You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सौदी अरेबिया: आवडत्या गायकाला मिठी मारली म्हणून तिला डांबलं तुरुंगात
सौदी आरेबियामध्ये संगीत रजनीत पुरुष गायकाला मिठी मारणाऱ्या एका महिलेला अटक करण्यात आली आहे.
माजिद अल मोहांदीस असं या गायकाचं नाव आहे. तैफ या शहरात एका कार्यक्रमात ते गाणं म्हणत असताना ही महिला स्टेजवर आली.
इंटरनेटवर शेअर झालेल्या व्हीडिओत दिसतं की ही महिला या गायकाला मिठी मारतेय आणि त्याचे सुरक्षारक्षक तिला दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत.
ही घटना घडल्यानंतर त्यांनी आपलं गाणं सुरूच ठेवलं.
सौदी अरेबियामध्ये महिलांना सार्वजनिक ठिकाणी अनोळखी पुरुषांसोबत मिसळण्यात बंदी आहे.
मोहांदीस यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांच्या वेबसाईटवर त्यांचा उल्लेख "अरब गायनातील राजकुमार" असा करण्यात आला आहे. त्यांचा जन्म इराकमधला असून त्यांच्याकडे सौदी अरेबियाचं नागरिकत्व आहे.
या महिलेविरोधात त्रास दिल्याचा गुन्हा नोंद नोंदवला जाणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. इथलं प्रसिद्ध वृत्तपत्र ओखाज आणि वृत्तसंस्था इफ यांनी ही बातमी दिली आहे.
सौदी अरेबियात नैतिकतेसंबंधी कायदे कठोर आहेत. दारू पिणं, पोशाख, स्त्रीपुरुषांचं एकत्र फिरणं याबद्दल तिथं कडक नियम आहेत.
महिलांनी सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्यासंदर्भातील कायदे नुकतेच शिथिल करण्यात आले आहेत. सौदी अरेबियाचे राजकुमार मोहंमद बिन सलमान यांनी गेल्या काही वर्षांत या कायद्यांत बदल केले आहेत.
गेल्या वर्षी सौदीमध्ये बदलाचं वारं आणण्यासाठी एक 'व्हिजन 2030' आराखडा प्रसिद्ध करण्यात आला होता. यामध्ये कुटुंबनिहाय सांस्कृतिक मनोरंजनावरील खर्च सध्याच्या 2.6 टक्केवरून 2030पर्यंत 6 टक्के करण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. त्यानंतर महिलांना प्रथम महिलांना सांस्कृतिक कार्यक्रम साप्ताहिक सुटी दिवशी फुटबॉलचे सामने पाहण्यासाठी उपस्थित राहण्यासाठी परवानगी देण्यात आली.
सौदीमध्ये पहिल्यांदाच गायिकेचा जाहीर कार्यक्रम ठेवण्यात आला. यात लेबनॉनमधील प्रसिद्ध गायिका हिबा तवाजी यांनी गायन सादर केलं.
तसंच नुकताच महिलांना सौदी अखेर ड्रायव्हिंगची परवानगीही देण्यात आली.
पण अजूनही बरेच कठोर कायदे देशात आहेत. त्यात महिलांच्या पोशाखांसंर्दभातील कायद्यांचा समावेश आहे.
मोहांदीस यांना मिठी मारणाऱ्या महिलेने नकाब परिधान केल्याचं दिसतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)