण होतंच. दोघांना एकत्र राहाता यावं म्हणून खोटं बोललो, खूप जुगाड केले आणि एकदाची रूम मिळाली.

आता एकत्र असण्याला कोणतंही बंधन नव्हतं, अडथळा नव्हता. सुरुवातीला खूप भारी वाटलं, असं वाटलं प्रेमाचं फलित हेच. पण नंतर बिनसायला लागल्या गोष्टी.

कविता संपून कोरड्या सूचना शिल्लक राहायला लागल्या. आमच्या नात्याबद्दल इतरांशी खोटं बोलता बोलता तो खोटेपणा आमच्या नात्यात कधी उतरला कळलंच नाही.

'कचाकचा भांडायचो आणि परत एकत्र व्हायचो'

कळलं होतं की नातं मरतंय, पण वळत नव्हतं. का कुणास ठाऊक एकमेकांना घट्ट पकडून ठेवायची धडपड होती. माझी जरा जास्तच. प्रेम आहे, प्रेम आहे असं वाटायचं पण होती असुरक्षितता. तू फोन का नाही उचललास, कोणाशी बोलत होतास, कुठे गेली होतीस अशा प्रश्नांनी, खरंतर भांडणांनी दिवस संपायचा.

याचा परिणाम व्हायचा तोच झाला. आमच्यातला एकजण दुसरीकडे आधार शोधणार होताच. त्याने शोधला. नोकरीनिमित्त आम्ही असेही वेगवेगळ्या शहरात राहात होतो त्यामुळे वेगळं होणं सोपंच झालं.

ब्रेकअप ऑफिशियली मीच केलं. तू मला धोका दिलास, मी तुझ्याबरोबर राहू शकत नाही, I hope you die असलं काहीबाही म्हणत.

दुनियाभरच्या लोकांचे ब्रेकअप होतात, त्यातल आपलं एक, होईल सगळं नीट मनात असे विचार यायचे. म्हणजे रीतीभातीप्रमाणे रडारड झाली, जला दे साले को म्हणून मैत्रिणींनी त्याचा फोटो जाळायला सांगितला.

आधाराला मित्रांचे खांदेही आले. फ्रेंण्ड्सनी त्यातल्या एका खांद्याला पुढचा बॉयफ्रेंड म्हणून घोषितही केलं. रिबाऊंडचं महत्त्व पटवून सांगितलं. घरच्यांनी स्थळ पाहायला सुरुवात केलीच होती.

मोठ्या मावस बहिणीने सांगितलं की प्रेमबिम सगळं आपल्या जागी ठीक असतं, पण वेळच्या वेळी लग्न झालं पाहिजे. आईवडील शोधतील आणि तुला आवडेल अशा छानशा मुलाशी लग्न कर. तेही पटलं. सगळं मार्गाला लागणार होतं पण...

मी फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घरच्यांसाठी हा शॉक होता, आजूबाजूच्यांसाठी, माझ्या ऑफिसमधल्या सहकाऱ्यांसाठी सगळ्यांसाठी हा धक्का होता, अगदी माझ्यासाठीही.

ब्रेकअप झालं म्हणून सहानुभूती देणारे आता माझ्याकडे विचित्र नजरेने पाहायला पाहायला लागले होते. ब्रेकअप झालं तर काय आभाळ कोसळलं असा प्रश्न त्यांच्या नजरेत दिसत होता.

माझ्या मेंदूलाही हा प्रश्न पडला होता, पण तरीही मला त्यातून बाहेर निघता येत नव्हतं. काय चाललं होतं माझ्या मनात?

ब्रेकअप होतं तेव्हा बाईच्या मनात काय चालतं?

इतरांना सोडा, स्वतः बाईलाच माहीत नसेल हे. ना कधी कथा कादंबऱ्यांनी सांगितलं, ना पिक्चरमध्ये पाहिलं. शरतचंद्र चट्टोपाध्यायांनी प्रियकराचं प्रेमभंगाचं दुःख चिरातन करणारा देवदास रंगवला. त्या देवदासचं दुःख लार्जर दॅन लाईफ बनून सिनेमातही उतरलं. 'अच्छा सल्ला दिया तूने मेरे प्यार का' असं म्हणणारे देसी हिरोही होते.

हिरोईनचं प्रेमभंगानंतर काय होतं हे कधी कोणी दाखवलं नाही, कधी कोणी सांगितलं नाही. हिरोईनी बिचाऱ्या लग्न करून निमूट संसार करतात. त्यांच्या मनाचं काय करायचंय? पण ज्यांचं लग्न होत नाही किंवा ज्या करत नाही त्यांचं काय?

त्यांचं कदाचित माझ्यासारखं होतं असावं. मला अजूनही तो दिवस स्पष्ट आठवत नाही ज्या दिवशी मी आत्महत्येचा प्रयत्न केला. का केला तेही आठवत नाही.

आठवतो तो उद्वेग आणि हरल्याची भावना. आदल्या दिवशी घरात माझ्या स्थळांची बोलणी चालली होती आणि दुसऱ्या दिवशी मी फिनाईल प्यायलं.

गैरसमज नको, मला लग्नासाठी कोणी जबरदस्ती केली नाही, खरंतर मलाच वाटलं मी आनंदाने लग्न करेन. पण दुसऱ्या दिवशी कुठल्या भरात मी असं केलं?

त्या दिवसांपर्यंत नॉर्मल असणारं आयुष्य बदलून गेलं. लोकांची कुजबूज कानावर पडायची. आईवडील धास्तावलेले असायचे. नातेवाईकांच्या चेहऱ्यावर सरळ दिसायचं की मी माझ्या आईवडिलांना कसं छळतेय. पण मला काय वाटायचं?

मेंदूला मुंग्या आल्यासारखं व्हायचं. काय खातेय, काय पितेय याचं भान नव्हतं. कोणी खायला दिलं नसतं तर खाल्लंही नसतं. झोंबी झाला होता नुसता.

हॉस्पिटलमधून घरी आल्यावर गोष्टी नॉर्मलला येतील असं वाटलं. मला स्वतःलाही वाटलं होतं. पण पूर्वीसारखं झालंच नाही काही. आधी घरचे सहानुभूतीने बघायचे, मग तिरस्काराने पाहायला लागले आणि सरते शेवटी पर्वा नसल्यासारखे.

दिवस दिवस अंथरूणातून उठावंस वाटायचं नाही. काही करावसं वाटायचं नाही. एकटक भिंतीकडे पाहात बसायचे. मोठ्या शहरातला चांगल्या पगाराचा जॉब सुटला होता. घरात काही करायचे नाही, कुठे जायचे नाही, कोणी आलंच तर असली कसली मुलगी तुमच्या नशिबात अशा नजरेने आईवडिलांकडे बघायचे.

आयुष्य खुंटल्यासारखं झालं होतं, शेवाळं साठलेल्या पाण्यासारखं. जिंवत होते पण जगत नव्हते. आरशात स्वतःला पाहायचे तेव्हा भूत दिसायचं स्वतःचंच.

बरोबरीच्या मैत्रिणींची, मैत्रिणींचीच काय मित्रांचीही लग्न पटापट होत गेली. आकाशचंही झालं. लग्न म्हणजेच सगळं काही असं मला वाटत नव्हतं पण आयुष्यभर एकटंही राहायचं नव्हतं.

एकटेपणाची भीती मनात बसली. रात्री वाईट स्वप्नं पडायची आणि मी किंचाळून उठायचे. पण कोणाशी बोलण्याची, नातं जोडण्याचीही भयानक भीती बसली होती.

एका विलक्षण ट्रॅपमध्ये अडकले होते. आयुष्य संपवायचे विचार पुन्हा मनात घोळू लागले. पण भावाला काय वाटलं कोणास ठाऊक, मला मोठ्या शहरात एका नामांकित सायकॅट्रिस्टकडे घेऊन गेला.

डॉक्टरांनी काउन्सिलिंग सुरू केलं, गोळ्या -औषधं चालू झाली. वर्षभर ट्रीटमेंट झाली तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं तुझ्या आवडीची एक गोष्ट कर. तेव्हा तीन वर्षांनी पहिल्यांदा निळ्या रंगाचा कुर्ता घेतला.

आकाशला आवडायचा नाही तो रंग. त्याला आवडणाऱ्या गोष्टी पाहिल्या तरी त्याची आठवण यायची, न आवडणाऱ्या गोष्टी पाहिल्या तरी मन सुन्न व्हायचं.

हळूहळू त्रास कमी व्हायला लागला. थेरेपी चालूच होती. मग घरचे म्हणाले काम शोध मन रमेल. आता आमच्याच शहरात एका छोट्या कंपनीत जॉब करते. आधीचा जॉब सोडला तेव्हा करियर ऐन भरात होतं. पण असो.

रोज घराबाहेर पडायला लागले, तसं आपण कमीत कमी प्रेझेंटेबल दिसतोय ना याची काळजी घ्यायला लागले. केसांना रोज कंगवा लागयला लागला. घरी येता येता कधी भाजी आणणं, कधी दळण अशी घरची कामं करायला लागले. रात्री झोप लागायला लागली, औषधांचा डोस कमी झाला.

नाही, अजूनही माझ्या आयुष्यात सगळं काही आलबेल नाहीये. मधून अधून येतात झटके, भीती वाटते, किंचाळावसं वाटतं, पण आता त्या जागेवरून स्वतःला मागे खेचून आणण्याची ताकद आलीये.

एकदा मोटिव्हेशनल कोट वाचला होता, 'एक दिवस येईल, जेव्हा तुमच्या भूतकाळाचं ओझं तुमच्या खांद्यावरून अचानक उतरेल, आणि तुम्ही त्या भूतकाळाच्या भूतापासून स्वतंत्र व्हाल.' तो दिवस येईल याची वाट पाहातेय.

(लेखिकेच्या विनंतीवरून लेखिकेचं नाव गुप्त ठेवण्यात आलं आहे. या लेखातले विचार लेखिकेचे वैयक्तिक आहेत. शब्दांकन बीबीसी मराठी प्रतिनिधी अनघा पाठक)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)