महापूर ओसरला पण डोळ्यांतला पूर ओसरेना...

    • Author, ओंकार करंबेळकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

मीनाक्षी कुलकर्णी... गेल्या अनेक पिढ्या खिद्रापुरात राहणाऱ्या कुटुंबापैकीच त्यांचंही एक कुटुंब. 2019 च्या ऑगस्ट महिन्यात दोन दिवसांसाठी कार्यक्रमाला गावाबाहेर गेल्या आणि आपलं गाव पुराच्या पाण्याखाली गेल्याचं त्यांना समजलं.

सुरुवातीला तीन आठवडे त्यांना गावात येताच आलं नाही. आणि गावात आल्या ते सगळं होत्याचं नव्हतं झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. पुरामुळे त्यांचं घरच कोसळलं नाही तर ते सर्वांनाच खचवणारंही होतं.

कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील खिद्रापूरसारखी अनेक गावं आताशा पुराच्या तडाख्यातून सावरत आहेत. कोल्हापूरपासून तासाभराच्या अंतरावर असलेल्या खिद्रापूरला कृष्णा नदीनं तिन्ही बाजूंनी वेढलं आहे. सुपीक मातीच्या वरदानाबरोबर गावाला पुराचा धोकाही कायमचाच असतो.

2005 साली पुरामुळं झालेलं नुकसान लोकांच्या स्मरणात होतंच मात्र गेल्यावर्षीच्या पुरामुळे मात्र संपूर्ण पंचक्रोशीला तडाखा बसला.

नदीपासून अगदी काही फुटांच्या अंतरावर असलेल्या प्राचीन कोपेश्वर मंदिराच्या आवारात मीनाक्षी कुलकर्णी यांचं घर आहे. दोन दिवसांच्या कार्यक्रमासाठी त्या गावाबाहेर गेल्या होत्या. पावसाच्या आणि पुराच्या बातम्या त्यांना समजत होत्या. परंतु 2005 साली पुराचं पाणी त्यांच्या घराच्या जोत्यापर्यंत आलं होतं. यावर्षीही तसंच होईल असं त्यांना वाटलं. पण 2019च्या पुरानं सर्वांचेच अंदाज चुकवले.

खिद्रापूर गावातल्या लोकांनी 2005 च्या पुराला प्रमाण मानणं चुकीचं ठरलं. मीनाक्षी यांच्याबरोबर आजूबाजूची सगळी घरं पाण्याखाली गेली. पुढे तीन आठवडे त्यांना गावात येताही आलं नाही की घराची काय अवस्था झाली असेल हे पाहाताही आलं नाही.

यावेळेस कृष्णामाईनं मुक्काम वाढवला आणि घर पूर्णच कोसळलं. मीनाक्षीताईंच्या घरातल्या वस्तूंबरोबर त्यांच्या घरी शेजाऱ्यांनी ठेवलेलं धान्यही भिजून गेलं.

मीनाक्षीताई खिद्रापूरमध्ये अंगणवाडी सेविका म्हणून काम पाहातात. इतकी वर्षं केलेलं काम आता केवळ घर नाही म्हणून सोडणं त्यांच्या जीवावर येऊ लागलं. पण घर नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना आता कोल्हापुरातच राहाणं भाग होतं. त्यामुळे मीनाक्षीताईंच्या राहाण्याचा प्रश्न निर्माण झाला. शेवटी त्यांनी शेजाऱ्यांच्या घरात राहाण्याचा निर्णय घेतला.

गेले चार पाच महिने त्या शेजारच्या कुटुंबात राहात आहेत. "घरातले बाकीचे सगळे दुसरीकडे आणि मी एकटीच इकडे ही भावना त्यांच्याबरोबर कुटुंबीयांनाही त्रास देणारी आहे", असं त्या सांगतात.

आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर प्रत्येक स्त्रीला कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागतं. त्यावेळी तिच्या मनावर होणाऱ्या परिणामांचा क्वचितच कुणी विचार करतं. 'बाईचं मन' या मालिकेतून आम्ही तिच्या मनात डोकावून पाहण्याचा प्रयत्न करत आहोत.

"हे घर पुन्हा बांधण्याचा अजून निर्णय झालेला नाही. कोसळलेल्या भिंती आणि छप्पर पाहता आता ते सगळं दुरुस्तीच्या पलीकडे गेलंय असं दिसतं. पूर्ण नव्याने घर बांधावं लागेल", असं त्या सांगतात. बोलताबोलता त्यांच्या डोळ्यांतून अचानक अश्रू येऊ लागतात आणि त्या पदराने डोळे पुसू लागतात. मीनाक्षी यांच्याप्रमाणे गावातल्या अनेक घरांची अशी स्थिती झाली आहे.

कित्येक लोकांचं धान्य आणि संसारोपयोगी साहित्याचं नुकसान झालं आहे. काही वस्तूंची, धान्याची मदत पुराच्यावेळेस बाहेरुन मिळाली. जवळच्या गुरुदत्त साखर कारखान्यामध्ये छावणीही उभारली होती मात्र घरांचे, जनावरांचे झालेले नुकसान भरुन न येणारं आहे.

आपलं राहतं घर आठ-दहा दिवस पाण्याखाली गेलेलं आजही लोकांच्या डोळ्यांसमोर येतं. पुराच्या काळामध्ये लोकांचं लक्ष थोडं दुसरीकडे जावं म्हणून साखर कारखान्यातर्फे करमणुकीचे कार्यक्रम आणि चित्रपटही दाखवले गेले तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फेही एक शिबीर घेण्यात आलं होतं.

आता फक्त वस्तूरुपी मदतीऐवजी पूरग्रस्तांना त्यांच्या वाहून गेलेल्या कागदपत्रांची पुननिर्मिती, घरं उभारण्यासाठी मदत तसेच मानसिकदृष्ट्या आधार देण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. पुराचं पाणी ओसरलं तरी मनातल्या दुःखाची भावना दूर करणं तितकं सोपं नसतं हे जाणवतं.

2005 च्या पुरापेक्षा भयावह स्थिती- डॉ. मनोज गायकवाड, श्री गुरुदत्त शुगर्स लि.

2005 साली आलेल्या पुरापेक्षा गेल्या वर्षी आलेल्या पुराने जास्त नुकसान केलं. बहुतांश गावकऱ्यांना 2005 पेक्षा जास्त पूर येणार नाही असं वाटत होतं. परंतु सगळ्यांचाच अंदाज चुकला. बस्तवाड, खिद्रापूर इथल्या लोकांना बोटीतून बाहेर काढावं लागलं.

पुराचं पाणी पाहून आणि आपली घरं पडली आहेत हे जेव्हा लोकांना समजायचं तेव्हा त्यांची स्थिती हातपाय गळाल्यासारखी व्हायची. त्यांना धीर देऊन कारखान्याच्या कॅम्पमध्ये नेण्यात येई.

कॅम्पमधल्या लोकांना गाण्यांच्या कार्यक्रमात थोडावेळ गुंतवून पुराच्या विचारांपासून थोडं दूर नेण्याचा प्रयत्न केले गेले. पूर ओसरल्यावर गावागावांमध्ये आरोग्य शिबिरंही घेण्यात आली परंतु लोकांना आजही मानसिक आधाराची गरज आहे असं दिसून येतं.

पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडू नका

पूर, भूकंपासारख्या सर्वनाश करणाऱ्या आपत्तीनंतर आर्थिक मदतीबरोबरच मानसिक आधाराची गरज असल्याचं मत मनोविकारतज्ज्ञ डॉ. प्रदीप पाटकर व्यक्त करतात. डॉ. पाटकर यांनी आपल्या 'चिंता, स्वरुप आणि उपाय' या पुस्तकात PTSD (Post Traumatic Stress Disorder) वर चर्चा केली आहे.

ते लिहितात, "पुरात झालेल्या झालेल्या नुकसानीच्या कितीतरी पट अधिक नुकसान या ताणतणावापायी होत राहाते. याची दखल पुनर्वसनाच्या धोरणाने घ्यायला हवी. साध्यासुध्या माणसांच्या- मित्र, शेजारी, नातेवाईक यांच्या साहाय्याने पी.टी.एस.डी थांबवता येईल."

पूरग्रस्तांना अशा आघातातून बाहेर काढण्यासाठी काय केलं पाहिजे याबद्दल ते लिहितात, "पूरग्रस्तांना नंतर एकटे सोडून देण्याऐवजी मदत करणाऱ्या संस्थांनी त्यापुढील काही काळ किमान 8 महिने त्यांना सोबत व सहाय्य करत राहिले पाहिजे. त्यांच्या मनातील शोकाला, दुःखाला वाट करुन देणे, त्यांच्या विश्रांतीकडे (स्वयंसेवकांच्याही विश्रांतीकडे), पोषणाकडे, आरोग्याकडे, करमणुकीकडे व कामावरील पुनर्स्थापनाकडे लक्ष द्यायला हवे. कागदपत्रे व नुकसानभरपाई मिळवणे यात मदत करायला हवी.

कुठल्याही समाजात विशेष लक्ष पुरवावे लागते, त्या समाज घटकांकडे-अनाथ, एकाकी, अपंग माणसे, वृद्ध स्त्रिया, मनोरुग्ण व विशेषतः मुले यांच्याकडे- विशेष लक्ष पुरवून त्यांच्या मानसिकतेला योग्य ती मदत पुरवली पाहिजे."

PTSDचं प्रमाण आणि लक्षणं

कोणत्याही घटनेचे किंवा आपत्ती, आघातामुळे येणारा ताण सर्वांनाच येतो. त्यातही पुरुषांपेक्षा महिलांमध्ये PTSD चं प्रमाण जास्त असल्याचं काही अभ्यासक सांगतात. सायकॉलॉजी टुडेसाठी मानसशास्त्रज्ञ मेलेनी ग्रीनबर्ग यांनी Why Women Have Higher Rates of PTSD Than Man या निबंधामध्ये PTSD च्या लक्षणांवर चर्चा केली आहे. एखाद्या आपत्ती किंवा कोणत्याही घटनेचा धक्का बसल्यावर अनेक लक्षणे पुरुष आणि महिलांमध्ये दिसून येतात असं त्या सांगतात.

अजूनसुद्धा आपत्ती, संकट सुरु आहे असं वाटणं, दुःखद स्वप्न पडणं, त्या घटनेच्या आठवणी येणं, संकटासंबंधीच्या भावना सतत मनात येणं अशी लक्षणं असतात त्याला 'रि-एक्सपिअरिअन्सिंग सिम्टम्स' (पुनःअनुभवात्मक लक्षणं) असं त्या म्हणतात.

संकटाच्या किंवा ज्यामुळे धक्का बसला आहे त्या आठवणी टाळणं, त्याबद्दल विचार टाळणं, लोकांना किंवा एखाद्या जागेला टाळणं अशाप्रकारच्या लक्षणांना त्या अव्हॉयडन्स सिम्टम्स (टाळाटाळीची लक्षणं) म्हणतात.

चिंता करणे, राग येणे, संतापाचा विस्फोट होणं, झोपेत अडथळे येणे याला त्या 'अरोउजल अँड रिअक्टिव्हिटी सिम्टम्स' (उत्तेजित आणि प्रतिक्रियात्मक लक्षणं) म्हणतात. त्यानंतरच्या लक्षणांना त्यांनी 'कॉग्निशन अँड मूड सिम्टम्स' (अनुभूती आणि मनस्थिती/ मनाचा कल) असे म्हटले आहे. त्यामध्ये नकारात्मक भावना, नकारात्मक विचार, स्वतःला विनाकारण दोष देणे, अपराधीपणाची भावना, एखादी घटना आठवण्यात अडथळा येणे, स्वतःला किंवा जगाला नकारात्मक दृष्टीने पाहाणे, रोजच्या आयुष्यात रस न वाटणे यांचा समावेश होतो.

यापैकी कोणतीही लक्षणं एका महिन्यापेक्षा जास्त काळ दिसून आली तर त्या व्यक्तीने उपचारांसाठी मदत घेतली पाहिजे असे मेलेनी ग्रीनबर्ग या निबंधात म्हणतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर