You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सौदी अरेबिया : 100 अब्ज डॉलरचा घोटाळा, राजकुमारांसह 201 जण ताब्यात
सौदी अरेबियाच्या महाधिवक्त्यांनी भ्रष्टाचार आणि अफरातफरीत 100 बिलियन डॉलरचा (अंदाजे 10,000 कोटी रुपये) गैरव्यवहार झाल्याचं सांगितलं आहे.
शनिवारी रात्री सुरू झालेल्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेत आतापर्यंत 201 जणांना ताब्यात घेतलं असल्याचं शेख-सौद-अल-मोजेब यांनी सांगितलं.
त्यांनी कोणाचं नाव घेतलं नसलं तरी त्यात मंत्री, ज्येष्ठ राजकुमार आणि महत्त्वाच्या व्यापाऱ्यांचा समावेश आहे.
त्यांच्याविरोधात "गैरव्यवहारांचे सबळ पुरावे आहेत" असंही शेख मोजेब यांनी सांगितलं.
हे गैरव्यवहार उघडकीला आल्यामुळे दैनंदिन आर्थिक व्यवहारांवर कोणताही परिणाम झाला नसल्याचंही त्यांनी सांगितलं. फक्त आरोप असलेल्यांची वैयक्तिक बँक खाती गोठवली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
प्रिन्स मोहम्मद बिन सलमान या 32 वर्षीय राजकुमाराच्या नेतृत्वाखाली नव्यानं तयार केलेली भ्रष्टाचार विरोधी समिती वेगानं प्रगती करत असल्याचं शेख सौद अल मोजेब यांनी सांगितलं.
आतापर्यंत 208 लोकांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यापैकी सात जणांना सोडून देण्यात आलं आहे.
"आतापर्यंत झालेल्या चौकशीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार उघडकीस आला आहे. आमच्या तीन वर्षांच्या चौकशीत गेल्या काही दशकांत कमीत कमी 10,000 कोटी रुपयांचा दुरुपयोग झाला आहे." असं महाधिवक्त्यांनी सांगितलं.
शेख मोजेब यांनी सांगितलं की, या समितीला पुढच्या टप्प्याच्या चौकशीसाठी कायदेशीर परवानगी दिली आहे. आणि 'काही विशिष्ट लोकांची' बँक खाती मंगळवारी गोठवली आहेत.
"या प्रकरणात गुंतलेल्या आणि त्यांच्यावर ठेवण्यात आलेल्या आरोपांविषयी आणि व्यक्तींविषयी संपूर्ण जगभरात उत्सुकता आहे." असं त्यांनी पुढे बोलतांना सांगितलं.
"या प्रकरणात गुंतलेल्या व्यक्तींना सौदी कायदाच्या आधार घेता यावा म्हणून आम्ही कोणाचीच वैयक्तिक माहिती उघड केलेली नाही." ते सांगत होते.
राजकुमारसुदधा ताब्यात
ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये अब्जाधीश गुंतवणूकदार प्रिन्स अल्वाईद बिन तलाल, प्रिन्स मितेब बिन अब्दुल्लाह, रियाध प्रांताचे माजी गव्हर्नर प्रिंस तुर्की बिन अब्दुल्लाह यांचा समावेश आहे.
तसंच आधीच्या राजांचा मुलगा प्रिन्स मितेब यांना नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या प्रमुखपदावरून हटवण्यात आलं आहे.
MBC या टीव्ही नेटवर्कचे प्रमुख अल्लाविद अल इब्राहिम, सौदी अरेबियन जनरल इन्व्हेस्टमेंट अॅथॉरिटीचे माजी प्रमुख अम्र-अल-दबाग, रॉयल कोर्टचे माजी प्रमुख खलिद-अल-तुवाजिरी आणि सौदी बिन लादेन समुहाचे अध्यक्ष बक्र बिन लादेन यांचाही समावेश आहे.
याचवेळी ह्युमन राईट्स वॉचनं सौदी अधिकाऱ्यांना "चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या प्रत्येक व्यक्तींविरुद्ध कायद्याचा आधार आणि पुरावे उघड करण्याचं तसंच चौकशी दरम्यान प्रत्येक व्यक्तीला त्याचे मुलभूत अधिकार मिळावेत" असं आवाहन केलं आहे.
या अटकसत्रात अनेक मानवी हक्क कार्यकर्ते, धर्मगुरू आणि बुद्धिजिवींनाही अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण, त्यासाठी कोणतंही ठोस कारण दिलं जात नाही आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)