You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
केरळ : नन बलात्कार प्रकरणात माजी ख्रिस्ती धर्मगुरू फ्रँको मुलक्कल दोषमुक्त
- Author, इम्रान कुरेशी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
जालंधरचे ख्रिस्ती धर्मगुरू (बिशप) फ्रॅंको मुलक्कल यांना ननवरील बलात्कार प्रकरणात दोषमुक्त करण्यात आलं आहे.
केरळच्या कोट्टायम जिल्हा न्यायालयाने फ्रँको यांना सर्व आरोपांमधून मुक्त केलं. 6 मे 2014 ते 23 सप्टेंबर 2016 या काळात त्यांनी एका ननवर बलात्कार केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
या प्रकरणाच्या निकालाची सुनावणी सुरू असताना खबरदारी म्हणून कोट्टायम जिल्हा न्यायालयाबाहेर कठोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
प्रकरणात काय-काय घडलं?
तीन-चार वर्षांपूर्वी केरळमध्ये नन्सच्या आंदोलनामुळे हे प्रकरण देशभरात चर्चेत आलं होतं.
त्यावेळी मिशनरीज ऑफ जिजस आणि कॅथोलिक लॅटिन चर्चने मात्र आंदोलन करणाऱ्या नन्सना निदर्शनात भाग न घेण्याचा सल्ला दिला होता.
या प्रकरणातील पोलीस तक्रार करुनसुद्धा तिची दखल घेतली जात नसल्याचा पीडित ननचा आरोप होता. त्यानंतर केरळ कॅथोलिक चर्च रिफॉर्मेशन आंदोलनाचे प्रतिनिधी जॉर्ज जोसेफ यांनी यासंदर्भात केरळ हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
10 ऑगस्ट 2018 रोजी यासंदर्भात न्यायालयात जेव्हा याचिका दाखल झाली तेव्हा पोलिसांनी ननच्या आरोपात तथ्य आहे हे दाखवणारे काही पुरावे मिळाले आहेत, अशी माहिती कोर्टात दिली. त्यानंतर कोर्टाने हा खटला काळजीपूर्वक हाताळण्याचे आदेश दिले होते.
जेव्हा कोणतीही कारवाई झाली नाही तेव्हा जोसेफ यांनी कोर्टात एक आणखी याचिका दाखल केली. ती विभागीय खंडपीठाकडे सुनावणीसाठी आली. कोर्टाने सुनावणीसाठी 13 सप्टेंबर 2018 ही तारीख निश्चित केली. तेव्हापासून हे प्रकरण न्यायप्रविष्टच होतं.
जोसेफ यांनी कोर्टापुढे त्यावेळी चार मागण्या केल्या. बिशपला तात्काळ अटक करावी, संपूर्ण चौकशी उच्च न्यायालयाच्या निगराणीखाली व्हावी, बिशप मुलक्कल यांना परदेश प्रवास करण्यास मनाई करावी आणि लैंगिक अत्याचार झालेले जे पीडित साक्षीदार आहेत त्यांचं संरक्षण करावं, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत.
नंतरच्या घडामोडींदरम्यान फ्रँको मुलक्कल यांचं बिशप हे पद काढून घेण्यात आलं होतं.
या प्रकरणावरून केरळमध्ये मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. पण या कालावधीत चर्चने बाळगलेलं मौन हा चर्चेचा विषय बनला होता.
बिशपकडून आरोपांचा इन्कार
बीबीसीने मुलक्कल यांच्याशी त्यावेळी संपर्क साधला असता त्यांनी त्यांच्यावरील आरोप खोटे आहेत, असं सुरुवातीपासून सांगितलं होतं.
माझ्याविरुद्धच्या सगळ्या तक्रारी खोट्या आहेत. तक्रारदार एक वयस्क स्त्री आहे. हा प्रकार इतक्या सातत्याने आणि इतका वेळ कसा सुरू राहू शकतो, असा सवाल बिशप फ्रँको मुलक्कल यांनी उपस्थित केला. त्यांनी जालंधरच्या सॅक्रेड हार्ट कॅथलिक चर्चमधून मुलाखत दिली.
तक्रारदाराने त्यांचं नाव घेतल्यानं त्यांना लक्ष्य केलं जात आहे, असं ते म्हणाले.
"एका पुरुषाबरोबर तिचे अनैतिक संबंध होते असा तिच्यावर आरोप होता आणि त्या आरोपाची चौकशी सुरू होती. या चौकशीपासून लक्ष भरकटवण्यासाठी तिने हे आरोप लावले आहेत." असं ते म्हणाले.
या आरोपांना उत्तर देताना सिस्टर अनुपमा त्यावेळी म्हणाल्या, "पीडितेविरुद्ध हा खोटा आरोप आहे. या ननवर कुटुंब फोडण्याचा आरोप केला जात आहे, पण हे कुटुंब एकत्र कसं काय? बिशपने त्या दोघांना दबावाखाली सही करायला सांगितली आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)