92व्या वर्षी मलेशियाचे पंतप्रधान महाथीर मोहम्मद यांच्याविषयी 7 गोष्टी

मलेशियात 22 वर्षं पंतप्रधान राहिलेल्या 92 वर्षांचे महाथीर मोहम्मद पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत.

60 वर्षं सत्तेत असणाऱ्या 'बॅरिसन नॅसनल कोएलिशन'ची मक्तेदारी मोडून काढत महाथीर यांनी सत्ता काबीज केली.

एकेकाळी त्यांचे सहकारी राहिलेले नजीब रझाक यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असल्याने महाथीर निवृत्तीतून बाहेर आले आणि यंदा विरोधीपक्षातून निवडणुका लढवल्या.

"आम्हाला बदला घ्यायचा नाहीये. आम्हाला कायद्याचं राज्य प्रस्थापित करायचं आहे," असं महाथीर यांनी पत्रकारांना सांगितलं.

महाथीर यांचा शपथविधी सोहळा गुरुवारी होण्याची शक्यता आहे. 92व्या वर्षी निवडणूक जिंकून देशाची सूत्रं हाती घेणारे महाथीर जगातले सगळ्यांत वयस्कर राष्ट्रप्रमुख होण्याचा मान मिळवणार आहेत.

मलेशियात सत्ता स्थापनेसाठी 112 जागांचं बहुमत आवश्यक असतं. महाथीर यांच्या पक्षाने 115 जागांवर विजय मिळवत बाजी मारली.

महाथीर यांच्या विजयाच्यानिमित्ताने मलेशियात गुरुवारी आणि शुक्रवारी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, निवडणुकांचे निकाल स्पष्ट होताच महाथीर यांच्या समर्थकांनी देशभरात ठिकठिकाणी जल्लोष केला.

कोण आहेत महाथीर?

1. 21व्या वर्षी महाथीर यांनी United Malays National Organisation ((UMNO) पक्षाचे सदस्य झाले. केडाह या स्वत:च्या गावी त्यांनी सात वर्षं डॉक्टरकी केली. 1964 मध्ये ते संसदेवर निवडून गेले.

पण 1969 साली त्यांनी तत्कालीन पंतप्रधान टुंकू अब्दुल रहमान यांच्या कामकाजावर टीका करणारं जाहीर पत्र लिहिलं. ते पत्र चांगलंच गाजलं, ज्यामुळे त्यांना पक्षाने निलंबित केलं आणि आपल्या खासदारकीलाही मुकावं लागलं.

2. त्यानंतर महाथीर यांनी 'द मलाय डिलेमा' नावाचं पुस्तक लिहिलं. हे पुस्तक वादग्रस्त ठरलं.

देशातील मलय जनतेला मुख्य प्रवाहातून बाजूला सारलं गेलंय, त्यांच्याकडे दुर्लक्ष होतंय, असं त्यांनी या पुस्तकात लिहिलं. पण अशा सामाजिक रचनेत दुय्यम श्रेणी दर्जा स्वीकारण्यासाठी मलय लोकही तितकेच जबाबदार आहेत, असं महाथीर या पुस्तकात म्हणाले.

महाथीर यांच्या विचारांनी UMNO पक्षातील तरुण नेत्यांना आकर्षित केलं. त्यानंतर महाथीर यांना पुन्हा पक्षात समाविष्ट करण्यात आलं. 1974 मध्ये ते पुन्हा संसदेवर निवडून आले. शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी कामकाज पाहिलं, आणि अवघ्या चार वर्षांत ते पक्षाचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते झाले. 1981 मध्ये ते मलेशियाचे पंतप्रधान झाले.

3. 1990च्या दशकात महाथीर यांच्या कारकिर्दीतच मलेशियाची आशियाई क्षेत्रातील विकसित देश म्हणून ओळख प्रस्थापित झाली. 'पेट्रोनास ट्विन टॉवर्स'सारखी वास्तू महाथीर यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा भाग होता.

हुकूमशाही प्रवृत्तीचे महाथीर यांची विकास धोरणं जनतेत लोकप्रिय ठरली.

4. मात्र मानवाधिकांरांबाबत त्यांची भूमिका वादाच्या भोवऱ्यात सापडली.

महाथीर पंतप्रधानपदी असताना विरोधी पक्षाच्या नेत्यांना सखोल चौकशीविना तुरुंगात टाकण्यात यायचं.

विशेष म्हणजे उपपंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी 1988 मध्ये आर्थिक आणि राजकीय सुधारणांची मागणी केली होती. मात्र त्यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले. महाथीर यांनी अन्वर यांची पदावरून उचलबांगडी केली आणि त्यांनाही तुरुंगात धाडलं.

5. पाश्चिमात्य देशांविषयीचे त्यांचे उद्गार वादग्रस्त ठरले आहेत. 2003 मध्ये राजीनामा देण्याच्या काही दिवसांपूर्वी त्यांनी 'काही ज्यू लोकांचा गट जगावर राज्य करत आहे', असं विधान केलं होतं. अनेक राष्ट्रांमधली सरकारं आणि ज्यू संघटनांनी या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती.

ऑक्टोबर 2003 मध्ये अखेर पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्यापूर्वी ते म्हणाले, "मी खूप नाखूश आहे, नाखूश आहे कारण मला माझ्या वंशाला यश आणि मान मिळवून द्यायचा होता, आणि त्यात मी अपयशी ठरलो."

6. मोहम्मद यांनी 22 वर्षं मलेशियाचं पंतप्रधानपद भूषवलं. 2003 मध्ये ते निवृत्त झाले खरे, पण राजकीय निवृत्तीनंतरही महाथीर राजकारणात सक्रिय होते. मलेशियातील सरकारवर त्यांनी कठोर शब्दांत टीका केली होती.

त्यांच्यानंतर आलेल्या रझाक सरकारवर भ्रष्टाचाराचे आणि त्यांच्या जवळच्यांना लाभ मिळवून देण्याचे आरोप झाले. तेव्हा महाथीर यांना जाणवलं की त्यांचा रझाक यांना पंतप्रधानपदी बढती देण्याचा निर्णय चुकला. त्याचं प्रायश्चित्त म्हणून महाथीर निवृत्तीतून बाहेर येत राजकारणात पुन्हा सक्रिय झाले.

7. नजीब रझाक हे मलेशियाचे मावळते पंतप्रधान आणि महाथीर यांचे सहकारी. नजीब आणि पर्यायाने UMNO पक्षाशी वैचारिक मतभेद झाले आणि महाथीर यांनी पक्ष सोडला. UMNOचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पकाटन हरपन आघाडीत जाण्याचा निर्णय घेत महाथीर यांनी त्यांच्या समर्थकांनाही धक्का दिला.

दोन वर्षांसाठी पंतप्रधानपदी राहून मग आघाडीचे नेते अन्वर इब्राहिम यांच्याकडे देशाची सूत्रं देण्याचा विचार असल्याचं महाथीर यांनी निवडणुकीच्या आधीच सांगितलं होतं. इब्राहिम सध्या तुरुंगात आहेत.

राजकीय आयुष्यात महाथीर यांनी झालेल्या चुकांबद्दल माफीही मागितली आहे. 92व्या वर्षी देशाची सूत्रं स्वीकारणारे ते सगळ्यात वयस्क राष्ट्रप्रमुख ठरले आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)