You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महिला फुटबॉलपटूला विचारलं गेलं तुला कामुक नृत्य येतं का?
- Author, शैली भट्ट
- Role, बीबीसी प्रतिनिधी
3 डिसेंबर 2018 या दिवशी नॉर्वेची महिला फुटबॉलपटू अॅडा हेगरबर्ग हिनं इतिहास रचला. फुटबॉल जगतातला सर्वांत मोठा वैयक्तिक पुरस्कार समजला जाणारा मानाचा बॅलॉन डी'ओर हा पुरस्कार तिला देण्यात आला.
मात्र पॅरिसमध्ये झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात जे घडलं ते स्त्रीने कितीही उत्तुंग भरारी घेतली तरी क्रीडा क्षेत्रात आपण तिला कोणतं स्थान देतो, या कटू वास्तवाची जाणीव करून देणारं होतं.
त्या सोहळ्यात तिनं भाषण संपवल्यानंतर सोहळ्याचे आयोजक फ्रान्सचे डी. जे. मार्टिन सोल्वेग यांनी या 300 गोल केलेल्या फुटबॉलपटूला विचारलं, तुला ट्वर्क (twerk) करता येतो का? ट्वर्क म्हणजे कामभावना उत्तेजित करणारं एकप्रकारचं अश्लील नृत्य. तिने तेवढ्याच दृढतेने उत्तर दिलं 'नाही' आणि ती स्टेजवरून निघून गेली.
हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आणि फुटबॉल जगतातून सोल्वेग यांच्यावर बरीच टीका झाली.
स्त्रियांना बऱ्याच वेळा पुरुषी अंहकार आणि स्त्री-पुरुष भेदभावाचा सामना करावा लागतो, अशी क्रीडा क्षेत्रातल्या किंवा एखाद्या खेळाची चाहती असणाऱ्या महिलांची नेहमीची तक्रार आहे.
वेबसाईट किंवा वृत्तपत्रांच्या क्रीडा पानावर बहुतांशी पुरुष खेळाडूंचेच फोटो, त्यांच्या कथा, त्यांचे डावपेच आणि त्यांच्या कामगिरीचं विश्लेषण असतं.
मात्र तेवढं महत्त्व महिला क्रीडापटूंना दिल्याचं आपण किती वेळा बघतो? 'सौंदर्य', 'करीअर' आणि 'वैयक्तिक आयुष्यात घातलेला मेळ' अशा शब्दांशिवाय त्यांच्याविषयीच्या बातम्या पूर्णच होत नाहीत.
महिला क्रीडापटू होणं, हे माझ्या मते शहरी, निम-शहरी भारतातल्या अनेक मध्यमवर्गीय तरुण मुलींचं स्वप्न आहे. मात्र क्रीडापटू सोडा एखाद्या खेळाची आवड असणंसुद्धा संघर्ष करण्यासारखं आहे. यात स्त्री किंवा पुरुष दोघांसाठीही दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. आपल्या आवडीला मान्यता मिळणे आणि तिचा स्वीकार होणे.
मला लहानपणी क्रिकेट खूप आवडायचं. त्यातलीच माझ्याकडे दोन उदाहरणं आहेत, ज्यावरून माझं म्हणणं अधिक स्पष्ट होईल.
1999 सालची गोष्ट आहे. आम्ही जम्मू-काश्मीरच्या सहलीवरून परत आलो होतो. माझ्या वडिलांनी जम्मूवरून माझ्यासाठी आणलेल्या खेळण्याची मला खूप उत्सुकता लागून होती. ते खेळणं म्हणजे क्रिकेट बॅट.
त्या भागातल्या प्रसिद्ध विलो लाकडापासून ती बनवलेली होती. जम्मूमध्ये उत्कृष्ट दर्जाच्या बॅट बनवल्या जातात. एम. एस. धोणी, विराट कोहली यांसारख्या मोठ्या क्रिकेटपटूंनीही आपल्या बॅट जम्मूतून बनवून घेतल्या आहेत.
लवकरच ती बॅट माझी सोबती झाली. गुळगुळीत आणि चमकणारी अशी ती पिवळसर पांढरी बॅट होती. तिच्यावर तेवढंच चकचकीत विविधरंगी असं रिबॉकचं स्टिकर चिटकवलेलं होतं. अर्थात ते स्टिकर खोटं होतं. त्या लाकडाचा एक विशिष्ट गंधही होता आणि तिच्या हँडलवर लाल रबराची ग्रिप होती.
मी शाळेतून घरी आले की एक क्षणही तिला नजरेआड होऊ द्यायची नाही. मी माझ्या आजोबांना बॉलिंग करायला लावायचे, त्यानंतर आईला आणि शेवटी बाबा घरी आले आणि त्यांनी अंगणात स्कूटर पार्क केली की त्यांना बॉलिंग करायला सांगायचे. कधीकधी तर आमच्या घरी येणारे पाहुणेही बॉलिंग करायचे. एकदिवसीय सामन्यात कसोटीचे ओव्हर टाकल्यासारखा तो खेळ असायचा.
माझ्या त्या अतिउत्साहामुळे इतरांना त्रास व्हायचा. मग माझ्या आईने एक तोडगा काढला. आमच्या अंगणात अशोकाचं एक मोठं झाड होतं. तिने एका जुन्या मोज्यात एक बॉल टाकला आणि एका पातळ दोरीने तो झाडाच्या एका फांदीला अडकवला आणि म्हणाली आता खेळ आणि सुधार तुझी बॅटिंग. मी रोज दोन-तीन तास खेळायचे. जवळपास दीड वर्षं हा प्रकार सुरू होता.
उन्हाळ्याच्या एका सुटीत मी आणि माझा चुलत भाऊ क्रिकेट खेळत होतो. नेहमीप्रमाणे बॅटिंग कोण करणार, यावरून भांडण सुरू होतं आणि त्याला इतका राग आला की तो बॅट घेऊन पळाला. मी त्याच्या मागे धावले आणि त्याच्यावर ओरडले. त्याने ती बॅट जमिनीवर जोरात आपटली आणि ती तुटली.
मला मोठा धक्का बसला. ती तुटलेली बॅट मी दोन दिवस माझ्या जवळ ठेवली आणि दोन दिवस कुणाशीही बोलले नाही.
मला माझाच एखादा महत्त्वाचा भाग कुणीतरी तोडून घेतल्यासारखं वाटलं होतं. पण मला त्यानंतर परत कधी बॅट मिळालीच नाही आणि कुणाबरोबर क्रिकेट खेळण्याची संधीही मिळाली नाही.
हेच जर एखाद्या मुलाबरोबर घडलं असतं तर त्याला नक्कीच नवीन बॅट मिळाली असती आणि तो नक्कीच खेळत राहिला असता.
मी 13 वर्षांची असताना, सातवीत माझ्या शाळेच्या बॅगेत सचिन तेंडुलकर, राहुल द्रवीड आणि सौरव गांगुली यांचे फोटो होते. इतर कुठल्याच मुलीकडे नव्हते. मी वेगळी होते.
कुणीच माझ्याशी खेळाबद्दल बोलायचं नाही आणि क्रिकेट खेळायची संधीही नव्हती. क्रिकेटबद्दल माझ्या इतका उत्साह दुसऱ्या कुठल्याच मुलीत नव्हता आणि माझ्यासारख्या 'नवख्या मुलीबरोबर' क्रिकेटविषयी बोलणं मुलांसाठी अवघडल्यासारखं होतं.
पुढच्या वर्षी भारताची क्रिकेट टीम पाकिस्तानात जाणार होती. मोबाईल फोन त्यावेळी खूपच नवीन होते. स्कोर जाणून घेण्यासाठी सिम कार्ड कंपन्या एका एसएमएससाठी 50 पैसे आकारायच्या.
कधीकधी वर्गातली मुलं वर्गशिक्षिकेला विनंती करायचे आणि त्यांना त्यांच्या मोबाईलवरून एसएमएस करून स्कोर किती झाला, ते विचारायचे. मी पण त्यांच्यासोबत विनंती करायचे. याचा दोनदा फायदा झाला.
आमच्या शाळेची भिंत आणि शेजारच्या रहिवासी इमारतीची भिंत एकच होती. मधल्या सुटीत आम्ही भिंतीवर चढायचो आणि स्कोर किती झाला, असं जोरात ओरडून विचारायचो. काहीजण आनंदाने सांगायचे.
मी मोठी झाले आणि शाळा बदलली. मात्र तिथे खेळाची आवड असणारी एकही मैत्रिण नव्हती. तर मुलांचा अर्विभाव तुला काय कळतं यातलं? असा असायचा.
मी अंडर-15 टीमचं प्रशिक्षण घेण्याचं स्वप्न बघत होते. मला वाटायचं मला राईट आर्म स्पिनर होता येईल आणि मी मधल्या फळीत बॅटिंग करू शकते.
मात्र माझ्या पालकांचे प्रश्न असायचे - तुला हे करता येईल का? तुला क्रिकेटमध्ये करिअर करायचं आहे का? किती मुली इंटरनॅशनल क्रिकेट खेळतात? या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नव्हती.
2000 साली नावं घेऊन प्रतिवाद करता येईल असं महिला क्रिकेटपटूचं नाव माझ्यासमोर नव्हतं.
तो एका क्रिकेटवेड्या मुलीचा संघर्ष होता.
खेळाडू होणं म्हणजे काय? हे कॉलेजसाठी क्रिकेट खेळलेल्या बीबीसी तमिळच्या कृतिका कन्नन यांनी सांगतिलं.
त्या सांगतात, "मी लहान असताना माझ्या चुलत भावंडांसोबत क्रिकेट खेळायचे. मोठी झाल्यावर कॉलेज टीमसाठी खेळले. मी मोठी क्रिकेटपटू होते असा दावा मी करणार नाही. मात्र मी प्रामाणिक होते."
"कॉलेजमध्ये रविवार वगळता रोज सकाळी साडेसहा वाजता प्रॅक्टिस असायची. मला आठवतं मी कॉलेजला जाण्यासाठी बस पकडायला धावायचे तेव्हा मुलं मला मांजर म्हणायचे."
एक प्रसंग तर मला चांगला आठवतो. रिमझिम पाऊस पडत होता. मी प्रॅक्टिससाठीचा ड्रेस घातला होत. ट्रॅकसुट, जर्सी आणि पाठीवर क्रिकेट कीट. एक मुलगा ओरडला, 'बघा हे कोंबडीचं पिल्लू पावसात खेळायला चाललं आहे. चला जाऊन बघूया' त्यावेळी मी असं दाखवलं जणू मला कसलीच पर्वा नाही, मात्र त्या घटनेनं माझा आत्मविश्वास डळमळला होता.
एक महिला आणि क्रीडा पत्रकार होणं, हा तर वेगळाच अनुभव आहे.
या वर्षी फेब्रुवारीमध्ये युनेस्कोचे सरसंचालक अड्रे अझुले म्हणाले, "क्रीडा पत्रकारितेत केवळ 4% मजकूर हा महिला खेळांसाठीचा असतो. तर खेळासंबंधीच्या केवळ 12% बातम्या या महिला निवेदक सादर करतात."
यावर्षी मार्चमध्ये ब्राझिलच्या एका महिला क्रीडा पत्रकाराने #DeixaElaTrabalhar म्हणजेच 'तिला तिचं काम करू द्या' या नावाने एक मोहीम सुरू केली होती.
ब्रुना डिल्ट्री नावाची क्रीडा पत्रकार Esporte Interativo या चॅनलसाठी एका फुटबॉल मॅचच्या विजयोत्सवातून लाईव्ह करत असताना एका फुटबॉलप्रेमीने तिचं चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. या कृत्यावर सोशल मीडियातून बरीच टीका झाली.
मी याविषयावर जवळपास एक दशक क्रीडा पत्रकार म्हणून काम केलेल्या माझ्या सहकारीशी बोलले.
बीबीसी मराठीच्या जान्हवी मुळे मुंबईत असतात आणि एका टीव्ही चॅनलसाठी त्यांनी क्रीडा पत्रकार म्हणून काम केलं आहे.
त्या सांगतात, "हो, हे पुरुषांचं वर्चस्व असलेलं क्षेत्र आहे, आपण हे अमान्य करू शकत नाही. मी जेव्हा क्रीडा पत्रकार म्हणून काम सुरू केलं तेव्हा कुणीच मला गांभीर्याने घेत नव्हतं. मला शूटिंग आणि टेनिस हे खेळ आवडायचे. मात्र सर्वच खेळांची सगळी माहिती नव्हती. या सर्वांशी जुळवून घेणं कठीण होतं. मात्र माझ्या वरिष्ठांपैकी एकाने मला एक गोष्ट सांगितली, एखाद्या खेळाची आवड जप आणि तुझी उत्सुकता ढळू देऊ नकोस. हा सल्ला माझ्यासाठी मोलाचा ठरला आणि मला त्याची खूप मदत झाली."
त्यांनी आत्मविश्वासाने चर्चेत भाग घेतला आणि लोक त्यांचं म्हणणं ऐकत होते. त्या सांगत होत्या, "काही दिवसांनी माझ्याकडे टेनिसमधली तज्ज्ञ म्हणून माझे सहकारी बघायला लागले. एकूण मी आता ऑलिम्पिक, क्रिकेट, फुटबॉल, शूटिंग आणि टेनिसवर बोलू शकते."
"घरच्या वातवरणापासून याची सुरुवात झाली. लहान असल्यापासून मला खेळाची आवड आहे. माझी आई आणि माझ्या भावाने मला कायम प्रोत्साहन दिलं आहे. कॉलेजमध्ये असताना माझ्या एका मित्राला कळलं की मी फुटबॉल बघते, तेव्हा त्याला आश्चर्य वाटलं आणि मी खरंच फुटबॉल फॅन आहे की नाही, याची खात्री करून घेतली. याव्यतिरिक्त महिला फॅन किंवा प्रेक्षकांनीसुद्धा जो खेळ त्यांना आवडतो त्याविषयी बोलण्यात संकोच वाटून घेऊ नये."
महिला क्रिकेटचं टीव्हीवर प्रक्षेपणच व्हायचं नाही. तिथपासून तर आज आपण मिताली राज, हरमनप्रीत कौर यांना खेळताना बघतो. हा मोठा बदल आहे.
आपण सिंधू, सायना नेहवाल, दीपा करमाकार, सरिता गायकवाड आणि फोगाट भगिनींचा विजय साजरा केला आहे. मात्र त्यांची आठवण आपल्या मनात ताजी आहे का?
ज्यांना अॅथलिट व्हायचं आहे, अशा तरुण मुली (मुलंदेखील) महिला खेळाडूंना आपला रोल मॉडल मानतील आणि अडा हेगरबर्गप्रमाणे नकार देण्याइतपत आत्मविश्वास त्यांच्यात येईल, इतक्या पुरेशा प्रमाणात आपण महिला खेळाडू आणि त्यांच्या खेळाविषयी बोलतो का?
खेळ सर्वांना एकत्र जोडतो, असं म्हणतात. मात्र इथे स्त्री-पुरुष भेदभाव अजूनही का पाळला जातो?
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)