चार वर्षांच्या अद्वैतची चित्रं लाखो रुपयांची

मुलांना, त्यातल्या त्यात जरा मोठी मुलं, त्यांना क्रिएटिव्ह व्हायला फार आवडतं.

मग भले ते रंग आणि चमकी इतरत्र फेकणं असो किंवा तारा वाकवून वेगवेगळ्या आकृत्या तयार करणं असो किंवा अगदी फुग्यांपासून न ओळखता येणारे प्राणी बनवणं असो.

पण कितीही प्रयत्न केले आणि युट्यूबच्या व्हीडिओचा आधार घेतला तरीही सहसा त्यांच्या कलाकृतींचा फज्जाच उडतो.

पण अद्वैत कोलारकर याचं असं नाही. या चार वर्षांच्या कलाकार मुलाची चित्रं कॅनडा आणि भारतातल्या आर्ट गॅलऱ्यांमध्ये दिमाखात झळकत आहेत. त्याच्या चित्रांची किंमत ऐकाल तर थक्क व्हाल!

त्याच्या एका चित्रांची किंमत चक्क 2000 पाऊंड म्हणजे 1 लाख 83 हजार एवढी आहे.

मागच्या महिन्यात अद्वैतनं आणखी एक विक्रम रचला. त्याचं चित्र न्यूयॉर्कच्या 'ArtExpo' या प्रदर्शनात झळकलं. याबरोबरच या प्रदर्शनात चित्र झळकवणारा तो सगळ्यात लहान चित्रकार ठरला.

ट्विटरवर अद्वैतच्या नावाची नुसती धूम आहे. त्याच्या कौतुकाचा ओघ थांबत नाही आहे हे वेगळ सांगायला नकोच.

श्रुती कोलारकर यांना आपल्या मुलाचा खूप अभिमान वाटतो. त्यांनी 'बीबीसी थ्री'ला सांगितलं की, त्यांचा मुलगा आठ महिन्यांचा असल्यापासून चित्रं काढतोय. त्यावेळेस त्यांचं कुटुंब पुण्यात राहात होतं.

तो त्याच्या बहिणीचे, स्वराचे रंग घ्यायचा आणि ती चित्र काढत असेल तर हाही काढायला लागायचा.

"त्याला रंग प्रचंड आवडतात. तो चित्र काढता काढता अगदी रंगून जातो. अगदी तासनतास तो रंगाशी खेळतो," श्रुती सांगतात.

"त्याच्या कलेला आणखी प्रोत्साहन द्यायला हवं असं आम्हाला वाटलं, मग आम्ही त्याला त्याच्यासाठीचे रंग आणून द्यायला लागलो."

पण अद्वैत जेव्हा एक वर्षाचा झाला तेव्हा तो फरशीवर काही अमूर्त चित्रं काढायला लागला. ती चित्रं खूपच सुंदर होती, अगदी मोठ्या माणसानं काढल्यासारखी.

"त्याला अगदी लहान वयापासून कॉम्पोझिशन आणि रंगांची चांगली जाण असल्याचं आमच्या लक्षात आलं," व्यवसायानं व्हिज्युअल डिझायनर असलेल्या श्रुती सांगतात.

तो दोन वर्षांचा असताना त्याच्या चित्रांची दखल पुण्यातल्या Art2Day या गॅलरीनं घेतली. अद्वैतच्या चित्रांचं एक प्रदर्शन या गॅलरीत भरलं ज्यात त्याची 30 चित्रं ठेवण्यात आली.

त्यानं दोन वर्षांत जेवढं यश मिळवलं आहे ते मिळवायला अनेकांना खूप काळ जावा लागतो.

यानंतर त्यांचं कुटुंब कॅनडातल्या सेंट जॉन, न्यु ब्रुन्सवीक इथे स्थलांतरित झालं. आपल्या मुलामध्ये असणाऱ्या अलौकिक कलेकडे दुर्लक्ष होऊ नये असं श्रुती यांना मनापासून वाटतं होतं. त्यामुळे त्यांनी शहराचे सांस्कृतिक अधिकारी बर्नाड कॉमिअर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनाही अद्वैतच्या कलाकृतींनी भुरळ घातली.

जानेवारी महिन्यात अद्वैतच्या चित्रांचं आणखी एक प्रदर्शन त्याच्या चौथ्या वाढदिवसाच्या दिवशी सेंट जॉन शहरातल्या सांस्कृतिक केंद्रात भरलं. प्रदर्शनाचं नाव होतं 'Colour Blizzard' ज्यामध्ये 30 चित्रं ठेवण्यात आली होती. सगळी चित्रं काही दिवसातच विकली गेली.

त्यानंतर थोड्याच दिवसात अद्वैतची चित्रं न्यूयॉर्कच्या कलाप्रदर्शनात इतर मोठ्या चित्रकारांच्या बरोबरीनं झळकली.

"कॅनडामधले लोक खूप चांगले होते. पण इतर ठिकाणचे लोक काय म्हणतील याची आम्हाला काळजी होती. एका बाजूला त्या प्रदर्शनात देशोदेशीच्या मोठमोठ्या कलाकारांनी आपली चित्रं ठेवली होती. दुसऱ्या बाजूला होता चार वर्षाचा छोटा अद्वैत.

"पण तिथेही आम्हाला मिळालेला प्रतिसाद फार छान होता. जवळपास सगळी चित्रं विकली गेली," श्रुती सांगतात.

अर्थात अद्वैत त्याचा सगळा वेळ फक्त चित्र काढण्यात घालवत नाही.

"त्याला वाचायला फार आवडतं. तो बरीच वेगवेगळी पुस्तकं वाचतो. त्याला डायनोसॉरबरोबर खेळायला खूप आवडतं," श्रुती सांगतात.

आता तो शाळेसाठीही तयार होतोय. त्याच्या या शाळेत कलेला जोपासणारं वातावरण असेल अशी आशा करूयात!

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)