You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मस्तानम्मा : 107 वर्षांचं आयुष्य जगलेल्या यूट्यूब स्टारला मी भेटलो तेव्हा...
- Author, ओंकार करंबेळकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
हटक्या पद्धतीनं केलेल्या रेसिपींमुळे जगभरात प्रसिद्ध झालेल्या यूट्यूब स्टार मस्तानम्मा यांचं वयाच्या 107व्या वर्षी निधन झालं. वर्षभरापूर्वी त्यांच्या झोपडीत जाऊन भेट घेण्याची संधी मला मिळाली होती.
शंभरी उलटलेलं वय, पोट आणि पाठ एक झालेली बाई, अगदी नाक जमिनीला लागेल इतकी बारीक कुडी समोर आली आणि त्या आजीबाईंनी हाताची बोटं माझ्या कानशिलावर मोडून स्वागत केलं. ओळख-पाळख नसलेल्या आणि अचानकपणे घरात आलेल्या मला त्यांनी आनंदानं बसायला सांगितलं.
घर कसलं झोपडीच ती. त्या झोपडीला दोन भिंतीही नव्हत्या. फक्त दोन बाजूला भिंतीसारखा झावळ्यांचा आधार आणि वर खजुरीच्या झावळ्यांनी शाकारलेलं छप्पर. भिंती नव्हत्या म्हणून कवाडंही नव्हतीच.
मी आलो होतो यूट्यूब स्टारच्या झोपडीत. तेव्हा त्या 106 वर्षांच्या होत्या. जिथं पैसा खर्च करून लोकांना यूट्यूबवर फॉलोअर्स मिळवावे लागतात तिथं या म्हाताऱ्या बाईंच्या व्हीडिओवर जगातल्या लक्षावधी लोकांच्या उड्या पडत होत्या. या होत्या आंध्र प्रदेशातल्या गुडीवाडा गावातील मस्तानम्मा.
गेल्या वर्षी एका दिवाळी अंकासाठी लेख लिहिताना त्यांची भेट घेतली होती. तीन दिवसांपूर्वी वयाच्या 107 वर्षांचं प्रदीर्घ आयुष्य जगून मस्तानम्मांचं निधन झाल्याचं समजलं आणि त्यांच्या भेटीचा प्रसंग पुन्हा डोळ्यांसमोर आला.
'जगातील सर्वांत वृद्ध आचारी'
खरंतर मस्तानम्मा मला युट्यूबवर भेटल्या होत्या. कसं? सांगतो... गावरान झटका असलेल्या भरपूर रेसिपी या बाईंनी यूट्यूबवर प्रसिद्ध केल्या होत्या. आता तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष... मस्तानम्मांचं सगळंच वेगळं होतं. जगातील सर्वात वृद्ध आचारी असं त्यांना म्हटलं जातं. बरं त्यांच्या रेसिपीही काही साध्यासुध्या नाहीत.
नुसतं लिहून घ्या साहित्य, आता पाककृती आणि नंतर पदार्थ चाखून पाहायला लावून एकदम टेस्टी आहे अशी एकछापाची पावती मिळवायची असला प्रकार या बाईंचा नव्हताच.
गुळगुळीत रंगीबेरंगी सजवलेल्या जागी एक टेबलस्पून अमूक टाका, दोन औंस ते टाका, हे सगळं 'सॉते' करुन घ्या मग 'ऑलिव्ह तेलात टॉस करा' असला नाजूक प्रकार या बाईंच्या बुकातच नव्हता.
नदीच्या काठावर जायचं, तिथलेच दगड- जळण घेऊन चूल पेटवायची आणि भाज्या, मांस घेऊन एकेक गावरान झणक्याच्या रेसिपी करायच्या हा त्यांचा सरळसोट कार्यक्रम.
सगळं साहित्य खटाखटा कापायचं, खसाखस चिरायचं, कोथिंबिर, मिरच्या कापायला काही सापडलं नाही तर सरळ हाताने कापायचं, मीठ-मसाला सगळं हाताच्या मापाने घालायचं. चमचे वगैरे बेतून काही घालणं त्यांच्या व्याख्येतच बसत नव्हतं.
बरं त्यांच्या रेसिपीही तुमच्या आमच्यासारख्या पावभाजी, मोदक, पुरणपोळ्यांच्या नाहीत. कलिंगड, शहाळ्यात शिजवलेलं चिकन, शंभर माणसांना पुरेल असं अंड्यांचं ऑम्लेट, पन्नासेक लोकांना होईल इतकी वांग्यांची भाजी असले या बाईंचे पदार्थ.
पण या सगळ्या धसमुसळ्या कारभारात एकप्रकारचा खास जिव्हाळा होता. ते पदार्थ तयार करण्याची रीत खडबडीत असेल पण त्या सगळ्यांत भरभरून वाहणारं निरपेक्ष प्रेम होतं. हेच प्रेम मस्तानम्मांना यूट्यूब स्टार करणारं ठरलं.
'लव्ह यू ग्रँडमा'चा पाऊस
पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, मलेशिया, आफ्रिका सगळ्या जगभरामधून फॉलोअर्सनी त्यांच्यावर प्रेमाचा पाऊस पाडला.
जगभरातून त्यांच्या व्हीडिओवर कमेंटस येऊ लागल्या. भारतातल्या एका कोपऱ्यातल्या खेड्यात शेतात स्वयंपाक करणारी शंभरी उलटलेली म्हातारी गावरान रेसिपी प्रसिद्ध यूट्यूबवर टाकते ही कल्पनाच सगळ्यांना आवडली.
जगभरातल्या तरुण पोरापोरींनी लव्ह यू ग्रँडमा वगैरे कमेंटस करायला सुरुवात केली. खिळवून ठेवणाऱ्या त्यांच्या पाककृतींमुळेच त्यांना लाखो फॉलोअर्स मिळाले होते. माझंही तेच झालं होतं. चटचट हलत शंभर माणसांचा स्वयंपाक अगदी चुटकीसरशी करताना दिसल्या आणि तिथंच माझं युट्यूब थांबलं.
यूट्यूब गाजवणाऱ्या या भन्नाट आजीला भेटायचंच म्हणून त्यांचा पत्ता काढत आंध्रप्रदेशात विजयवाड्यामध्ये गुडीवाडा नावाच्या चिमुकल्या खेड्यामध्ये जाऊन मी पोहोचलो होतो.
मी येणार आहे हे मस्तानम्मांना अजिबात माहिती नव्हतं. पण त्यांनी अगदी मनमोकळं स्वागतं केलं. दंडाला धरून मला झोपडीत नेलं. सराईतपणे बाजूला केलेली खाट दाणकन पाडली आणि मला बसवलं.
'या हदृयीचं त्या हृदयी'
आत बोलावल्यापासून जे तार स्वरात बोलायला सुरू केलं होतं ते थांबलं नव्हतंच. आपण जे तेलुगूत बोलतो आहोत ते या पोराला कळतंय, नाही कळतंयतंय याचा त्यांच्याशी काहीच संबंध नव्हता. पण तरिही 'या हृदयीचं त्या हृदयी' अगदी बरोबर जात होतं.
जिव्हाळा आणि आपुलकी या दोन भाषा मस्तानम्मांना येतात आणि त्याच भाषेत त्या माझ्याशी बोलत होत्या. तिच्या त्या खोल गेलेल्या मिचमिच्या डोळ्यांतून फक्त प्रेमच दिसत होतं. कदाचित माझ्याआधी अनेक लोक त्यांना भेटून गेलेही असतील, त्यामुळे तिऱ्हाइत माणसांना भेटायची सवयही त्यांना झाली असेल.
बराचवेळ लांबलचक स्वगत म्हणून झाल्यावर बाईंनी माझा दंड सोडवला आणि अचानक रांधायचा बेत काढला. तू आलाच आहेस तर तुला काहीतरी करून दाखवते असं त्यांना वाटलं असेल.
त्यांनी पटकन प्लास्टीकच्या बरणीतले तांदूळ काढले. फटाफट माझ्यासमोर निवडून बोलताबोलता चूल पेटवलीही. त्यांच्या हालचालींमधून या आजी 106 वर्षांच्या असतील असं अजिबात वाटत नव्हतं. त्यांना झोपडीसमोर जमलेल्या गर्दीशी काहीच देणंघेणं नव्हतं.
मस्तानम्मांनी आयुष्यातल्या 8 दशकांहून अधिक काळ एकट्याने काढला होता. लहानपणी त्यांना एका मुस्लीम कुटुंबात दत्तक मूल म्हणून पाठवण्यात आलं होतं त्यामुळे त्यांना मस्तान्नमा असं नाव मिळालं. दत्तक कुटुंबात फारशा न रमलेल्या मस्तानम्मा पुन्हा आपल्या घरात आल्या, पण नाव मात्र कायम राहिलं.
11 व्या वर्षी लग्न
11 व्या वर्षीच त्यांचं लग्न लावून देण्यात आलं आणि 22 व्या वर्षीच त्यांच्या पतीचं निधन झालं. या काळात त्यांना 5 मुलंही झाली होती मात्र त्यातला डेव्हीड हा एकमेव पूत्र जिवंत राहिला.
ऐन विशीमध्ये पती आणि चार मुलांच जाणं आणि एकटेपण अशा संकटांच्या मालिकेमध्ये मस्तानम्मा डगमगल्या नाहीत. मोलमजुरी करून त्यांनी पोरांना वाढवलं. मनातला भावनांचा कल्लोळ बाजूला करत जगरहाटीला समोर जायचं त्यांनी ठरवलं.
मस्तानम्मांचा नातू लक्ष्मण आणि त्याचा मित्र श्रीनाथ हे दोघे यूट्यूबवर काहीतरी करायचं असं बरेच दिवस ठरवत होते. एकेदिवशी लक्ष्मणच्या आईने त्यांना मस्तान्नमांच्या स्वयंपाकाबद्दल सांगितलं आणि त्यांन या व्हीडिओची कल्पना सुचली.
मस्तान्नमांना घेऊन कालव्याच्या काठावर शेतामध्ये जायचं, चूल पेटवायची आणि कॅमेऱ्यासमोर सगळी रेसिपी टिपून घ्यायची असा क्रम सुरु झाला.
चूल पेटवल्यावर तिच्याभोवती पातेलं फिरवून कामाला सुरुवात झाली मस्तान्नमांचं तार स्वरात बोलणं सुरु व्हायचं. त्यांच्या मदतीला सगळं कुटुंब असायचं. हे काप, ते निवड असं झालं की मस्तान्नमा गालामध्ये हसून त्यांची 'सिग्नेचर पोझ' द्यायच्या. एकेक पदार्थ करण्याची त्यांची पद्धत पाहणाऱ्यांना खिळवून ठेवू लागली.
वांग्याच्या भाजीपासून सुरू झालेल्या या रेसिपीच्या मालिकेत अनेक शाकाहारी, मांसाहारी पदार्थ करून झाले. सगळ्यांना पोटभर मिळालं पाहिजे हा खाक्या असल्यामुळं मस्तान्नमाचे पदार्थ पन्नास शंभर माणसांना पुरतील इतके मोठे असत. दोघांसाठी, चौघांसाठी जेवण हे त्यांच्या व्याख्येत बसायचं नाही.
मस्तान्नमा घराघरात
त्यामुळे या व्हीडिओंना भरपूर प्रतिसाद मिळू लागला. आयुष्याच्या उत्तरार्धात अचानक नव्या तंत्रज्ञानामुळे मस्तान्नमा घराघरात, प्रत्येकाच्या मोबाइलवर पोहोचल्या.
मस्तान्नमांची ही सगळी कहाणी लोकांकडून ऐकून त्यांची झोपडी मी सोडली. शतकभराचं आयुष्य जगलेल्या बाईंना भेटून एकदम भारावल्यासारखं झालं होतं. शेवटच्या वर्षभरामध्ये मस्तान्नमा थोड्या थकल्या होत्या, नंतरचे काही महिने त्यांच्या हालचालीही मंदावल्या.
चार महिन्यांपूर्वी डेव्हीड म्हणजे त्यांच्या एकूलता एक मुलाचेही निधन झाले. 2 तारखेला दुपारी त्यांनी प्राण सोडले. पण त्यांना प्रत्यक्ष भेटलो तेव्हाच त्यांच्या वागण्या बोलण्यात एकप्रकारचं तृप्त समाधान दिसत होते.
दुर्गाबाई भागवतांनी आपल्याच मरणावर 'देहोपनिषद' नावाची कविता केली होती. मला वाटतं मस्तानम्मा आजी अगदी अशाच होत्या. या कविते प्राणेच त्या मनसोक्त जगल्या.
आयुष्याची झाली रात, मनी पेटे अंतर्ज्योत!!
भय गेले मरणाचे, कोंब फुटले सुखाचे !!
अवयवांचे बळ गेले, काय कुणाचे अडले!!
फुटले जीवनाला डोळे, सुखवेड त्यात लोळे!!
मरणा तुझ्या स्वागतास, आत्मा आहे सज्ज!!
पायघडी देहाची ही, घालूनी मी पाही वाट!!
सुखवेडी मी जाहले, 'देहोपनिषद' सिद्ध झाले!!
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)