10 Year Challenge: प्रदूषण, विध्वंस ते साक्षरता, 10 वर्षांत अशी बदलली दुनिया

जर तुम्ही सोशल मीडियावर असाल तर #10YearChallenge बद्दल नक्कीच ऐकलं असेल. अनेक जण या चॅलेंजअंतर्गत स्वतःचे 10 वर्षांपूर्वीचे आणि आताचे फोटो शेअर करत आहेत.

गेल्या 10 वर्षांत तुम्ही किती बदलला आहात, याचं द्योतक म्हणजे हा ट्रेंड म्हणता येईल. पण हा ट्रेंड फक्त लोकांच्या प्रोफाईल पिक्चर्सपर्यंत मर्यादित राहिला नाहीये.

यामध्ये अनेक जणांनी सहभाग घेतलाय तर काही जणांनी या ट्रेंडवर टीकाही केली आहे. यातून लोकांचा आत्मकेंद्रितपणा, त्यांच्यातील पुरुषी मानसिकता दिसून येते, अशी टीका केली जात आहे.

दरम्यान, 10 वर्षांत जगभरात झालेले मोठे बदलही यातून ट्रेंडमधून काही लोक दाखवत आहेत.

हवामान बदल

फुटबॉलर मेसूट ओझिल यानं जागतिक हवामान बदलाबाबत एक ट्वीट केलं आहे.

यामध्ये त्यानं एक मोठ्या हिमनगाचा फोटो टाकून त्याखाली 2008 साल, असं लिहिलंय. त्यासोबतच बाजूला 2018 साली तो हिमनग पूर्णतः वितळल्याचं दाखवलं आहे. कॅप्शनमध्ये मेसूट लिहितो, "या एकमेव #10YearChallenge कडे आपण गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे."

दरम्यान हे ट्वीट पूर्णत: खरं नाहिये. डावीकडचा फोटो हा अंटार्क्टिकामधल्या Getz Ice Shelf चा आहे. तो 2008 ऐवजी 2016मध्ये काढण्यात आला होता. पण, हिमनग झपाट्यानं वितळत आहेत, याविषयी कोणतंही दुमत नाहिये.

नासाच्या संशोधनानुसार दरवर्षी 127 गिगाटन बर्फ वितळत आहे तर ग्रीनलँडमध्ये हेच प्रमाण वर्षाला 286 टन आहे. समुद्र हे पृथ्वीवरील वाढतं तापमान सगळ्यात जास्त शोषून घेतात, असं संशोधनात दिसून आलं आहे.

19व्या शतकापासून जमिनीचं तापमान हे 0.9 डिग्री सेल्सिअसनं वाढलं आहे. त्यापैकी बरचसं तापमान हे गेल्या दशकातच वाढलं आहे.

जर्मनीचे पाकिस्तानमधले राजदूत मार्टिन कॉबलर यांनीही असे फोटो ट्वीट केले आहेत. त्यामध्ये बलुचिस्तानमध्ये हवामान बदलाचा झालेला परिणाम दाखवण्यात आला आहे.

"हवामान बदलाची पातळी चिंताजनक स्थितीवर. जगभरात हवामान बदलामुळे प्रभावित झालेल्या देशांपैकी पाकिस्तानचा आठवा नंबर लागतो. बलुचिस्तानमध्ये पाण्याच्या कमकरतेमुळं मनुष्य आणि जनावरांचं आयुष्य धोक्यात आहे. 10 वर्षांनंतर हे बदलू शकतं किंवा अजून खराब होऊ शकते. हे सगळं आपल्यावर अवलंबून आहे," असं ते या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

प्लास्टिक प्रदूषण

प्लास्टिकपासून होणाऱ्या प्रदूषणाबाबत 2018मध्ये बरीच जागरूकता आली आहे. वैज्ञानिकांच्या मते दरवर्षी समुद्रात 10 टन प्लास्टिक कचरा फेकलं जातं. हा कचरा साफ करायला आणखी 100 वर्षं लागतील, असं सांगितलं जात आहे.

या मुद्द्यांवर काम करणारे कार्यकर्ते लोकांचं आकर्षण खेचण्यासाठी या हॅशटॅगचा वापर करत आहेत. गेल्या काही वर्षांत खूप काही बदल झाले असतील पण तुम्ही फेकलेलं प्लास्टक हे जसंच्या तसं राहणार आहे, असा संदेश ते देत आहेत.

WWF फिलिपिन्सने प्लास्टिकच्या बाटलीचा फोटो ट्वीट केला आहे. "प्लास्टिकचा एक तुकडा नामशेष होण्यासाठी शेकडो वर्षं लागतात. प्लास्टिक समस्येवर लक्ष देण गरजेचं आहे," असं त्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे.

जागतिक संघर्ष

#10YearChallenge च्या निमित्तानं जागतिक संघर्ष आणि त्यामुळे होणाऱ्या भयानक विध्वंसाकडेही लक्ष वेधलं जात आहे.

17 डिसेंबर 2010 रोजी टुनिशियात मोहम्मद बुआजिजी या फेरीवाल्यानं स्थानिक अधिकाऱ्याला लाच द्यायला नकार दिला होता. तेव्हा त्याचा फळांचा गाडा जप्त केला होता.

त्या गोष्टीला वैतागून मोहम्मदनं सरकारी कार्यालयासमोर स्वत:ला आग लावून घेतली. हीच घटना 10 वर्षांपूर्वी अरब क्रांतीचं कारण बनलं. मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेत विरोधाची लाट उसळली. त्या गृहयुद्धात अनेक जणांचा मृत्यू झाला लाखो लोक बेघर झाले.

हा विध्वंस दाखवण्यासाठी सीरिया, लीबिया आणि इराकमधली त्यावेळची आणि आताचे फोटो पोस्ट केले आहेत.

मुनिबा मजारी यांनी 2009 आणि 2019 सालचे सीरियाचे फोटो पोस्ट केले आहेत. त्यामध्ये आधीचा सामान्य सीरिया आणि आताचा उद्धस्त झालेला सीरिया दाखवण्यात आला आहे.

या सारखंच नदवा डोसरी यांनीही अशाच संदर्भातलं ट्वीट केलं आहे. यामध्ये 2009 आणि 2019 मधील येमेनची परिस्थिती दाखवली आहे.

काही सकारात्मक बदल

जगभरात झालेल्या सकारात्मक बदलाविषयीही काही लोक ट्वीट करत आहेत.

वर्ल्ड बँक आणि UNच्या आकडेवारी नुसार सध्या जगात गरिबीचं प्रमाण सगळ्यांत कमी आहे. लोकांच्या आयुष्यमानातही वाढ होत आहे.

पण हेच सगळं सत्य नाहीये. जागतिक गरिबीत घट झाली असली तरी सहारा वाळवंटाच्या नजीकच्या आफ्रिकेतली परिस्थिती खूपच बिकट आहे. त्या ठिकाणची गरिबीचा दर 41 टक्क्यांवर पोहोचला आहे.

त्याच वेळी अविकसित आणि विकसनशील देशातला साक्षरतेचं प्रमाण कमी झालं आहे. तरुणांना यांना निरक्षरतेचा जास्त फटका बसतो. नुकत्याच आलेल्या आकड्यांनुसार तरुण निरक्षरांपैकी 59% मुली आहेत.

पर्यावरण वाचवण्यासाठी कोणते प्रयत्न करता येतील याविषयी काही लोक बोलत आहेत.

सोलर पॉवर युरोपनं एक ट्वीट केलं आहे. "जगभरात 2009मध्ये सौर उर्जेचं प्रमाण 16 गीगावॅट होतं. तर तेच प्रमाण आता 500 गीगावॅट झालं आहे. वीज निर्मिती झपाट्यानं वाढवणारं हे साधन आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)