You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबई : यूट्युबमुळे 40 वर्षांनंतर भेटले हे दोन भाऊ!
'आमच्या सर्व अपेक्षा धुळीस मिळाल्या होत्या. त्यांना आम्ही जिवंत पाहू शकतो याची आम्हाला काही खात्री नव्हती,' हे शब्द आहेत खोमद्राम कुलाचंद यांचे.
40 वर्षांपूर्वी एक माणूस बेपत्ता झाला. तो सापडण्याची आशा त्याच्या कुटुंबीयांनी सोडलेली होती. पण यूट्युबवर व्हायरल झालेल्या व्हीडिओमुळे ती व्यक्ती आपल्या कुटुंबीयांना परत भेटली.
खोमद्राम गंभीर सिंह 1978मध्ये मणिपूरमधून गायब झाले होते. त्यावेळी त्यांचं वय फक्त 26 वर्षं होतं. कुटुंबाला त्यांच्या पत्त्याविषयी काहीच माहिती नव्हतं.
पण काही दिवसांपूर्वी गंभीर यांच्या कुटुंबीयांनी यूट्युबवर एक व्हीडिओ पाहिला. व्हीडिओ मुंबईतला होता ज्यात एक माणूस रस्त्यावर गाणं गात होता.
गंभीर यांचे भाऊ खोमद्राम कुलाचंद्र यांनी 'द हिंदू' या वर्तमानपत्राला सांगितलं की, "माझ्या भाच्याने मला यूट्युबवर तो व्हीडिओ दाखवला तेव्हा माझा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही."
फिरोज शाकीर नावाच्या व्यक्तीनं गंभीर यांचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. शाकीर मुंबईचे आहेत. त्यामुळे गंभीरही मुंबईतंच असतील, असं त्यांच्या घरच्यांना वाटलं. हा व्हीडिओ ऑक्टोबर महिन्यात रेकॉर्ड करण्यात आला होता.
शाकीर यांनी एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितलं की, पोटाची भूक भागवण्यासाठी गंभीर रस्त्यावर उभं राहून जुन्या हिंदी चित्रपटांतील गाणे गात.
गंभीर यांची कुटुंबीयांशी भेट घालून देण्यात मुंबई पोलिसांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.
इंफाळ पोलिसांनी गंभीर यांचा एक फोटो मुंबई पोलिसांना पाठवला. गंभीर यांचा सोशल मडियावर व्हायरल झालेला फोटो आणि व्हीडिओ वांद्रे परिसरातला असल्याचं जाणवत होतं. नंतर शाकीर यांच्या मदतीनं त्यांचा तपास सुरू झाला.
लग्नानंतर नाखुश
पोलीस निरीक्षक पंडित ठाकरे यांनी बीबीसीला सांगितलं की, "आम्हाला ते रल्वे स्टेशनच्या बाहेर सापडले. त्यांची अवस्था खूपच वाईट होती."
गंभीर यांनी पोलिसांना सांगितलं की ते माजी सैनिक असून 1978मध्ये त्यांनी घर सोडलं होतं. वैवाहिक जीवनात सुखी नसल्याने घर सोडल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.
मणिपूरहून आल्यानंतर ते मुंबईला राहायला लागले. मुंबईत आल्यानंतर कधी भीक मागून तर कधी मजुरी करून त्यांनी पोटाचा प्रश्न सोडवला.
"गंभीर यांना शोधून काढल्यानंतर आम्ही त्यांच्या कुटुंबीयांना फोन केला आणि लहान भावाशी त्यांची चर्चा घडवून आणली," ठाकरे सांगतात.
मुंबई पोलिसांनी या भेटीचे फोटो त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केले आहेत.
शाकीर यांनी गंभीर यांचा मुंबईतून निघतानाचा आणि इंफाळला पोहोचल्याचा फोटो ट्वीटरवर शेअर केला आहे.
'टाइम्स ऑफ इंडिया'च्या बातमीनुसार, गंभीर यांच्या निवासासाठी कुटुंबीयांनी चांगलीच तयारी केली आहे.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)