You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
काय होतं जेव्हा बंद बॉटल उघडते? - दृष्टिकोन
- Author, दिव्या आर्य
- Role, बीबीसी प्रतिनिधी
जाधवपूर विद्यापीठातील एका प्राध्यापकाने महिलांबाबत वादग्रस्त विधान केलं. त्यानंतर त्यांना विद्यापीठाने निलंबित केलं आहे. याच विषयावर बीबीसीच्या प्रतिनिधी दिव्या आर्य यांनी ब्लॉग लिहिला आहे.
एका प्रतिष्ठित विद्यापीठाचे प्राध्यापक महोदय मुलांमध्ये मुलींच्या व्हर्जिनिटीबाबत असलेल्या अज्ञानाबद्दल खूप चिंतातुर आहेत.
फेसबुकवर तरुण वर्गाला केलेल्या मार्गदर्शनात ते म्हणतात "मुलींच्या कौमार्याची माहिती मुलांनी ठेवायला हवी. व्हर्जिन मुलगी सीलबंद बाटलीसारखी असते. बिस्किट किंवा कोल्ड ड्रिंक विकत घेताना तुम्ही सील तुटलेली वस्तू विकत घेऊ शकता का?"
आता या गोष्टीचं काय नवल की जेव्हा एखादा पुरुष, मुलींची तुलना उपभोगाच्या वस्तूशी करतोय. महिलांना तसं वागवण्याची रीत तर फार जुनी आहे. या गोष्टीची जितकी निंदा करावी तितकी कमीच आहे.
जाहिरातींमध्ये युवकांना आकर्षित करण्यासाठी महिलांच्या शरीराची तुलना ही त्या उत्पादनाशी केली जाते. कारची बनावट ही मुलीच्या शरीरासारखी असल्याचं भासवून मुलांना कारकडे आकर्षित केलं जातं तर कधी बीअरची बाटली मुलींच्या शरीराप्रमाणे कमनीय असल्याचं दाखवलं जातं.
यावेळी देखील महिला या उपभोगाची वस्तू असल्याचे संकेत त्यांच्या बोलण्यातून दिले आहेत आणि मुख्य म्हणजे ती वस्तू 'शुद्ध' आहे की नाही या गोष्टीवर भर दिला जात आहे.
मुलगी व्हर्जिन हवी म्हणजे तिने कधीच शरीर संबंध ठेवलेले नसावेत. तरच ती शुद्ध असते.
प्रोफेसर साहेबांच्या मते तर मुली या जन्मतःच सीलबंद असतात आणि व्हर्जिन पत्नी तर देवदुतासारखी असते.
व्हर्जिनिटी टेस्ट
घाबरू नका, मी लग्नापूर्वी शरीर संबंध असावेत या गोष्टीचं समर्थन करत नाहीये. हे तर मुला-मुलींचा वैयक्तिक आवडी निवडीवर अवलंबून आहे.
पण मी या गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छिते की संस्कार आणि मूल्यांचा हा डोस वास्तविक पाहता एक अंगरखा आहे. मुलींनी आपल्या मर्जीप्रमाणे वागू नये यासाठी लोक संस्कारांचा बनाव करतात.
तर दुसऱ्या बाजूला मुलांची व्हर्जिनिटी समजण्याचा काही उपाय नाही तसेच त्यांच्यावर संस्काराने वागण्याचा दबाव देखील नाही. त्यांना त्यांचं स्वतःचं सील तोडायचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. मग भले ते लग्नाआधी असो वा लग्नानंतर.
त्याविषयी प्राध्यापक महोदय काही सांगत नाहीत.
पण मुलींनी आपल्या लैंगिक भावना जाहीर करू नये म्हणून त्यांच्यावर दबाव टाकला जातो.
त्यांच्या शरीरावर हक्क दाखवण्यासाठी समाज इतका अस्वस्थ झाला आहे की महाराष्ट्रातल्या कंजारभाट समाजामध्ये लग्नाच्या पहिल्या रात्री बिछाण्यावर चादर टाकली जाते आणि ती चादर पाहून व्हर्जिनिटी टेस्ट घेतली जाते.
आता याविरोधात मुलांनी आंदोलन छेडलं आहे. आपल्या पत्नीची सार्वजनिक तपासणी व्हावी याविरोधात मुलं आंदोलन करत आहेत. लग्नापूर्वी सेक्स करणं हा शुद्ध अशुद्धतेचा मापदंड नसावा हे त्यांना वाटतं.
पण प्राध्यापक महाशयांना वाटतं की प्रेम संबंधांपूर्वी किंवा लग्नासाठी होत असलेल्या बोलणी दरम्यान मुलींनी ही गोष्ट सांगावी की त्या व्हर्जिन आहेत की नाहीत. जर त्यांनी हे सांगितलं तर त्यांचा प्रियकर किंवा त्यांचा पती त्यांचा आदरच करेल असं त्यांना वाटतं.
हायमनोप्लास्टी
तसं तर ज्या सील तुटण्यावरून इतका गदारोळ झाला आहे ते सील बंद करण्याचे उपाय देखील आहेत. त्याला हायमनोप्लास्टी असं म्हणतात. लैंगिक अत्याचारादरम्यान महिलांना झालेल्या जखमा ठीक व्हाव्यात यासाठी हायमनोप्लास्टी केली जाते. पण काही ठिकाणी हायमनोप्लास्टी करून असं दाखवलं जातं की ती महिला व्हर्जिन आहे.
त्याने खरोखरच व्हर्जिनिटी परत येत नाही पण असा भास निर्माण केला जातो की ती मुलगी व्हर्जिन आहे. समाजात व्हर्जिनिटीला इतकं महत्त्व दिलं जातं की मुली ऑपरेशन देखील करतात.
आता हा प्रश्न आहे की जेव्हा एखादी मुलीचं सील तुटत असेल तेव्हा कुणी मुलगा तिच्यासोबत असेल ना. त्याचं देखील सील तुटून दोघे बाटलीत बंद असलेले बुडबुडे स्वातंत्र्याचा आस्वाद घेत असतील ना. मग हा प्रश्न मुलींनाच नाही तर मुलांना देखील विचारायला हवा.
व्हर्जिनिटीच्या मुद्द्यावर इतकं वादंग कशासाठी. हा प्रश्न प्रौढ मुला-मुलींवर सोपवून द्या. त्यांचं ते पाहून घेतली. लज्जा आणि संस्कारांचा दबाव नसेल तर शुद्धता ही व्हर्जिनिटीने नाही तर प्रेम आणि लग्नाच्या नात्यातील सत्यतेमुळे होईल.
बाटली बंद केल्याने नाही तर मुक्तपणे वाहिल्यामुळे पाणी कदाचित नितळ आणि शीतल राहील.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)