You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नाशिक पाऊस: 'पावसामुळे आलेल्या पुरात आमची बोट दोनदा पंक्चर झाली, आजूबाजूला 100 साप होते'
- Author, प्रवीण ठाकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी नाशिकहून
"पुरातून बाहेर काढण्यासाठी मदतीला आलेली होडी पंक्चर झाली, मग आहे त्या ठिकाणी आम्ही थांबलो, तेव्हा आजूबाजूला 100पेक्षा जास्त साप होते. ते आमच्यापर्यंत पोहोचू नये म्हणून मी आणि भाऊ त्यांना बांबूनं पाण्यात ढकलत होतो," राधिका सांगत होती.
राधिकाकडे आम्ही पोहोचलो, तेव्हा ती घरातील गाळ बाहेर काढत होती. पुरामुळे तिच्या घरातल्या काही वस्तूंचं नुकसान झालं होतं.
पुराविषयी राधिका सांगते, "असं नाही की आम्ही पहिल्यांदाच पूर अनुभवतोय. 2016ला पूर आला होता. पण त्यावेळेस पाणी जास्त भरलं नव्हतं. यावेळेसही असंच वाटलं की पाणी जास्त भरणार नाही. आम्हाला तलाठ्यांनी माहिती दिल्यावर आम्ही आमची गुरं सुरक्षित ठिकाणी हलवली. तर घरातील सर्व सामान 15 फूट उंची असलेल्या मंदिरात हलवलं. जेव्हा पुराचं पाणी गावात शिरायला लागलं, तेव्हा आम्हाला वाटलं की 2016 प्रमाणेच पाणी थोडं वाढेल आणि नंतर पूर ओसरेल. आम्ही जरा निश्चिंत होतो. मी, आई, दोन लहान मुलं, भाऊ, 100 वर्षं वयाच्या आजी आणि अजून चार असे दहा लोक मंदिरात थांबलो होतो."
"मंदिर सुरक्षितही वाटत होतं, पण जसजसं पाणी वाढायला लागलं, तशी भीती वाटायला लागली. वाहत्या पाण्याचा आवाज खूप मोठा होता. असं वाटत होतं की, मंदिर वाहून जातं की काय?, मग मी आमच्या ओळखीचे आणि तलाठ्यांना मदतीसाठी संपर्क केला. त्यांनी सांगितलं, मदत येत आहे. एक नाव आली देखील, पण ती आमच्या डोळ्यादेखत पंक्चर झाली. तातडीनं मदत मिळणं शक्य नव्हतं. भावासोबत मी पायऱ्यांवर बसली होती, तर समोरून पाण्यात मोठमोठे साप वाहून जात होते. छोटे साप मी बघितले होते, पण हे मोठे होते, भीती वाटत होती."
राधिका नाशिक जिल्ह्याच्या सायखेडा गावात राहते. तिचे वडील भगवान भरवड कामानिमित्त गुजरातला गेले होते. त्यांच्याकडे 70 गायी-म्हशी असून ते दुधाचा व्यवसाय करतात.
"आम्ही आमच्याकडे येत असलेले साप परत पाण्यात ढकलत होतो. त्यातील काही साप मंदिराच्या पायऱ्याने आत यायचा प्रयत्न करत होते. माझं कुटुंब आत होतं. तर 3 आणि 4 वर्षाच्या 2 मुलीसुद्धा होत्या. साप येणं धोकादायक होतं. म्हणून मी आणि भाऊ बांबू घेऊन त्यांना पाण्यात ढकलायचा प्रयत्न करत होतो. काही साप फणा काढून फुत्कार सोडायचे, पण आम्ही त्यांना परत पाण्यात ढकलत होतो."
"भीती वाटत होती पण इलाज नव्हता. रात्र तशीच काढली. दुसऱ्या दिवशी आपत्ती व्यवस्थापनचे लोक आणि स्थानिक पोलीस एक नाव घेऊन आले. त्यांनी आम्हाला जाकीट घालून हळूहळू नावेत बसवायला सुरुवात केली. माझ्या आजीला त्यांनी खांद्यावर उचलून आणलं. नंतर बोटीत चढवलं, तर दोन दिवसापूर्वी जन्मलेले वासरू त्यांनी खांदयावर आणलं. आम्ही सर्व बोटीतून सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी निघालो."
"पुरातून सुटका होत असताना दोनदा बोट बिघडली. अचानक मध्येच नावेचं इंजिन बंद झालं. वाहत वाहत आम्ही बँकेच्या चौफुलीवर पोहचलो. तिथं एक पाईप दिसला, आम्ही सगळ्यांनी त्याला पकडलं. नंतर पुन्हा एक बोट मदतीला आली. त्या बोटीत आम्ही चढलो, पण पुढे एक लोखंडी खांब लागल्याने बोट पंचर झाली. आता मात्र आम्ही प्रचंड घाबरलो होतो. काय होणार हा प्रश्न होता. नावेत भाऊ, आजी, आई होते, सगळेच घाबरले होते."
"अशा अवस्थेतही आपत्कालीन विभागाचे जवान पाण्यात उतरले. दोरी बांधून त्यांनी आम्हाला सुरक्षित स्थळी पोहोचवलं. अशा गंभीर परिस्थितीत जीवाची पर्वा ना करणाऱ्या आपत्ती व्यवस्थान विभाग आणि पोलीस यांचे मी आभार मानावे तेवढे थोडेच आहेत, कारण इंजिन बंद पडलं, दोनदा बोट पंक्चर झाली तरी त्यांनी आम्हाला सुखरुप बाहेर काढलं. नंतर आजीला दवाखान्यात नेलं, त्यांचा रक्तदाब वाढला होता."
पूर आला आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची पुरातून सुटका राज्य आपत्ती व्यवस्थापन दल, जिल्हा आपत्ती व्यवस्थान दलाचे जवान आणि स्थानिक पोलीस दलानं केली. एकूण 10 जणांसह 2 दिवसाच्या वासराची सुटका करण्यात आली .
नाशिकमध्ये सर्वांत मोठा पूर
नाशिकमध्ये यंदा 50 वर्षांतील सर्वांत मोठा पूर आला, इतका मोठा की या पुरातून निफाडमधील 1157 लोकांना रेस्क्यू करावं लागलं.
शहरातल्या रामकुंडात 89,000 क्यूसेसच्या वर विसर्ग सुरू झाला आणि नदीकिनारी वसलेली गावं पाण्याखाली आली.
चांदोरी, सायखेडा, शिंगवे, करंजगाव ही गावं पाण्याखाली गेली होती. ह्या गावांनी नुकतीच 2016मध्ये पूरपरिस्थिती अनुभवली होती.
पण रविवारी धरणातून सोडलेलं पाणी आणि सतत पडणाऱ्या पावसाने रविवारी आणि सोमवारी परिस्थिती एकदम बिकट झाली. प्रशासनानं उपाययोजना केल्या तरी काही लोकांना पुराचा फटका बसला. या नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे व्हायचे आहेत .
"प्रशासनानं या गावांमधून एकूण 1157 लोकांना स्थलांतरित केलं, तर काहींना पुरातून सुखरूप बाहेर काढलं," अशी माहिती प्रांताधिकारी अर्चना पठारे यांनी दिली.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)