You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हार्दिक पंड्यावर अशी आली जाहीर माफी मागण्याची वेळ
'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात हार्दिक पंड्याने स्वत:च्या खाजगी आयुष्याबद्दल तसंच महिलांबद्दल मतं व्यक्त केली. अभिनेता, दिग्दर्शक करण जोहर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतात. हार्दिक आणि भारतीय संघातील त्याचा चांगला मित्र लोकेश राहुल हे दोघे या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
अनेक महिलांशी संबंध असल्याचा दावा हार्दिकने या कार्यक्रमादरम्यान केला. माझ्या घरचे पुढारलेल्या विचारांचे आहेत. स्वत:च्या व्हर्जिनिटीबद्दलही आईवडिलांना सांगितलं आहे, असा खुलासा हार्दिकने केला.
क्लबमध्ये एखाद्या मुलीला किंवा महिलेला तिचं नाव का विचारत नाही असं हार्दिकला विचारण्यात आलं. त्यावर तो म्हणाला, मला मुलींना बघायला आवडतं. त्या कशा पद्धतीने वावरतात हे मी पाहतो. एक मेसेज अनेक मुलींना करण्यात गैर काय? असं वाचारत रिलेशनशिपसाठी महिलेचा होकार आहे का हे मी स्पष्टपणे विचारतो. अनेक महिलांशी माझे संबंध आहेत, असं तो म्हणाला.
आमच्या घरातलं वातावरण मोकळंढाकळं आहे. आज मी करून (सेक्स) आलो हे मी घरच्यांना सहजपणे सांगतो, असं त्यानं उघड पणे शोमध्ये म्हटलं.
मुलगा आता मोठा झाला आहे हे त्यांना ठाऊक आहे. एका पार्टीत घरचे माझ्या बाजूला होते. त्यांनी विचारलं की यापैकी कोणती तुझी मैत्रिण आहे असं त्यांनी विचारलं. ही, हीपण ही, ही असं मी त्यांना दाखवलं. तुझा अभिमान वाटतो असं घरचे म्हणाले, असं तो पुढे सांगतो.
या कार्यक्रमाचा हा भाग प्रसारित झाल्यानंतर हार्दिकवर सोशल मीडियावर जोरदार टीका सुरू आहे. या सगळ्यांची दखल घेत बीसीसीआयने हार्दिक आणि राहुल यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.
यानंतर हार्दिकने ट्वीटरच्या माध्यमातून माफी मागितली आहे.
हार्दिक प्रकरणानंतर काही वर्षांपूर्वी एम टीव्ही बकरा कार्यक्रमातील राहुल द्रविडच्या उत्तराची चर्चा आहे. भारतीय संघाची द वॉल असणारा राहुल द्रविड तंत्रशुद्ध फलंदाजीइतकाच सद्वर्तनासाठी ओळखला जातो.
एम टीव्ही बकरा टीमने त्यावेळी राहुल द्रविडला गाठलं.
छोटी मुलाखत झाल्यानंतर मुलाखत घेणाऱ्या मुलीने द्रविडशी अनौपचारिक बोलायला सुरुवात केली.
मी तुमची चाहती आहे, मी तुमच्या शाळेतही जाऊन आले आहे असं त्या मुलीने सांगितलं. थोड्या वेळाने त्या मुलीने द्रविडला तुमच्याशी लग्न करायचं आहे असं म्हणताच द्रविड ताडकन उठला. काहीही बोलू नकोस असं तिने सुनावलं.
द्रविडने स्पष्ट शब्दांत नकार दिला. मुलीने म्हणजेच प्रेझेंटरने आग्रह केला, त्यावेळी हे तुझं शिकण्याचं वय आहे, त्याकडे लक्ष केंद्रित कर असं द्रविडने सांगितलं होतं.
पण नंतर अर्थातच थट्टा करण्यासाठी हे सगळं केलं जात आहे हे स्पष्ट झालं आणि राहुलने सुटकेचा निश्वास टाकला होता.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)