शांबरिक खरोलिका : डिस्नेच्या आधी भारतात अॅनिमेशनला जन्म देणारा अवलिया

    • Author, राहुल रणसुभे
    • Role, बीबीसी मराठी

भारतात दादासाहेब फाळकेंचा चित्रपट येण्याआधीच चित्रपटांसारखे खेळ व्हायचे, असं सांगितलं तर?

तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण चित्रपटांचा काळ सुरू होण्याच्या 25 वर्षांपूर्वी चित्रपटांप्रमाणेच 'शांबरिक खरोलिका'चे खेळ देशभर चालायचे, असा दावा ठाण्याच्या पटवर्धन कुटुंबीयांनी केला आहे.

विशेष म्हणजे या खेळात वापरण्यात येणाऱ्या संपूर्ण तंत्रज्ञानाचं आजच्या चित्रपटांशी खूप साधर्म्य आहे.

'शांबरिक खरोलिका' हा प्रकार भारतात पहिल्यांदा आणला तो ठाण्यात राहणाऱ्या महादेव पटवर्धन यांनी. याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही महादेव पटवर्धन यांचे पणतू सुनील पटवर्धन यांची भेट घेतली. त्यांनी शांबरिक खरोलिकाच्या इतिहासाविषयी तसंच त्याच्या खेळांबद्दल बीबीसी मराठीला माहिती दिली.

तुम्हाला मॅजिक लँटर्न माहिती असेलच. याच मॅजिक लँटर्नचे देशी नाव म्हणजे शांबरिक खरोलिका.

हिंदू पौराणिक ग्रंथात शंभरासूर नावाचा एक राक्षस होता. त्याला जादूटोणा माहिती होता. त्याच्या नावावरून शांबरिक हा शब्द आला आणि लँटर्न म्हणजे मराठीत दिवा. याच दिव्याला अमरकोषातून खरोलिका हे संस्कृतनाव देण्यात आले. अशाप्रकारे मॅजिक लँटर्नचं देशी नाव म्हणून शांबरिक खरोलिका असं ठेवण्यात आलं.

या विषयी अधिक माहिती देताना सुनील पटवर्धन सांगतात, "ब्रिटिश सत्ता भारतात स्थिरावल्यानंतर वेगवेगळे कलाकार युरोपातून भारतात यायला लागले. यात काही चित्रकार होते, काही शिल्पकार होते तर काही मॅजिक लँटर्नचे शो करणारे होते. या मॅजिक लँटर्नचा उपयोग करून हे कलाकार एक स्थिरप्रकारचं चित्र जाहिरातीच्या स्वरुपात पडद्यावर दाखवत.

त्यावेळी बीबीसीआय (बॉम्बे बरोडा अँड सेंट्रल इंडिया) रेल्वेत इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेले माझे पणजोबा महादेव गोपाळ पटवर्धन यांनी हे मॅजिक लँटर्नचे शो पाहिले आणि त्यांना हा एक व्यवसाय होऊ शकतो अशी कल्पना सुचली. त्यांनी एक मॅजिक लँटर्न आणि काही स्लाईड्स विकत घेतल्या आणि त्यामध्ये काही विकसित करता येतंय का याचा विचार सुरू केला."

सुनील पुढे सांगतात, "महादेव पटवर्धन यांनी आपल्याला हव्या तशा स्लाईड्स बनवता याव्यात यासाठी त्यांचा मुलगा विनायक पटवर्धन यांना 1889 साली जेजे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घेण्यास सांगितलं. 1890 साली विनायक पटवर्धन यांनी चित्रकलेत पदवी मिळवली, त्यानंतर त्यांनी या स्लाईड्स बनवण्यास सुरूवात केली.

महादेव पटवर्धन आणि विनायक पटवर्धन या पितापुत्रानं रामायण आणि महाभारतातल्या वेगवेगळ्या स्लाईड्स तयार केल्या आणि 30 सप्टेंबर 1892 रोजी मुंबई विद्यापीठात शांबरिक खारोलिकाचा पहिला सार्वजनिक खेळ केला.

त्यांनतर यामध्ये अजून थोड्या स्लाईड्स विकसित करून 1894-1896 या दरम्यान या पितापुत्रानं महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातमधल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये शांबरिक खारोलिकाचे व्यावसायिक खेळ केले.

हिंदू पौराणिक कथांचा समावेश

"1896 नंतर पटवर्धनांनी यामध्ये विविध खेळांची भर घालण्यास सुरुवात केली. तो पर्यंत ते केवळ रामायण आणि महाभारताचेच खेळ ते करत होते. मात्र 1902 मध्ये महादेव पटवर्धन यांचं निधन झाल्यानंतर सर्व काही थांबेल असं वाटत असताना. विनायक पटवर्धन यांनी त्यांचा धाकटा भाऊ रामचंद्र पटवर्धन यांची मदत घेऊन वडिलांचं कार्य पुढे चालू ठेवलं.

या दोन्ही भावांनी पुढे 1902-1908 दरम्यान 7 वेगवेगळ्या प्रकारच्या खेळांची निर्मिती केली. यामध्ये सीता स्वयंवर, राजा हरिशचंद्र, श्रीराम चरित्र, श्रीराम जन्म, श्रीकृष्ण चरित्र, सती अनसूया आणि सर्कस असे एकूण सात खेळ त्यांनी तयार केले.

सर्कस हा खेळ खास करून लोकांच्या मनोरंजनासाठी तयार करण्यात आल्याचं, सुनील पटवर्धन सांगतात.

असे होते खेळाचे स्वरूप

पूर्वी वीज नव्हती. तेव्हा रेल्वेच्या गार्डकडे असलेल्या दिव्यांच्या प्रकाशाच्या साह्यानं शांबरिक खरोलिकाचे खेळ चालायचे. दिव्यासमोर या काचेच्या स्लाईड्स लावल्या जायच्या. ज्याचं परावर्तन सहा फूट पडद्यावर होत असे.

जसं चित्र पडद्यावर दिसू लागे तसं पडद्याच्या दोन्ही बाजूला असलेले निवेदक लोकांना कथा सांगायचे. तसंच संगीत योजनेसाठी हार्मोनियम आणि तबलाही असायचा. कथेच्या मागणीप्रमाणे अधूनमधून गाणी असायची. एका मागून एक स्लाईड्स लावून हे खेळ लोकांपूढे सादर केले जायचे.

शोसाठीच्या स्लाईड्स काचेच्या असत, या काचांवरच चित्र काढलेलं असे. युरोपीय शोमध्ये एकच स्लाईडद्वारे स्थिर चित्र दाखवलं जाई. पण, भारतीय शोमध्ये दोन ते तीन प्रकारच्या काचा एकाचवेळी बसवून वेगवेगळ्या प्रकारची हालचाल निर्माण केली जाई.

चालणारा माणूस किंवा हत्ती, झोपलेला राक्षस किंवा झोपलेल्या राक्षसाला जांभया येताहेत आणि त्याच्या तोंडामध्ये उंदीर जातोय आणि तो उंदीर खातोय अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मनोरंजनाच्या स्लाईड्सही पटवर्धन यांनी तयार केल्या.

स्लाईड्सवरील चित्रांची अशी व्हायची निर्मिती

यामध्ये वापरण्यात येणाऱ्या स्लाईड्सबद्दल माहिती देताना सुनील सांगतात, "शांबरिक खरोलिकामध्ये वापरण्यात येणाऱ्या स्लाईड्सचा आकार 8 ते 12 इंच लांब आणि 4 इंच रुंद इतका होता. यावर जी काच लावण्यात येत होती त्यावर 4 बाय 4 इंच आकाराचं चित्र काढलं जायचं. तर काही स्लाईड्समध्ये 12-15 व्यक्तीही चित्रित केलेल्या असायच्या. यांना मिनिएचर पेंटिंग म्हणतात.

ही चित्रं एका केसाच्या ब्रशनं काढली जात. एका स्लाईड्सवर 2 ते 3 काचा लावलेल्या असायच्या आणि प्रत्येकावर एकाच चित्राचे वेगवेगळे भाग रंगवलेले असायचे. जेव्हा या काचा मागेपुढे हलवल्या जायच्या तेव्हा माणूस बोलतोय, हत्ती चालतोय, कुत्रा उडी मारतोय अशा प्रकारचे आभास निर्माण व्हायचे.

भारतातील विविध राज्यात झाले प्रयोग

1906 - 1912 या दरम्यान या दोन्ही बंधूंनी भारतात अजून एक दौरा केला. यामध्ये मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र आणि कर्नाटक या सर्व ठिकाणी त्यांनी खेळ केले.

या दौऱ्यादरम्यान त्यांना विविध पारितोषिकं मिळाली. तसंच विविध मान्यवरांची प्रमाणपत्रंही मिळाली. त्यानंतर शांबरिक खरोलिकाचा 1914 ते 1916 असा आणखी एक दौरा झाला आणि सिनेमा युग आल्यानंतर पटवर्धन बंधूंनी हा व्यवसाय बंद केला.

आजच्या चित्रपटांमधील सर्व तंत्रज्ञानाचा वापर

शांबरिक खरोलिकामध्ये आजच्या चित्रपटातलं सर्व तंत्रज्ञान त्यांनी या स्लाईड्समध्ये आणलं होतं. म्हणजे क्लोजअप सीन, थ्रीडी इफेक्ट, ट्रीक सिन, कॉमेडी सीन, गाणी, संगीत अशा प्रकारच्या चित्रपटांमध्ये असणाऱ्या सर्व गोष्टी पटवर्धनांनी या शांबरिक खरोलिकाच्या तीन तासांच्या शोमध्ये आणल्या होत्या. म्हणजेच दादासाहेब फाळकेंच्या चित्रपटासाठी तीन तास बसण्याची सवय ही पटवर्धनांनीच लावली होती, असं सुनील सांगतात.

खेळासाठी जाहिरातींचा वापर

पटवर्धन बंधू वर्तमानपत्रात या खेळांच्या जाहिरातीही द्यायचे. त्यात तारीख, वेळ, दर आणि खेळाची सर्व माहिती असायची.

जाहिरात करण्यासाठी ते पोस्ट कार्डासुद्धा वापर करत.

संशोधनाची गरज

शांबरिक खरोलिकाचा हा ठेवा 1983 साली सरकारच्या आखत्यारित असलेल्या राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाला भेट देण्यात आला आहे. आज शंभर वर्षांनंतरही त्या स्लाईडवरील रंग अजून जसेच्या तसे आहेत. यावर संशोधन होण्याची गरज आहे. शांबरिक खरोलिकावर संशोधन व्हावं, यावर निबंध लिहिले जावेत आणि चांगल्या पद्धतीनं हा ठेवा जतन केला जावा, अशी पटवर्धन कुटुंबीयांची इच्छा आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)