कॉफी विथ करण : 'हार्दिक पंड्याऐवजी एखादी स्त्री तिच्या आयुष्यातल्या पुरुषांविषयी बोलली असती तर...' - ब्लॉग

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

बॉलीवूड दिग्दर्शक करण जोहर यांचा कॉफी विथ करण हा शो बंद होणार आहे. शोदरम्यान करण्यात आलेल्या अनेक वादग्रस्त वक्तव्यामुळे हा शो वेळोवेळी चर्चेत आलेला आहे. कॉफी विथ करणमध्ये एकदा क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि के. एल. राहुल आले असताना हार्दिकने केलेल्या एका वक्तव्याची प्रचंड चर्चा झाली होती.

कॉफी विथ करण शो आता बंद होणार आहे. या निमित्ताने बीबीसीच्या जान्हवी मुळे यांनी लिहिलेला ब्लॉग पुन्हा शेअर करत आहोत..

--------------------------------------------------------------------

"मला हार्दिक पंड्या व्हायचं आहे."

माझ्या मैत्रिणीच्या 7-8 वर्षांच्या लेकानं काही महिन्यांपूर्वी घराच्या बाल्कनीत बॅट सरसावून हे जाहीर केलं, तेव्हा आम्ही सगळे खळखळून हसलो होतो. पण पण गेल्या काही दिवसांपासून हार्दिक त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं चर्चेत आल्यापासून त्याच मैत्रिणीची झोप उडाली आहे.

'टीव्हीवर हार्दिकची बातमी ऐकल्यापासून माझा लेक विचारतो आहे, की हार्दिकला काय झालं? काय उत्तर द्यायचं त्याला? आपले हीरो मातीच्या पायांचे असू शकतात, हे त्याला कळेल का?' तिनं प्रश्न विचारला. मी तिला एवढंच म्हणू शकले, 'ही संधी आहे, त्याच्याशी बोलण्याची. मुलींविषयी कसं बोलायचं नाही आणि का, हे त्याला सांगता येईल.'

तिला पटलं, आणि मला हे जाणवलं, की खरंच ही संधी आहे क्रिकेटमधल्या आणि भारतीय समाजातल्या स्त्रियांविषयीच्या मानसिकतेविषयी बोलण्याची.

'मर्दानगी' की महिलाविरोधी मानसिकता?

महिलांना दुय्यम स्थान देणं, त्यांना एखाद्या वस्तूसारखं समजणं, त्यांच्यावर मालकीहक्क गाजवणं आणि अशा विचारसरणीतून अनेक महिलांसोबत संबंध हे 'मर्दानगी'चं समजणं आणि अभिमानानं मिरवणं ही मानसिकता नवी नाही.

आणि हो, आपल्या समाजात अशी जीवनशैली असणं हे पुरुषांना माफ आहे, स्त्रियांना नाही. म्हणजे एखाद्या स्त्रीनं तिच्या आयुष्यातल्या पुरुषांविषयी साधं बोलणंही अजून अनेकांना सहन होत नाही. मग ती गोष्ट जाहीरपणे मिरवण्याचा प्रश्नही येत नाही.

इथे हार्दिकच्या जीवनशैलीवर बोलण्याचा माझा उद्देश नाही. आपल्या वैयक्तिक आयुष्यात कुणासोबत आणि कितीजणींसोबत संबंध ठेवायचे, ही सर्वस्वी त्याची खासगी बाब आहे आणि त्यावर कुणीही टिप्पणी करणं योग्य ठरणार नाही. अनेक गर्लफ्रेण्ड्स असलेला हार्दिक पहिलाच क्रिकेटरही नाही.

पण आपल्या आयुष्यात आलेल्या स्त्रियांविषयी टीव्हीवर जाहीरपणे बोलताना त्यानं दाखवलेला अनादर एक प्रकारे चीड आणणारा आहे.

तसंच आपण 'ब्लॅक' असल्याचा उल्लेख करत केलेली टिप्पणी वर्णभेदी पूर्वग्रहांना खतपाणी घालणारी आहे. इथेच हार्दिक चुकला, आणि त्यानं ते कबूलही केलं आहे.

त्यावेळी त्याच्यासोबत असलेला के. एल. राहुलनंही मग बोलण्याच्या ओघात तीच चूक केली. बीसीसीआयनं बजावलेल्या नोटिशीला उत्तर देताना दोघांनीही माफी मागितली आहे.

पण बीसीसीआयनं या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता, हार्दिक आणि राहुलचं निलंबन केलं आहे आणि चौकशीनंतर त्या दोघांवरही किमान काही सामने बंदीची कारवाई होण्याची शक्यता आहे.

एरवी हार्दिक जे बोलला त्याकडे दशकभरापूर्वी 'बॉईज टॉक' किंवा 'लॉकर रूम बँटर' म्हणून पाहिलं गेलं असतं. 'मेन विल बी मेन' - पुरुष असेच असतात असं म्हणून मान हलवत दुर्लक्षही केलं गेलं असतं.

पण गेल्या काही वर्षांत परिस्थिती बदलली आहे आणि म्हणूनच बीसीसीआयलाही हे पाऊल उचलावं लागलं. भारतीय संघाकडून स्वतः कर्णधार विराट कोहलीनं अशा वक्तव्यांना आमचं समर्थन नाही असं स्पष्ट केलं आहे.

एका क्रिकेटस्टारचं असं अधःपतन का व्हावं?

अगदी गेल्या आठवड्यापर्यंत भारतीय क्रिकेटमधली एक यशोगाथा म्हणून हार्दिक पंड्याकडे पाहिलं जात होतं. आक्रमकतेवर पोसलेल्या नव्या पिढीचा बेधडक आणि बेदरकार क्रिकेटर अशी त्याची ओळख होती.

अगदी थोड्या कालावधीत त्यानं सुरतपासून आधी बडोदा, मग आयपीएल आणि मग टीम इंडियापर्यंत मजल मारली होती. २०१४ साली त्याच्या ऑलराऊंड कामगिरीनं बडोद्याला सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी२० ट्रॉफी जिंकून दिली आणि हार्दिकला आयपीएलचं तिकीट मिळालं.

मग पुढच्या मोसमात २०१५ साली आयपीएलमध्ये हार्दिकनं 'मुंबई इंडियन्स'ला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. वर्षभरातच हार्दिकला भारतीय संघातून पदार्पणाची संधीही मिळाली.

पण जितक्या वेगानं हार्दिकनं ही झेप घेतली होती, तितक्याच वेगानं तो खाली येऊन आदळला आहे आणि टीव्हीवरच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं हार्दिकच्या कारकीर्दीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. तर ज्याच्या 'कॉफी विथ करण' या टॉक शोमध्ये हार्दिकनं वादग्रस्त वक्तव्य केली, त्या करण जोहरनं अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

दुसरीकडे हार्दिक केवळ २५ वर्षांचा आहे, त्यानं माफी मागितल्यानं हा विषय सोडून द्यायला हवा, असं मत काही चाहते मांडत आहेत. पण खरंच हा विषय असाच सोडून देण्यासारखा आहे का?

पुरुषी मानसिकता आणि क्रिकेट

क्रिकेटमध्ये पुरुषी, स्त्रीद्वेष्टी मानसिकता अजूनही आहे आणि ती मोठी समस्या आहे. सर्वच क्रिकेटर दोषी आहेत असं अजिबात म्हणता येणार नाही आणि ही समस्या फक्त क्रिकेटपुरती मर्यादितही नाही, पण सध्या आपण फक्त क्रिकेटविषयीच बोलूया.

दोनच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. रगेल आणि रंगेल अशी ओळख असलेल्या ख्रिस गेलनं बिग बॅश लीगदरम्यान लाईव्ह मुलाखतीत महिला पत्रकारासोबत केलेलं वर्तन तुम्हाला आठवत असेल. त्यावेळीही अशीच चर्चा रंगली होती. पण परिस्थिती थोडी तरी बदलली आहे का, असा प्रश्न पडावा.

गेलसारख्या खेळाडूनं केलेली टिप्पणी असो, मिताली राजसारख्या दिग्गज क्रिकेटरला तिच्या आवडत्या पुरुष खेळाडूविषयी विचारलेला साधा प्रश्न असो, किंवा महिलांना उद्देशून शब्दांच्या आधारे केलेलं स्लेजिंग असो. अजून समस्या संपलेली नाही. स्टंप माईक, कॅमेरे आणि पुढारलेल्या विचारांच्या काळात अशा घटनांचं प्रमाण कमी जरूर झालं आहे आणि कोणी अनुचित वागलं तर त्यावर त्वरित कारवाईही होऊ लागली आहे.

गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक आणि ऑस्ट्रेलियाचा डे्वहिड वॉर्नर यांच्यात उडालेली खडाजंगी आठवा. आयसीसीन तेव्हा दोघांनाही दंड ठोठावला होता. पत्नीला उद्देशून केलेल्या स्लेजिंगमुळे आपला तोल ढासळल्याचं तेव्हा वॉर्नरनं सांगितलं होतं.

अर्थात वॉर्नरला मिळालेली सहानुभूती फार काळ टिकली नाही, कारण काही दिवसांतच बॉल टॅम्परिंग प्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं त्याच्यावर एक वर्षाच्या बंदीची कारवाई केली.

तात्पर्य म्हणजे, खेळाडूचं मनोधैर्य खच्ची करण्यासाठी त्याच्या पत्नी किंवा गर्लफ्रेण्डवर टिप्पणी करणं, एखादा खेळाडू अपयशी ठरला तर त्यासाठी त्याच्या आयुष्यातील स्त्रीला दोष देणं हेही स्त्रियांचा अपमान करणारंच आहे, याची जाणीव खेळाडू आणि चाहते सर्वांनाच व्हायला हवी.

जागरुकता निर्माण करण्याची गरज

सर्वच क्रिकेटर दोषी आहेत असं अजिबात म्हणता येणार नाही. कसं वागायचं याचा वस्तुपाठ काही क्रिकेटर्सनीच घालून दिला आहे.

हार्दिक आणि के. एल. राहुलची वक्तव्यं समोर आल्यावर राहुल द्रविडचा एक जुना व्हीडियो व्हायरल झाला आहे. कित्येक वर्षांपूर्वी MTV बकरा या शोमध्ये सायली भगतनं पत्रकार बनून द्रविडची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याला थेट लग्नाची मागणी घातली होती. द्रविडनं स्पष्ट नकार दिला आणि ज्या पद्धतीनं ती परिस्थिती हाताळली, त्याचं आजही लोक कौतुक करत आहेत.

हार्दिकचा सध्याचा कर्णधार विराट कोहलीही सुरुवातीपासून आक्रमक आणि बिनधास्त म्हणूनच प्रसिद्ध आहे. पण पत्नी अनुष्का शर्मावर टिप्पणी करणाऱ्या ट्रोल्सना त्यानं वेळोवेळी दिलेलं सडेतोड उत्तर वाहवा मिळवून गेलं.

सर्वच क्रिकेटर्सनी असंच असायला हवं, असा आग्रह करता येणार नाही. प्रत्येक चुकीसाठी खेळाडूंना पूर्णपणे दोष देऊन चालणार नाही.

कारण क्रिकेटर्स हे शेवटी समाजाचा भाग आहेत आणि समाजातल्या गोष्टींचं प्रतिबिंब त्यांच्याही वागण्यात उमटतं. पण क्रिकेटर्स हे समाजातले आयकॉन्स आहेत आणि समाज बदलण्याची ताकदही त्यांच्यात आहे.

त्यामुळंच न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंच्या संघटनेनं तर खेळाडूंमध्ये जागृती करण्यास सुरूवात केली आहे. खेळाडूंसाठीच्या मॅन्युअलमध्ये त्यांनी 'लैंगिक सहमती'वर अख्खी नियमावली दिली आहे. तिचं पहिलंच वाक्य आहे "Making good decisions is important in all aspects of life" अर्थात आयुष्यात सर्व बाबतींत योग्य निर्णय घेणं महत्त्वाचं आहे.

अशा स्वरुपाची नियमावली भारतात का असू नये? कुणी महिलांविषयी किंवा जाती-धर्म-वर्णाच्या आधारे पूर्वग्रहदूषित विचार करत असतील तर त्यांना ती विचारसरणी बदलण्यासाठी मदत करेल अशी काही व्यवस्था आपल्याकडे का नाही? हे प्रश्न मला पडले आहेत.

बीसीसीआयच्या घटनेमध्ये त्यासाठी काही बदल करावे लागणार असतील, तर तेही होणं गरजेचं आहे. हार्दिक पंड्याच्या वक्तव्यांच्या निमित्तानं ही सगळी चर्चा सुरू झाली आहे, हे एक प्रकारे उत्तमच झालं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)