You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ट्रंप आणि किम यांची दुसरी भेट लवकरच होणार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग उन यांची भेट घेणार आहे. व्हाईटहाऊसच्या वतीने या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे.
या घोषणेच्या आधी किम जाँग यांच्या एक निकटवर्तीयाने राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांची भेट घेतली होती. यावेळी दोन्ही नेते व्हिएतनामला भेटतील असा अंदाज बांधला जात आहे.
व्हाईट हाऊसमध्ये ट्रंप यांची भेट घेणाऱ्या खास व्यक्तीचं नाव किम याँग छोल आहे. ते उत्तर कोरियाचे मुख्य मध्यस्थ आहेत.
ट्रंप आणि किम जाँग उन यांची ऐतिहासिक भेट मागच्या वर्षी जूनमध्ये सिंगापूरला झाली होती.
तेव्हा उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र नि:शस्त्रीकरणावर चर्चा झाली होती. मात्र तेव्हापासून या क्षेत्रात फारशी प्रगती झालेली नाही.
बीबीसी प्रतिनिधी बार्बरा प्लेट अशर यांचं म्हणणं आहे की किम याँग छोल यांचं वाँशिग्टनला येणं ही एक चांगली गोष्ट आहे. आण्विक मुत्त्सद्देगिरीच्या दृष्टीने हा महत्त्वाचा इशारा आहे.
जनरल किम याँग छोल एक माजी गुप्तचर अधिकारी आहेत आणि ते किम जाँग उन यांचे विश्वासू असल्याचंही सांगण्यात येतं.
अमेरिकेबरोबर उत्तर कोरियाची जी चर्चा झाली त्यातही ते मुख्य मध्यस्थाच्या रूपात समोर आले होते.
असं असलं तरी ते अनेकदा वादात सापडले आहेत. 2010 मध्ये जेव्हा ते लष्करात गुप्तचर प्रमुख होते तेव्हा दक्षिण कोरियाच्या नौकांवर झालेल्या हल्ल्यात किम यांचा हात असल्याचं मानलं जातं.
भेट खरंच होईल का?
ही भेट होऊ शकते. कारण दोन्ही देशांना ही भेट व्हायला हवी असं वाटतं.
मागची भेट अनेक घडामोडींमुळे चर्चेत होती. आधी ती रद्द झाली मग जेव्हा किम जाँग उन यांनी हाताने लिहिलेलं पत्र ट्रंप यांना दिलं तेव्हा ही भेट पुन्हा निश्चित करण्यात आली.
असं काहीतरी पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढे काय घडामोडी होतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. यावेळी हे पत्र लवकर आलंय हे मात्र नक्की.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)