You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'...म्हणून मी येशू ख्रिस्ताशी लग्न करून आजन्म कुमारिका राहण्याचं व्रत घेतलं'
- Author, वॅलेरिया परासो
- Role, सामाजिक घडामोडी प्रतिनिधी, बीबीसी
जेसिका हायेस यांनी स्वत:च्या लग्नासाठी पारंपरिक वेश विकत घेतला. व्हेल (ख्रिश्चन धर्मात लग्नात वधू डोक्यावर पदर घेते त्यासदृश्य कापड) आणि अंगठीही घेतली. मात्र जेव्हा त्या विवाहस्थळी धर्मगुरूसमोर उभ्या राहिल्या तेव्हा त्यांच्या बाजूला त्यांचा होणारा नवरा नव्हता.
हायेस (वय 41) या एक पवित्र कुमारिका आहेत. ज्या स्त्रियांना स्वत:ला देवाची वधू म्हणवून घ्यायची इच्छा असते त्या स्त्रिया कुमारिका बनतात त्यांना 'कॉन्सिक्रेटेड व्हर्जिन्स' असं म्हणतात.
कॅथलिक पंथातही ही प्रथा फारशी प्रचलित नाही. कारण चर्चने सुद्धा या प्रथेला मान्यता देऊन पन्नासपेक्षा कमी वर्षं झाली आहेत.
कॉन्सिक्रेटेड व्हर्जिन किंवा पवित्र कुमारिका होण्यासाठी एक विधी केला जातो. जसं ख्रिश्चन पद्धतीने लग्न होतं त्याचप्रमाणे सर्व तयारी केली जाते. ज्या महिलेनं पवित्र कुमारिका व्हायचं ठरवलं आहे ती नववधूप्रमाणे नटते.
आयुष्यभराच्या आणाभाका घेते आणि कधीही प्रेमसंबंधात किंवा शारीरिक संबंधात न अडकण्याची शपथ घेते.
ती अंगठीसुद्धा घालते. ही अंगठी म्हणजे येशू ख्रिस्ताशी असलेल्या समर्पणाचं प्रतीक असतं.
"मला नेहमी विचारण्यात येतं, तुझं लग्न झालंय का?" हायेस सांगतात. हायेस यांचा बीबीसीच्या 100 Women या यादीत समावेश करण्यात आला आहे.
"असा प्रश्न मला विचारला की मी अगदी थोडक्यात स्पष्टीकरण देते. मी रिलिजिअस सिस्टर सारखी आहे. (ज्या स्त्रीने धर्माला वाहून घेतल्याच्या शपथा सार्वजनिकरीत्या घेतल्या आहेत त्यांना रिलिजिअस सिस्टर म्हणतात.) मी येशू ख्रिस्तांना समर्पित आहे आणि या जगण्याचा हाच माझा मार्ग आहे असं मी त्यांना सांगते," हायेस सांगतात.
अमेरिकेत असलेल्या येशूंच्या 254 वधूंपैकी त्या एक आहेत. United States Association of Consecrated Virgins (USACV) या संस्थेनुसार या पवित्र कुमारिका नर्स, मानसोपचारतज्ज्ञ, अकांउटंट, उद्योजिका असे विविध व्यवसाय करतात. नन्सप्रमाणे त्या धर्मप्रचार करतीलच असे नाही.
जगभरात अशा 4000 पवित्र कुमारिका आहेत असं 2015 मध्ये झालेल्या एका सर्वेक्षणात आढळून आलं आहे. व्हॅटिकनच्या मते या पवित्र कुमारिकांची संख्या जगातील अनेक भागात वेगाने वाढत आहे.
नन्सप्रमाणे त्या मर्यादित गटांमध्ये राहात नाहीत किंवा विशिष्ट वेशभूषासुद्धा करत नाही. त्या धर्मनिरपेक्ष आयुष्य जगतात. त्या नोकरी करतात आणि त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो.
जसं कॉन्सिक्रिटेड व्हर्जिन असतं तसं कॅथलिक चर्चच्या परंपरेत पुरुषांसाठी काही पर्याय नाही.
"पवित्र कुमारिका होण्याच्या आधी मला कळलं की मी नन्ससारखं किंवा एखाद्या धार्मिक गटात आयुष्य जगू शकत नाही." त्या सांगतात.
हायेस शिक्षिका आहेत. शिकवणं झाल्यावर त्या प्रार्थना करतात किंवा चिंतन करतात. त्या धर्मगुरुंशी चर्चा करतात. तसेच त्यांच्या आध्यात्मिक सल्लागाराला भेटून मार्गदर्शन घेतात.
"मी गेल्या 18 वर्षांपासून शिक्षिकेची नोकरी करते. मी ज्या शाळेत शिकले त्याच शाळेत मी आता शिकवते," असं हायेस सांगतात. हायेस अमेरिकेतल्या इंडियाना राज्यातील फोर्ट वेन या भागात राहतात.
"मी चर्चच्या शेजारी राहते. माझ्या आजूबाजूला ख्रिश्चन लोक राहतात. माझ्या कुटुंबीयांना आणि मित्रमैत्रिणींना जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा मी त्यांच्या मदतीसाठी धावून जाते. मी शिक्षिका आहे त्यामुळे मी नेहमी लोकांच्या गराड्यात असते. तरीही देवासाठी माझ्या मनात एक खास जागा आहेच."
त्यांचे याआधी प्रेमसंबंध होते. मात्र तेव्हा त्यांना कधीही ते परिपूर्ण वाटले नाही.
"मला असं वाटलं होतं की मी लग्न करावं जे अतिशय नैसर्गिक आहे. माझे काही लोकांशी प्रेमसंबंध होते मात्र ते मी फार गांभीर्याने घेतले नाही.
"मी लग्नासाठी अनेक जणांचा विचार केला मात्र त्यापैकी एकाही बरोबर पुढे जावं असं मला वाटत नाही."
कायमचं वचन
कुमारिका या अगदी ख्रिस्त काळापासून धर्माचा महत्त्वाचा भाग आहेत. इसवी सनाच्या पहिल्या तीन शतकांत कौमार्य वाचवण्याच्या नादात अनेक स्त्रियांना हौतात्म्य पत्करल्याची उदाहरणं आढळली आहेत.
रोमच्या अँग्नेस यादेखील त्यापैकी एक आहेत. त्यांनी शहराच्या गव्हर्नरशी लग्न करायला नकार दिला म्हणून त्यांची हत्या करण्यात आली होती.
मध्ययुगीन काळात ही प्रथा थोड्याफार प्रमाणात कमी झाली होती. कारण धर्मगुरुंप्रमाणे जीवन जगणं लोकप्रिय झालं होतं. नंतर 1971 मध्ये Ordo consecrationis virginum या नावाने एक निवेदन जारी करण्यात आलं होतं. त्यानंतर या प्रथेचं पुनरुज्जीवन झालं. पण या निवेदनानुसार ही प्रथा ऐच्छिक असावी असं सांगण्यात आलं होतं.
हायेस यांनी पवित्र कुमारिका होण्याचा विचार कधी केला नव्हता. मात्र त्या एका आध्यात्मिक गुरुला भेटल्या. त्या गुरुने मला अगदी योग्य प्रश्न विचारले असं त्या म्हणतात.
त्यांनी 2013 मध्ये पवित्र कुमारिका होण्याचा निर्णय घेतला. वयाच्या 36 व्या वर्षी हा कार्यक्रम पार पडला.
"लग्नाआधी मला तीच कामं होती. तरी हे वेगळं होतं. कारण देवाचा मित्र होण्यापेक्षा त्याची बायको होणं वेगळं होतं."
लैंगिकता हा समाजात एक महत्त्वाचा विषय असतो. अशा वेळी कुमारिका राहणं आणि शारीरिक संबंध नाकारणं आव्हानात्मक असू शकतं.
"यामुळे लोकांच्या मनात गैरसमज निर्माण होऊ शकते. सर्वसामान्य आवडी-निवडीचे जे प्रचलित समज आहेत त्या विरोधात आपली निवड आहे असा लोकांचा ग्रह होऊ शकतो," असं हायेस सांगतात.
"तू अजून सिंगल का आहेस? असा प्रश्न मला विचारण्यात येतो. "मला सांगावं लागतं की माझं खरं नातं ईश्वराशी आहे. मी माझं शरीर त्याला अर्पण केलं आहे."
कुमारिका असण्याची गरजच नाही
मागच्या वर्षीच्या जुलैमध्ये काही सूचना जारी करण्यात आल्या. त्यानुसार पवित्र कुमारिकांमध्ये गोंधळ उडाला होता.
ज्या मुलींचं अद्याप कौमार्यभंग झालेलं नाही केवळ त्यांनीच पवित्र कुमारिकेचं व्रत स्वीकारावं अशी सूचना करण्यात आली होती. हा मुद्दा खूप चर्चेत आला.
नन्स जेव्हा दीक्षा घेतात त्यानंतर त्या शारीरिक संबंध ठेवणार नाहीत अशी शपथ घेतात. पण पवित्र कुमारिका या विधीच्या आधी आणि नंतर त्यांनी त्यांचं कौमार्य अबाधित ठेवणं अपेक्षित असतं.
या मार्गदर्शक तत्त्वांच्या कलम 88 मध्ये असं लिहिलेलं आहे की ज्या महिलेला पवित्र कुमारिका व्हायचं आहे त्या महिलेनं कौमार्य अबाधित ठेवणं हे महत्त्वाचं आहे पण पवित्र कुमारिका होण्यासाठी ती अट नाही.
United States Association of Consecrated Virgins (USACV) या संस्थेच्या हायेस सदस्य आहेत. त्यांना ही तत्त्वं निराशाजनक आहेत असं वाटतं.
"पवित्र कुमारिका होण्यासाठी कौमार्यभंग झालेला चालू शकतो असं निर्देश सांगतो, ही बाब धक्कादायक आहे," असं हायेस यांचं मत आहे.
हायेस यांच्या मते या निवेदनात आणखी स्पष्टता हवी होती. तरीही कुमारिकां बाबत चर्चने विचार केला ही बाब सुखावह आहे असं हायेस यांना वाटतं.
"उमेदवारांनी लग्न केलेलं नसावं तसेच कोणत्याही प्रकारचा पावित्र्यभंग केलेला नसावा असं त्यात नमूद केलं आहे.," त्या पुढे सांगतात.
"तारुण्यात काही दुर्घटना झाली किंवा बलात्कार झाला असेल तर ती बाई कुमारिका राहत नाही. त्यामुळे इच्छा असतानाही एखादी स्त्री कुमारिका राहू शकत नाही."
कॅथलिक स्त्रियांनी पवित्र कुमारिका व्हावं यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळण्याची आवश्यकता आहे.
" अशा कुमारिकांच्या संख्येत वाढ होतेय कारण देवाशी निष्ठा ठेवणाऱ्यांची समाजाला गरज आहे. धर्माला सुद्धा त्यांची गरज आहे." असं त्यांना वाटतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)