जेव्हा निवडणूक जिंकण्यासाठी पुतिन सैन्य मागे घेण्याची घोषणा करतात

रशियानं सीरियामधून सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोईगू यांनी सोमवारी दिली.

राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नुकतीच सीरियाला अनपेक्षित भेट दिली. त्या भेटीत पुतिन यांनी सीरियात तैनात असलेल्या सैन्यपैकी काही सैन्य मागे घेण्याची घोषणा केली.

सीरियातल्या गृहयुद्धात राष्ट्राध्यक्ष बशर-अल-असद यांच्या सरकारी फौजांना यश मिळवून देण्यात रशियन सैन्यानं महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

पुतिन यांनी मागच्या वर्षी अशाच प्रकारची घोषणा केली होती, पण रशियन सैन्याच्या कारवाया सुरुच राहिल्या.

हे सैन्य मागे घेण्यास किती काळ लागेल असं विचारल्यानंतर शोईगू म्हणाले, "हे सगळं सीरियामधल्या परिस्थितीवर अवलंबून आहे."

संरक्षण मंत्री आणि जनरल स्टाफच्या प्रमुखांना सीरियातलं सैन्य कायमचं मागे घेण्याचे आदेश पुतिन यांनी दिल्याचे वृत्त वृत्त रशियन वृत्तसंस्था आरआयए नोव्होस्तीनं दिलं आहे.

"सीरियामध्ये तैनात असलेला रशियन सैन्याचा मोठा भाग मी माघारी बोलवण्याचा निर्णय घेतला आहे," असं पुतिन म्हणाले आहेत.

"दहशतवाद्यांनी पुन्हा डोक वर काढलं तर त्यांच्यावर असे हल्ले केले जातील जे त्यांनी कधीही पाहिलेले नसतील. तसंच दहशतवादी हल्ल्यांमध्ये ज्यांच्या बळी गेला आहे, या हल्यांमध्ये सीरिया किंवा रशियाची जी हानी झाली आहे ती आम्ही कधीच विसरणार नाही," असं पुतिन याबाबत पुढे बोलले आहेत.

इराणसोबत काम करण्याची रशियाची इच्छा पुतिन यांनी व्यक्त केली आहे. तसंच टर्कीसोबत मिळून सीरियामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचंही ते पुढे म्हणाले आहेत.

मागच्या आठवड्यातच पूर्व सीरियाच्या युफ्रेटस नदीच्या खोऱ्यातून IS च्या जहालवाद्यांचं संपूर्ण उच्चाटन केल्याची घोषणा सीरियानं केली आहे.

हा योगायोग नाही

रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा लढवणार असल्याचं पुतिन यांनी जाहीर केलं आहे. त्याच्या एका आठवड्यातच पुतिन यांनी सीरियातून सैन्य मागे घेण्याची घोषणा केली.

"हा फक्त योगायोग असू शकत नाही," असं बीबीसीचे मॉस्को प्रतिनिधी स्टीव्ह रोझेनबर्ग यांच म्हणण आहे.

"सीरियातून सैन्य माघारी बोलवण्याचा निर्णय रशियन मतदारांना आकर्षित करू शकतो. निवडणुकीचा मुद्दा बाजूला ठेवला तरीही मॉस्कोमधल्या अनेकांना रशियाची सीरियातली मोहीम यशस्वी झाली असंच वाटत," स्टीव्ह पुढे म्हणतात.

स्टीव्ह यांच्या मते सीरियामधल्या गृहयुद्धात हस्तक्षेप करून रशियानं असाद यांची सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवलं. असं केल्यानं त्यांना एक महत्त्वाचा मित्र मिळाला आहे. रशियाला सीरियामधल्या हमेमिम आणि टार्टस या दोन तळांवर सैन्य ठेवण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे मध्य-पूर्वेच्या राजकारणात रशियाचं महत्त्व वाढलं आहे.

जागतिक पातळीवर या युतीनं रशियाला एकटं पडण्यापासून वाचवलं आहे, असंही स्टीव्ह नमूद करतात.

2014 मध्ये रशियानं क्रिमिया बळकावल्यानंतर काही राष्ट्रांनी त्यांच्यावर निर्बंध लादले. रशियाला 'परिहा स्टेट' म्हणजेच बहिष्कृत राज्य समजलं गेलं.

पण रशियाच्या सीरियामधल्या मोहिमेनं इतर राष्ट्रांना सीरियासोबत बसून चर्चा करायला भाग पाडलं असंही स्टीव्ह नमूद करतात.

मोठी जीवितहानी

2015 मध्ये रशियानं सीरियातल्या जहालवाद्यांच्या तळांवर हवाई हल्ला केले. सततच्या पराभवांमुळे डगमगलेल्या असाद सरकारला स्थैर्य देणं हा या हल्ल्यांमागचा उद्देश होता.

मॉस्कोमधल्या अधिकाऱ्यांनी हे स्पष्ट केलं होतं की, हे हल्ले फक्त 'दहशतवाद्यांना' लक्ष करतील. पण या हल्ल्यांमध्ये बंडखोर कार्यकर्ते आणि नागरिकांचाही बळी गेला असल्याचं सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

या हल्ल्यांमुळे असद सरकारला अनेक ठिकाणी जहालवाद्यांना हरवून यश संपादन करता आलं. त्यातलं अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे अलेप्पो.

सीरिया आणि रशियाच्या वायूसेनेनं बंडखोरांनी ताब्यात घेतलेल्या अलेप्पो शहराच्या पूर्व भागात रोज हवाई हल्ले केले. या हल्ल्यांचा परिणाम होऊन 2016 मध्ये हे शहर सीरिया आणि रशियन सैन्याच्या ताब्यात आलं.

पण तोपर्यंत त्या शहरात शेकडो जणांचे जीव गेले होते. तिथली हॉस्पिटल्स, शाळा आणि बाजार सगळं उद्ध्वस्त झालं होतं असं युनोमधले मानवी हक्कांचे निरिक्षक सांगतात.

मात्र अशा प्रकारच्या हवाई हल्ल्यांमुळे नागरिकांची जीवितहानी झाल्याच्या वृत्ताचं मॉस्कोनं सतत खंडन केलं आहे.

आत्तापर्यंत रशियाने केलेल्या हल्ल्यात 6,328 लोकांचा मृत्यू झाल्याचं सीरियन ऑब्झर्वेटरी फॉर ह्युमन राईटसनं रविवारी म्हटलं आहे. यामध्ये 1,537 लहान मुलांचा समावेश आहे.

2011 मध्ये असद यांच्या सत्तेविरोधात उठाव सुरू झाल्यापासून आतापर्यंत 3,46,612 लोक मृत्यूमुखी पडल्याचं निरीक्षण यूके मधल्या एका संस्थेनं नोंदवलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)