You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
BBC Innovators : ‘एज्युकेट गर्ल्स’चं गावकऱ्यांना आवाहन - लग्नाचं नको, शिक्षणाचं बघा!
- Author, डेव्हिड रीड
- Role, बीबीसी इनोव्हेटर्स
एका राजस्थानी मुलीला शाळेत जाण्यापूर्वी किती कामं करावी लागतात याची स्वत:च्या डोळ्यांनी पाहणी केल्याशिवाय कल्पना करता येणं कठीण आहे.
काही जणींसाठी घरातली कामं जास्त महत्त्वाची आहेत. त्यांच्याकडून शाळेत जाण्याला नगण्य महत्त्व दिलं जातं.
पण शिक्षणामुळे आयुष्य कसं बदलत हे अनुभवण्यासाठी ३० लाख मुलींनी शाळेत जावं म्हणून भारतातली एक स्वयंसेवी संस्था प्रयत्न करत आहे.
भगवंती लस्सीरामच्या दिवसाची सुरुवात पोळ्या बनवण्यानं होते. गरम तव्यावर हात भाजणार नाहीत याची काळजी घेत सराईतपणे ती पोळ्या भाजते.
नंतर कोंबड्यांना खायला देऊन भांडी घासते. त्याच वेळी तिचे वडील तिला पुढच्या कामाची आठवण करून देतात.
"शेळ्यांना माळावर चरायला नेलं पाहिजे, उशीर करू नकोस".
अखेरीस तिला केस विंचरण्यासाठी उसंत मिळते. शाळेत जाणाऱ्या इतर मुलींप्रमाणे ती व्ही आकारात दुमडून ओढणी पुढे घेते आणि खांद्यावर दप्तर अडकवून चार किलोमीटर दूर असलेल्या शाळेला जाण्यासाठी निघते.
"शाळा खूप लांब असल्यानं आमच्या गावातल्या बऱ्याच मुली शाळेतच जात नाहीत," ती सांगते.
"आमच्या गावात १० वी पर्यंत शाळा असती तर आणखी बऱ्याच मुली शाळेत गेल्या असत्या."
"महामार्ग ओलांडून शाळेला जावं लागतं. तिथं बरेच ट्रक ड्रायव्हर दारू पिऊन बसलेले असतात. म्हणून मुलींना शाळेत जाण्याची भीती वाटते," असं भगवंती सांगते.
लग्नामुळे बंद होतं शिक्षण
'एज्युकेट गर्ल्स' संस्थेचे कार्यकर्ते गावांमध्ये घरोघरी जाऊन शाळेत न जाणाऱ्या मुलींना शोधून काढतात.
त्यांच्या कुटुंबीयांशी बोलून मुलींना शाळेत पाठवण्याचं महत्त्व समजावून सांगतात आणि त्यांच्याबरोबर बसून मुलींना परत शाळेत पाठवण्याबाबत नियोजन करतात.
हे स्वयंसेवक शाळांमध्येही काम करतात. शाळेत स्वच्छता गृह आहे की नाही याची खात्री करून घेतात. मुलींची शिकवणी घेतात. हिंदी, गणित आणि इंग्रजी या विषयांचे वर्ग घेतात.
त्यांनी आजवर लाखो मुलांना मदत केली आहे आणि दीड लाख मुलींना त्यांनी पुन्हा शाळेत प्रवेश मिळवून दिला आहे.
'एज्युकेट गर्ल्स' टीमच्या मीना भाटी आम्हाला एका घरी घेऊन गेल्या, त्या घरातल्या चार मुलींचे बालविवाह झाले आहेत.
आता पाचव्या मुलीचंही १४ व्या वर्षी लग्न झाल्यानं तिला शाळेतून काढलं आहे.
"मुलींना शिकवण्यात अर्थ नाही असं इथल्या पालकांना वाटतं," मीना सांगतात.
"आईवडील शेतावर, मजुरीला गेल्यावर मुलीनं घरकाम करावं, गुरं पाळावी, लहान भावंडांची देखभाल करावी. मुलींसाठी शिक्षण म्हणजे वेळ वाया घालवण आहे असं त्यांना वाटतं," मीना पुढे सांगतात.
आयुष्यात मला जे काही करायचं होतं ते केवळ शिक्षण घेतल्यामुळेच शक्य झालं, असा 'एज्युकेट गर्ल्स' संस्थेच्या संस्थापक सफीना हुसेन दावा करतात.
आजच्या घडीला भारतात १० ते १४ वयोगटातील तीस लाख मुली शाळेत जात नाहीत असा अंदाज आहे.
बालिकावधू
मुलींना शिक्षणापासून रोखणारा मुख्य अडसर आहे बालविवाह.
"राजस्थानमध्ये ५० ते ६० टक्के मुलींची लग्नं १८ वर्षांच्या आत होतात. यांपैकी सुमारे ८ ते १० टक्के मुलींची लग्नं दहा वर्षांहून लहान वयात होतात," सफीना सांगतात.
युनिसेफच्या आकडेवारीनुसार भारतात इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त बालिकावधू आहेत. भारतात आज हयात असलेल्या महिलांपैकी निम्म्या महिलांचे कायद्यानं मान्य असलेल्या वयापेक्षा म्हणजे १८ वर्षांहून लहान वयात लग्न झालेलं आहे.
'एज्युकेट गर्ल्स' टीमच्या एक सदस्य नीलम वैष्णव यांना या मुलींवर येणाऱ्या दबावाचा स्वानुभव आहे. वयाच्या १४व्या वर्षी त्यांच वहिनीच्या भावाशी लग्न लावून देण्यात आलं होतं.
प्रथेप्रमाणे लग्नानंतर त्या पतीच्या घरी गेल्या, लग्नानंतर त्या शिक्षण सोडणार नाही हे अगोदरच ठरलं होतं. परंतु सासरच्या लोकांनी त्यांचं वचन पाळलं नाही. तेव्हा त्यांनी ते लग्न मोडण्याचा निर्णय घेतला.
"घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्यावर मला खूप त्रास झाला. गावकरी मला टोमणे मारत, नावं ठेवत, ते आजही चालू आहे. मी चरित्रहीन आणि निर्लज्ज आहे असा सासरच्या माणसांचा आरोप आहे," ती सांगते.
'सर्वांत मोठी संपत्ती'
इकडे शाळेत भगवंती भविष्याचं स्वप्न पाहत आहे.
"शिक्षण पूर्ण करून मला शिक्षक व्हायचं आहे. इतर मुलींना शिकवायचं आहे. शिकल्यामुळे हिंमत येते," असं ती म्हणते.
"नोकरी करून माझ्या पायावर उभी राहिले तर मी माझ्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावू शकेन," असं ती पुढे सांगते.
हे बोल सफीना यांना मधुर संगीताप्रमाणे सुखावतात. कुटुंबात मुलींना महत्त्वपूर्ण स्थान मिळावं. मुलींचं आरोग्य, पोषण आणि शिक्षण योग्य झालं तर देशातले अनेक कळीचे प्रश्न सुटतील अशी त्यांना खात्री आहे.
"मुलींच्या शिक्षणानं कोणत्याही विकास निर्देशांकात सुधारणा करता येते. त्यामुळे मुलगी हीच आपली सर्वात मोठी संपत्ती आहे," असं त्या सांगतात.
बीबीसीच्या या प्रकल्पाला बिल आणि मेलिंडा गेट्स फाउन्डेशनकडून अर्थसहाय्य मिळालं आहे.
हे पाहिलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)