व्लादिमीर पुतिन : या 11 पायऱ्या चढून गुप्तहेराचा झाला राष्ट्राध्यक्ष

व्लादिमीर पुतिन यांनी चौथ्यांदा रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी शपथ घेतली. मार्चमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये पुतिन यांचा विजय झाला आहे.

पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष या पदांवर ते 18 वर्षं राहिले आहेत. त्यांचे विरोधक त्यांना नेहमी वेगवेगळ्या विशेषणांनी संबोधित करतात. त्यांच्या राज्याची तुलना त्यांनी झारशी केली आहे, तर काही जण त्यांना सम्राट म्हणतात.

त्यांच्या शपथग्रहणाआधी मॉस्को आणि इतर ठिकाणी दंगलसदृश स्थिती निर्माण झाली होती. पोलीस आणि निदर्शकांमध्ये शनिवारी संघर्ष झाला.

पुतिन यांचा प्रवास: गुप्तहेर ते राष्ट्राध्यक्ष

1) पुतिन यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1952 रोजी लेनिनग्राड (आताचं सेंट पीटर्सबर्ग) इथं झाला.

2) कायद्याचं शिक्षण घेतल्यानंतर ते गुप्तहेर संघटना केजीबी मध्ये रुजू झाले.

3) तत्कालीन पूर्व जर्मनीत त्यांनी गुप्तहेर म्हणून काम केलं होतं. त्यांच्या त्यावेळच्या सहकाऱ्यांची पुतिन यांनी आपल्या कार्यकाळात मोठ्या पदांवर नेमणूक केली.

4) 1990च्या दशकात सेंट पीटर्सबर्गचे नगराध्यक्ष अॅनातोली सोबचाक यांचे ते मुख्य सहकारी होते. अॅनातोलींनी पुतिनना कायद्याचं शिक्षण दिलं होतं.

5) 1997 साली बोरीस येल्तसिनच्या काळात पुतिन क्रेमलिनमध्ये रुजू झाले आणि फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसचे प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यानंतर ते पंतप्रधानही झाले.

6) 1999 साली नववर्षाच्या मुहूर्तावर येल्तसिन यांनी राजीनामा दिला आणि पुतिन यांना हंगामी राष्ट्राध्यक्ष घोषित केलं.

7) पुतिन यांनी मार्च 2000मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहज विजय नोंदवला.

9) 2004 सालच्या निवडणुका जिंकून त्यांनी दुसऱ्यांदा पदभार घेतला.

10) रशियन राज्यघटनेप्रमाणे एका व्यक्तीला सलग तीन वेळा राष्ट्राध्यक्ष होता येत नाही. म्हणूनच पुतिन आपल्या तिसऱ्या टर्ममध्ये पंतप्रधान झाले.

11) 2012 मध्ये निवडणुका जिंकल्यानंतर त्यांना तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदी बसण्याची संधी मिळाली.

निदर्शनं का होत आहेत?

रशियाच्या एकूण 19 शहरांमध्ये निदर्शनं करणाऱ्या 1,000 निदर्शकांना अटक करण्यात आली. त्यापैकी निम्म्या जणांना मॉस्कोमध्येच अटक करण्यात आली आहे.

पुतिन यांना या निवडणुकीत 76 टक्के मतं पडली. पण अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांनी या निवडणुकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. निवडणुकीच्या काळात बेकायदा मार्गांचा वापर करण्यात आल्याचं या संस्थांचं निरीक्षण आहे. निवडणुकांमध्ये काही ठिकाणी मतपेट्यांसोबत छेडछाड करण्यात आल्याचा आरोप देखील करण्यात आला.

पैशांच्या अफरातफरीच्या प्रकरणात दोषी सिद्ध झाल्यानंतर रशियातले प्रमुख विरोधी पक्षनेते अॅलेक्सेई नवाल्नी यांना निवडणूक लढवण्यासाठी बंदी घालण्यात आली होती.

नवाल्नी यांनी हे आरोप फेटाळले होते ते म्हणतात, "हे सगळं राजकीय हेतूनं प्रेरित आहे."

एका रॅली दरम्यान नवाल्नी यांनी निदर्शनं केली होती. 'तो आमचा झार नाही,' असं घोषवाक्य असलेल्या बेकायदा रॅलीत त्यांनी सहभाग घेतल्यामुळे त्यांना अटक देखील झाली होती.

रशियामध्ये नावापुरती लोकशाही आहे, असा आरोप पुतिन यांचे विरोधक करत आहेत. पुतिन यांचे विरोधक नेहमी संसदेबाहेर राहावेत म्हणून पुतिन आणि त्यांचे समर्थक सत्तेची किल्ली त्यांच्याकडेच ठेवतात असं म्हटलं जातं.

रशियाच्या अध्यक्षपदी पुतिन कायम राहणार?

पुतिन 2000 मध्ये प्रथमच रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर 2004 मध्ये पुन्हा अध्यक्षपदी निवडून येत 2008 पर्यंत ते या पदावर कायम राहिले. 2008 नंतर त्यांचे समर्थक दिमित्री मेद्वेदेव यांच्या नेतृत्वाखाली ते देशाचे पंतप्रधान झाले.

कारण, रशियातील नियमाप्रमाणे एखादी व्यक्ती सलग दोनदा राष्ट्रपती म्हणून निवडून आल्यास त्यांना तिसऱ्यांदा ही निवडणूक लढवता येत नाही. पण, या काळात रशियाची सत्तासूत्रं कोणाच्या हाती होती याबद्दल अनेकांना शंका आहेत.

2012 मध्ये पुतिन पुन्हा रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले. यावेळी त्यांचा कार्यकाळ हा 6 वर्षांचा होता.

2024 साली जेव्हा ते आपली चौथी टर्म पूर्ण करतील तेव्हा त्यांना रशियाच्या सत्तापदी येऊन पाव शतक पूर्ण होईल.

तरी, सुद्धा सोव्हिएत रशियाचे यापूर्वीचे नेते जोसेफ स्टॅलिन यांच्यापेक्षा हा कार्यकाळ कमी ठरेल. कारण, स्टॅलिन यांनी रशियाच्या सत्तापदी तब्बल 31 वर्षं काढली होती.

तसंच, रशियाचा झार अॅलेक्झांडर दुसरा यानं 26 वर्षं रशियावर राज्य केलं होतं, तर झार निकोलस पहिला यानं 30 वर्षं रशियाची सत्ता आपल्या ताब्यात ठेवली होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)