महापुराचं संकट टाळण्यासाठी पावसाचा अचूक अंदाज वर्तविणे शक्य आहे?

    • Author, हर्षल आकुडे
    • Role, बीबीसी मराठी

पश्चिम महाराष्ट्राला पुराचा जोरदार तडाखा बसला. राज्याच्या अन्य भागातही मुसळधार पावसानंतर नद्यांनी रौद्ररुप घेतलं. लाखो नागरिकांना त्याचा फटका बसला. वेगवेगळ्या घटनांमध्ये नागरिकांना जीवही गमवावा लागला.

पावसामुळे माजलेला हाहाःकार पाहता महाराष्ट्रात आलेल्या जलआपत्तीमागे नेमकं काय कारण आहे, असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानंतरही अशा प्रकारची परिस्थिती ओढवल्यामुळं सरकारी यंत्रणांच्या सज्जतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचं तज्ज्ञ म्हणतात.

गेल्या काही दिवसांत राज्यातील पावसाबाबत हवामान खात्याने केलेला अंदाज काहीअंशी चुकल्याचं दिसून आलं. अनेकवेळा अतिवृष्टीचा अंदाज असताना त्या प्रमाणात पाऊस पडला नाही. काहीवेळा वर्तवलेल्या अंदाजापेक्षा जास्त प्रमाणात पाऊस पडल्याचंही चित्र पहायला मिळालं.

घडलेल्या प्रसंगातून बोध घेऊन येणाऱ्या काळात अशा समस्या निर्माण होऊ नयेत याचं नियोजन करता येऊ शकतं का, तसंच भविष्यात पुन्हा अशा प्रकारचं महापुरासारखं संकट टाळण्यासाठी पावसाचा अचूक अंदाज बांधणं शक्य आहे का, याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आम्ही केला.

'पाऊस मोजण्याची पद्धत संभ्रमात टाकणारी'

सध्या हवामान विभाग (IMD) वापरत असलेली अतिवृष्टीबाबतची संकल्पना बदलण्याची गरज असल्याचं मत प्रा. किरणकुमार जोहरे नोंदवतात.

प्रा. जोहरे यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटरोलॉजीमध्ये (IITM) जवळपास 13 वर्षे शास्त्रज्ञ म्हणून काम केलं आहे. ते हवामानाचे अभ्यासक असून सध्या नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आहेत.

जोहरे सांगतात, "पावसाचं पद्धतशीर वर्गीकरण केल्यास किती प्रमाणात पाऊस झाला याबाबत हवामान विभागाला (IMD) नीट सांगता येऊ शकते. चोवीस तासात 65 मिलीमीटरपेक्षा जास्त होणाऱ्या प्रत्येक पावसाला हवामान विभाग अतिवृष्टी म्हणतो. 65 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस म्हणजे जास्त पाऊस (Heavy Rain), 65 ते 125 मिलीमीटरहून अधिक पाऊस म्हणजे खूप जास्त पाऊस (Very Heavy Rain) तर 250 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस म्हणजे अतिवृष्टी (Extremely Heavy) अशी संकल्पना हवामान खाते (IMD) वापरते."

"पण फक्त अतिवृष्टी म्हटल्यानंतर नागरिकांना पावसाचा पुरेसा अंदाज येत नाही. सध्याची पद्धत अपुरी तसंच गोंधळात टाकणारी आहे. ठराविक परिमाणापेक्षा जास्त पाऊस झाल्यास ते मोजण्यासाठीची यंत्रणा IMD कडे नाही. पाऊस नेमका किती प्रमाणात होणार आहे हे सांगण्याची यंत्रणा निर्माण झाली पाहिजे. चोवीस तासांमध्ये कोणत्या तासात अधिक पाऊस होणार आहे, प्रत्येक तासाला किती मिलीमीटर पाऊस झाला, हे वर्गीकरण हवामान खातं नागरिकांना सांगू शकल्यास ते हवामान खात्याचं मोठं यश असेल," असं प्रा. जोहरे सांगतात

हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळेसुद्धा याबाबत असंच काहीसं मत नोंदवतात. डॉ. साबळे हे महात्मा फुले कृषी महाविद्यालयात कृषी हवामान विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते.

डॉ. साबळे सांगतात, की पावसाचा अंदाज सांगण्याच्या पद्धतीत आमूलाग्र सुधारणा करण्याची गरज आहे. अचूक अंदाज वर्तवणं हे हवामान खात्याचं पहिलं उद्दिष्ट असलं पाहिजे."

जुन्या यंत्रणेनुसार मोजमाप

मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर सांगलीमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी हवामान खात्याला अशा प्रकारच्या परिस्थितीचा अंदाज वर्तवणे शक्य आहे का, याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आलं.

उत्तरादाखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मुळात अजूनही आपल्याकडे किती पाऊस पडणार आहे हे सांगणारी यंत्रणा नाही. तुरळक पाऊस पडणार की मोठ्या प्रमाणावर याबाबत अंदाज व्यक्त केले जाऊ शकतात. हा आपल्या लेखी अतिवृष्टी प्रकारातला पाऊस आहे. चार दिवसांत किती मिलीमीटर पाऊस पडणार आहे, याची माहिती आपल्याकडे नसते. आता जेवढा पाऊस पडला त्या पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था आपल्या नद्यांमध्ये सध्या तरी नाही. ती तयार करता येईल का हा वेगळा भाग आहे."

मुख्यमंत्र्यांनी पुढे म्हटलं, "हा अनपेक्षित प्रकारचा पाऊस आहे. आपल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या नियोजनानुसार इतिहासातील उच्चतम पातळीचा विचार करून नियोजन केलं जातं. इतिहासातील आकडेवारीपेक्षा पाच ते दहा टक्के जास्त सरासरीचा विचार करून नियोजन करण्यात येतं. यावर्षी तर पावसाचे सगळे विक्रम मोडले आहेत. नेमका किती प्रमाणात पाऊस पडणार आहे याची माहिती नसते. सध्या तरी आपल्याकडे अशा प्रकारचं विकसित तंत्रज्ञान आलेलं नाही."

डॉप्लर रडारची संख्या वाढवावी

सध्या प्रशासनाकडे डॉप्लर रडार अत्यंत कमी प्रमाणात आहेत. त्यांची संख्या वाढवल्यास पावसाचा अंदाज लावता येणं शक्य असल्याचं डॉ. साबळे सांगतात.

डॉ. साबळे पुढे सांगतात, "डॉप्लर रडारसह आवश्यक यंत्रसामुग्रीची संख्या वाढवण्याची आवश्यकता आहे. कोल्हापुरात डॉप्लर रडार असतं तर पावसाचा थोडाफार अंदाज येऊ शकला असता. प्रत्येक 150 ते 200 किलोमीटरवर डॉप्लर रडार असणं आवश्यक आहे. एका वर्षापूर्वी औरंगाबादमध्ये हवामानासंबंधित एक परिषद झाली होती. देशातील हवामान विभागाचे अधिकारी त्याला उपस्थित होते. येत्या काळात अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात येणार असल्याबाबत अधिकाऱ्यांनी त्यावेळी सांगितलं होतं."

महाराष्ट्रातील तसंच देशातील डॉप्लर रडार आणि पावसाचा अंदाज लावणाऱ्या यंत्रसामुग्रीची नेमकी स्थिती जाणून घेण्यासाठी बीबीसीने भारतीय हवामानशास्त्र विभागाशी (IMD) संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला. मात्र तिथल्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.

हवामान बदलाचा परिणाम

"आपल्याला अंदाजाची अचूकता वाढवावी लागणार तर आहेच. पण फक्त अचूक अंदाज लावून ही परिस्थिती बदलणार नाही. हा सगळा हवामान बदलाचा परिणाम आहे, हेही मान्य केलं पाहिजे. ही अत्यंत गंभीर परिस्थिती असून ती बदलण्यासाठी संपूर्ण जगाला प्रयत्न करावे लागणार आहेत," असं डॉ. साबळे सांगतात.

डॉ. साबळे सांगतात, "2012, 2015 आणि 2018 च्या दुष्काळाचं निरीक्षण केलं तर प्रत्येकवेळी तालुक्यांची संख्या वाढत गेली आहे. मराठवाड्यात 2014 आणि 2015 ला गारपीट झाली होती. त्यानंतर यावर्षी पुरामुळे कोल्हापूर, सांगली, नाशिकमध्ये नुकसान झालं. काही ठिकाणी पाऊस आणि काही ठिकाणी दुष्काळ अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. अनेक दिवस पाऊसच नाही आणि नंतर काहीच दिवसात प्रमाणापेक्षा जास्त पाऊस ही हवामान बदलाचीच लक्षणंआहेत. अशा स्थितीमुळे यंत्रणेवरही ताण येतो. "

वृक्षलागवडीशिवाय पर्याय नाही

डॉ. रामचंद्र साबळे सांगतात, की हवामान बदलामुळे काही भागात वारंवार कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. त्यामुळे त्याच भागात मोठा पाऊस होत असल्याचं गेल्या काही वर्षात आढळून आलं आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सगळ्याच ठिकाणी पुरेशा प्रमाणात पाऊस होणं आवश्यक असतं. ही परिस्थिती सुधारण्यासाठी वृक्षलागवडीशिवाय पर्याय नाही.

"आंतरराष्ट्रीय परिमाणानुसार कोणत्याही भूभागावर 33 टक्के जंगल असलं पाहिजे. महाराष्ट्रात हे प्रमाण 17 ते 18 टक्के इतकं आहे. मराठवाड्यात तर फक्त 4 ते 5 टक्के जंगल आहे. त्यामुळेच मराठवाड्यामध्ये वारंवार पावसाची समस्या निर्माण होत आहे. येत्या काळात तर ही समस्या आणखी वाढणार आहे.जगभरात सर्वत्र जंगलं तोडली जात आहेत. अमेरिकेत जंगलांचं प्रमाण 33 टक्के असूनसुद्धा त्यांनाही हवामान बदलाच्या समस्येला सामोरं जावं लागत आहे. ही सगळी परिस्थिती लक्षात घेता पुढच्या पिढीच्या भल्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणं ही आपली जबाबदारी आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)