जर्मनीत ख्रिश्चन धर्मगुरूंकडून 'हजारो मुलांचं लैंगिक शोषण'

जर्मनीमध्ये 1946 ते 2014 दरम्यान रोमन कॅथलिक चर्चच्या धर्मगुरूंनी सुमारे 3600हून अधिक मुलांचं लैंगिक शोषण केलं, असं एका फुटलेल्या अहवालातून स्पष्ट झालं आहे.

फुटलेल्या अहवालानुसार 1670 खिस्ती धर्मगुरुंनी 3677 अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचं, Spiegel Online या जर्मन न्यूज वेबसाइटने म्हटलं आहे.

या बातमीनंतर "ही एक धक्कादायक आणि लाजिरवाणी" बाब आहे अशी प्रतिक्रिया चर्चच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

जगभरातल्या रोमन कॅथलिक चर्चमध्ये गेल्या काही दशकात झालेल्या लैंगिक अत्याचारांचा सध्या शोध घेतला जात आहे. त्यापैकीच हा एक अहवाल आहे.

आतापर्यंत अवघ्या 38 टक्के धर्मगुरूंवर आतापर्यंत कारवाई झाली आहे. त्यापैकी अनेक जणांवर केवळ शिस्तभंगाची किरकोळ कारवाई झाली आहे, असं जर्मन मीडियाचं म्हणणं आहे. प्रत्येक सहापैकी एका धर्मगुरूवर बलात्काराचा आरोप आहे.

या प्रकरणांमध्ये बहुतेक पीडित हे मुले आहेत आणि त्यांचं वय 13 वर्षं किंवा त्याहून कमी आहे.

अपराधानंतर धर्मगुरू जाणूनबुजून नव्या ठिकाणी जायचे. नवीन ठिकाणी धर्मगुरूंच्या आधीच्या वागण्याबद्दल कोणतीही कल्पना नसायची.

जर्मनीच्या तीन विद्यापीठांनी एकत्र येऊन हा अहवाल तयार केला आहे. 27 चर्चच्या अखत्यारितल्या (dioceses) 38 हजार कागदपत्रांचा यात अभ्यास करण्यात आला.

दरम्यान, "काही कागदपत्रं नष्ट केली आहेत किंवा त्यांच्याशी छेडछाड केली आहे, नाहीतर खरी परिस्थिती यापेक्षा भयानक असू शकते," असं हा अहवाल सादर करणाऱ्या लेखकांचं म्हणणं आहे.

कॅथलिक चर्चने काय प्रतिक्रिया दिली?

"लैंगिक अत्याचारांचा आवाका आम्हाला या चौकशीतून दिसून आला आहे. हे आमच्यासाठी धक्कादायक आणि लाजिरवाणं आहे," असं जर्मन बिशप कॉन्फरन्सचे प्रवक्ते स्टिफन अकेरमन म्हणाले आहेत. जर्मन बिशप कॉन्फरन्सनेच या चौकशीचे आदेश दिले आहेत.

"पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी धर्मगुरूंची ही कृत्यं उघड करणं गरजेचं होतं. तसंच यामुळे भविष्यात अशा चुका टाळता येणार आहेत," अस ते पुढे म्हणाले.

या अहवालानंतर केवळ चर्चची माफी न मागता सगळ्यांत आधी पीडितांची माफी मागायला पाहीजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

हा अहवाल चर्चपर्यंत पोहोचण्याआधीच फुटल्याचं, अकेरमन यांनी स्पष्ट केलं. लैंगिक शोषण झालेल्या पीडितांना चर्च समुपदेशन सेवा पुरवणार आहे.

पोप काय म्हणाले?

व्हॅटिकनमधल्या चर्च प्रशासानानं Spiegel Online च्या वृत्तावर ताबडतोब प्रतिक्रिया देण्याचं टाळलं. पण बुधवारी पोप फ्रान्सिस यांनी कॅथॉलिक बिशपांना याबद्दल चर्चा करण्यासाठी व्हॅटिकन सिटीला बोलावून घेतलं. पुढच्या वर्षीपासून मुलांचं लैंगिक शोषण कसं टाळता येईल यावरही ते चर्चा करणार आहेत.

जगभरात धर्मगुरूंनी लैंगिक शोषण केल्याचे आरोप होतं आहेत. या घटनांकडे आतापर्यंत चर्चच्या नेत्यांनी दुर्लक्ष केल्याचं दिसून आलं आहे.

अमेरिकेमधल्या चर्चच्या मुख्याधिकाऱ्यांवरील आरोपांकडे पोप फ्रान्सिस यांनी तब्बल 5 वर्षं दुर्लक्ष केल्याचा गौप्यस्फोट, व्हॅटिकनच्या माजी राजदूतानं गेल्या महिन्यात केला होता.

पोपच्या समर्थकांनी या गौप्यस्फोटावर आक्षेप घेतला होता. पोपनं या माजी राजदूताच्या आरोपावर कोणतीही प्रतिक्रिया द्यायला नकार दिला.

ऑगस्टमध्ये पोप यांनी जगाला उद्देशून लिहिलेल्या पत्रात बाल लैंगिक अत्याचाराचा निषेध केला आहे.

काही दिवसांपूर्वी, गेल्या 7 दशकांत अमेरिकेतल्या पेन्सिल्व्हेनिया राज्यात झालेल्या लैंगिक अत्याचाराची चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत 300 धर्मगुरूंनी 1 हजारांहून अधिक मुलांचं लैंगिक शोषण केल्याचं उघडकीस आलं होतं. चर्चनं या प्रकारावर जाणीवपूर्वक पांघरून घातल्याचंही यामध्ये लक्षात आलं होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)