You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सौदीतून घर सोडल्यानंतर कॅनडा गाठेपर्यंतचा थरारक प्रवास
रहाफ मोहंमद अल कुनुन या 18 वर्षांच्या तरुणीनं जगाच लक्ष वेधून घेतलं होतं. ट्विटरवर तिच्यासाठी सुरु झालेल्या कँपेननंतर तिला कॅनडाने आश्रय दिला आहे. सौदी अरेबियात कुटुंबापासून सुटका करून घेत इस्लामचा त्याग केलेल्या या तरुणीने स्वतःला बँकॉकमधील हॉटेलमध्ये कोंडून घेतलं होतं आणि त्यानंतर सोशल मीडियावर मदतीची याचना केली होती.
मुलगी कॅनडात सुरक्षितरीत्या पोहोचली असली तरी या घटनेनंतर सौदी अरेबियात महिलांवर असलेल्या निर्बंधांकडे जगाचं लक्ष वेधलं गेलं.
सौदीमध्ये महिलांच्या हक्कांवर चर्चा सुरू असताना सौदी अरेबिया सोडून कॅनडात पलायन केलेल्या आणखी एका तरुणीने तिची हकीकत बीबीसीला सांगितली.
24 वर्षांच्या सालवाने तिच्या 19 वर्षांच्या बहिणीसह 8 महिन्यांपूर्वी सौदी अरेबियातून पळ काढला असून ती सध्या माँटरिअलमध्ये राहते. तिनं सांगितलेली गोष्ट तिच्याच शब्दात.
अशी केली तयारी?
गेली सहा वर्ष आम्ही देश सोडण्याची तयारी करत होतो. पण देश सोडण्यासाठी आम्हाला पासपोर्ट आणि राष्ट्रीय ओळखपत्र लागणार होतं. ही कागदपत्र मिळवण्यासाठी आम्हाला पालकांची संमती लागणार होती. सौदी अरेबियात महिलांना बऱ्याच गोष्टींसाठी पुरुष नातेवाईकाची संमती घ्यावी लागते.
सुदैवाने माझ्याकडे राष्ट्रीय ओळखपत्र होतं. मी विद्यापीठात शिकत असताना हे ओळखपत्र काढलं होतं. इंग्रजी भाषेची परीक्षा देण्यासाठी मी पासपोर्टही काढला होता. पण माझ्या कुटुंबाने पासवर्ड काढून घेतलं. ते मला परत मिळवायचं होतं.
मी किल्ली चोरली आणि डुप्लिकेट किल्ली बनवण्यासाठी दुकानात गेले. खरंतर त्यांच्या परवानगीशिवाय मला घरातून बाहेर पडता येत नव्हतं. पण ते झोपले असताना मी घरातून बाहेर पडले. पण जर का मी सापडले असते तर मार खाल्ला असता.
किल्ली मिळाल्यानंतर मी माझा आणि माझ्या बहिणीचा पासपोर्ट मिळवला आणि वडील झोपी गेले असताना मी त्यांचा मोबाईलही चोरला.
त्यांच्या फोनवरून मी गृहमंत्रालयाच्या वेबसाईटवरील वडिलांचा नोंदणीकृत नंबर बदलून त्या जागी माझा नंबर टाकला.
त्यांच्याच फोनवरून मी आम्हा दोघींना देश सोडून जाण्यासाठी परवानगी देऊ केली.
पलायनाचा दिवस
घरी सगळे झोपले असताना आम्ही घरातून पळ काढला. त्यावेळी आम्ही फार तणावाखाली होतो. आम्हा दोघींना गाडी चालवता येत नाही, म्हणून आम्ही टॅक्सी बोलावली. सुदैवाने सौदीतील बहुतेक टॅक्सी चालक परदेशी आहेत. कुणी तरी एकट्याने प्रवास करत असेल तर त्यांना विचित्र वाटत नाही. आम्ही रियाधमधील किंग खालीद विमानतळावर पोहोचलो. आम्ही काय करत आहोत, हे जर कुणाच्या लक्षात आलं असतं तर आम्हाला मारूनच टाकल असतं.
कॉलेजच्या शेवटच्या वर्षात असताना मी एका हॉस्पिटलमध्ये काम करत होते, त्यामुळे विमानाचं तिकीट आणि ट्रान्झिट व्हिसासाठी लागणारे पैसे माझ्याकडे होते. बेरोजगारांना जे फायदे मिळतात, त्यातूनही मी काही पैसे साठवले होते.
मी आणि माझी बहीण विमानात बसलो. विमानातून प्रवास करण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. मला आनंद झाला होता, भीतीही वाटत होती. भावभावनांचा कल्लोळ माजला होता.
आम्ही घरात नाही हे लक्षात येताच, वडिलांनी तातडीने पोलिसांना फोन केला. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. मी गृहमंत्रालयाच्या अकाऊंटवर वडिलांचा फोन नंबर बदलून तिथं माझा नंबर अपडेट केला होता. त्यामुळे गृहमंत्रालयातील अधिकारी जेव्हा वडिलांना फोन करायचे तेव्हा तो कॉल मला येत होता. पोलिसांनी वडिलांसाठी पाठवलेले मेसजही मलाच येत होते.
कॅनडात पोहोचले तो क्षण
खरंतर सौदीमध्ये महिलांसाठी काही जीवन नाही. मी विद्यापीठात शिक्षण घेतलं आहे. शिक्षण संपल्यानंतर मी दिवसभर घरीच असायचे, मला काहीच काम नव्हतं.
पुरुष महिलांपेक्षा वरचढ असतात असं मला सांगितलं जायचं. रमजान महिन्यात उपवास करण्यासाठी आणि नमाज पठणासाठी माझ्यावर सक्ती केली जायची.
जर्मनीत मी एका वकिलाची भेट घेतली. आश्रय मिळवण्यासाठी मला अर्ज करायचा होता. मी त्या वकिलाला माझी कथा सांगितली. मी कॅनाडात आश्रय मागण्याचा निर्णय घेतला, कारण तिथं मानवी हक्कांबद्दल या देशाची मोठी प्रतिष्ठा आहे. सीरियातील निर्वासित कॅनडात स्थायिक होत असल्याच्या बातम्या मी वाचवल्या होत्या.
कॅनडाने माझी विनंती मान्य केली. त्यानंतर माझा प्रवास कॅनडाच्या दिशेने सुरू झाला. टोरांटो विमानतळावर पोहोचले, विमानातून बाहेर पडताच मला कॅनडाचा राष्ट्रध्वज डौलात फडकत असल्याचं दिसलं. मोठं यश मिळाल्याची भावना माझ्या मनात दाटून आली होती.
मी आणि माझी बहीण आता माँटरिअलमध्ये आहोत. इथं कोणताही तणाव आणि दबाव नाही. मी हेच करावं आणि हे करू नये, असा कोणातही दबाव माझ्यावर नाही.
सौदी अरेबियात भलेही पैसा जास्त असले पण इथंच स्वातंत्र्य आहे. मला घरातून बाहेर जायचं असेल तर कुणालाही विचारावं लागत नाही. हवे ते कपडे घालू शकते. मला मुक्त असल्यासारखं वाटतं.
इथंली बर्फवृष्टी, शिशिरातील पानगळ सर्व काही मला आवडते. मी फ्रेंच भाषा शिकत आहे, पण ती थोडी कठीण आहे. मी आयुष्यात खूप काही करू शकते, असं मला आता वाटत आहे.
सध्या आईवडिलांशी कोणताही संपर्क नाही. ते माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी चांगलं आहे. हेच आता माझं घर आहे. मी इथंचं चांगली आहे.
(बीबीसीच्या गॅरेथ इव्हान्स यांना आणि बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस रेडिओवरील आऊटसाईड सोर्स या कार्यक्रमासाठी दिलेल्या माहितीवर आधारित.)
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)