खेळाडूंचं ठीक आहे, जर्सी का रिटायर होते?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयनं सचिन तेंडुलकरची 10 क्रमांकाची जर्सी अनधिकृतपणे निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

सचिन तेंडुलकर म्हणजे जगभरातल्या क्रिकेट चाहत्यांचं दैवत. चार वर्षांपूर्वी सचिननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. चाहत्यांना हळवा करणारा तो क्षण होता.

सचिन एकदिवसीय आणि ट्वेन्टी-20 प्रकारात 10 क्रमांकाची जर्सी परिधान करून खेळत असे. महान खेळाडू निवृत्त झाल्यावर त्यांची जर्सी निवृत्त होते म्हणजेच त्या क्रमांकाची जर्सी त्याच देशाच्या टीममधल्या अन्य खेळाडूंना वापरता येत नाही. बहुतांशी खेळांमध्ये हा प्रघात रुढ आहे.

24 वर्षांच्या गौरवशाली कारकीर्दीसह सचिननं नोव्हेंबर 2013 मध्ये निवृत्ती घेतली. सचिनच्या निवृत्तीसह ही 10 क्रमांकाची जर्सीही निवृत्त होईल अशी अपेक्षा होती. मात्र तसं झालं नाही.

सचिननं शेवटचा एकदिवसीय सामना 2012 मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. त्यानंतर पाच वर्ष एकाही भारतीय खेळाडूनं 10 क्रमांकाची जर्सी घातली नाही.

मात्र मुंबईचाच वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरनं गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात भारतासाठी पदार्पण केले. कोलंबोत झालेल्या लढतीत शार्दूल 10 क्रमांकाच्या जर्सीसह खेळला आणि चर्चेला उधाण आलं. शार्दूलनं या सामन्यात 7 षटकांत 26 धावा देत एक विकेट मिळवली.

चाहत्यांचा लाडका असलेल्या सचिनची जर्सी परिधान केल्यानं शार्दूलवर प्रचंड टीका झाली. सोशल मीडियावर शार्दूलला तीव्र विरोधाला सामोरं जावं लागलं. बीसीसीआयवरही सर्वस्तरांतून टीका झाली.

जागतिक आणि भारतीय क्रिकेटविश्वाचा मानबिंदू असलेल्या सचिनशी संलग्न जर्सीवरून ओढवलेला वाद लक्षात घेऊन बीसीसीआयनं अनधिकृतपणे ही जर्सी अन्य कुणाला वापरू न देण्याचा म्हणजेच जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

'10 क्रमांकाच्या जर्सीशी 90 सालापासून आमच्या असंख्य आठवणी जोडलेल्या आहेत', अशा स्वरुपाच्या प्रतिक्रियांचा सोशल मीडियावर पाऊस पडला.

10 क्रमांकाची जर्सी सचिनव्यतिरिक्त आणखी कोणाच्या अंगावर पाहू शकत नाही अशा शब्दांत क्रिकेटरसिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान जगप्रसिद्ध अशी 10 क्रमांकाची जर्सी परिधान करण्याच्या निर्णयामागचा विचार शार्दूलनं स्पष्ट केला. वाढदिवसाच्या तारखेनुसार 10 क्रमांक निवडल्याचं शार्दूलनं सांगितलं.

शार्दूलची जन्मतारीख आहे 16-10-1991. यातल्या सगळ्या आकड्यांची बेरीज केली तर 28 ही संख्या येते. 2 +8 = 10 होत असल्यानं जर्सीसाठी 10 क्रमांक निवडल्याचं शार्दूलने सांगितलं.

प्रचंड टीकेचा धनी झाल्यामुळे शार्दूलनं न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यात 54 क्रमांकाची जर्सी परिधान केली होती.

फिलीप ह्यूजची जर्सीही निवृत्त

डोक्यावर चेंडू आदळल्यानं ऑस्ट्रेलियाचा युवा क्रिकेटपटू फिलीप ह्यूजचं 2014 मध्ये निधन झालं होतं. डोकं आणि मानेजवळ चेंडू आदळल्यानं ह्यूज मैदानातच कोसळला होता.

त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. मात्र या दुर्देवी घटनेत ह्यूजचं निधन झालं.

या अपघातानं क्रिकेटविश्वावर शोककळा पसरली. फिलीपचा मित्र आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कनं क्रिकेट ऑस्ट्रेलियाला फिलीपची 64 क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याची विनंती केली.

क्लार्कची विनंती आणि चाहत्यांच्या भावना लक्षात घेऊन क्रिकेट ऑस्ट्रेलियानं 64 क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला.

'ह्यूजप्रती आमची ही आदरांजली आहे. आमची ड्रेसिंगरुम पूर्वीसारखी कधीच असणार नाही', असं ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कनं सांगितलं.

मॅराडोनाची जर्सीही रिटायर

अर्जेंटिनाचे महान खेळाडू दिएगो मॅराडोना 10 क्रमांकाच्या जर्सीसह खेळत असत. गोल करण्याच्या अद्भुत क्षमतेसाठी जगप्रसिद्ध मॅराडोना यांच्यामुळेच विविध खेळातल्या खेळाडूंना 10 क्रमांकाची जर्सी परिधान करण्याची प्रेरणा मिळाली.

मॅराडोना यांनी 1997 मध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर चार वर्षांनंतर 2001 मध्ये अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशननं मॅराडोना यांचा सन्मान म्हणून 10 क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला.

अर्जेंटिनानं 21 वर्षांखालील आणि युवा संघासाठीही 10 क्रमांकाची जर्सी उपलब्ध करून दिली नाही. मॅराडोना यांनी 138 सामन्यात अर्जेंटिनाचं प्रतिनिधित्व केलं आणि 61 गोल केले.

मात्र काही वर्षांनंतर मॅराडोना यांनी स्वत:च अर्जेंटिनाचा किमयागार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला 10 क्रमांकाची जर्सी देण्याचा निर्णय घेतला.

मायकेल जॉर्डन यांची 23 क्रमांकाची जर्सी

अमेरिकेचे जगप्रसिद्ध बास्केबॉल खेळाडू मायकेल जॉर्डन 10 क्रमांकाची जर्सी परिधान करून खेळत असत. जॉर्डन आणि 10 क्रमांकाची जर्सी हे समीकरण जगभरातील चाहत्यांच्या मनात पक्कं झालं होतं.

जॉर्डन यांनी 1984 मध्ये शिकागो बुल्सकडून खेळायला सुरुवात केली. दमदार खेळाच्या जोरावर जॉर्डन यांनी शिकागो बुल्सला 1991, 1992 आणि 1993 मध्ये जेतेपद मिळवून दिलं.

1993 मध्ये जॉर्डन यांनी खेळातून निवृत्ती घेतली. मात्र दोन वर्षांतच निवृत्तीतून बाहेर पडत त्यांनी पुन्हा एकदा शिकागो बु्ल्सकडून खेळायला सुरुवात केली. 1999 पर्यंत ते शिकागो बुल्सचं प्रतिनिधित्व करत होते.

लहानपणी जॉर्डन 45 क्रमांकाच्या जर्सी परिधान करून खेळत असत. त्यांचा भाऊ लैरी हा सुद्धा याच क्रमांकाची जर्सी परिधान करून खेळत असे. अव्वल स्तरावर खेळायला सुरुवात केल्यानंतर जॉर्डन यांनी क्रमांक निम्म्यावर आणून 23 केला. निवृत्त झाल्यानंतर जॉर्डन यांचा सन्मान म्हणून 23 क्रमांकाची जर्सीही निवृत्त करण्यात आली.

तुम्ही हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)