You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चेतेश्वर पुजारा: ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा नायक IPLमध्ये 'अनसोल्ड' ठरतो तेव्हा...
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
भारतीय क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलियातील पहिलावहिल्या कसोटी मालिका विजयात चेतेश्वर पुजाराची भूमिका निर्णायक ठरली.
2015- Unsold
2016- Unsold
2017- Unsold
2018- Unsold
ही कुठल्या मार्केटयार्डातली पाटी नाही. शेअर ट्रेडिंग नंबर्स नाहीत. लॉटरी-लोटो सदृश खेळांची आकडेवारी नाही. हे आकडे भाळी लिहिलेल्या माणसाचं नाव आहे चेतेश्वर पुजारा. IPL अर्थात इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेच्या लिलावात गेल्या चार वर्षात पुजाराचं नाव या बासनात गुंडाळलं गेलेल्या मंडळींमध्ये आहे.
2008 मध्ये IPL स्पर्धेचा नारळ फुटला. एप्रिल-मे हा साधारण शाळा-कॉलेजच्या मुलांचा सुट्यांचा कालावधी, संध्याकाळी 7 ते 10 अशी मॅचेसची चाहते बघू शकतील अशी प्रसारणाची हुकूमी वेळ. कोटीच्या कोटी उड्डाणं घेण्याची संधी देणारे लिलाव, टियर 2 किंवा टियर 3 सिटीतल्या जेमतेम पार्श्वभूमी असणाऱ्या मुलांना आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या बरोबरीने खेळण्याची संधी देणारी स्पर्धा.
या लीगने क्रिकेटच्या गाभ्याला धक्का लावला का, हा स्वतंत्र लेखाचा विषय. दीड महिन्यात वर्षभराची पुंजी खात्यात जमा करणारी ही स्पर्धा बघता बघता आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॅलेंडरचा अविभाज्य भाग झाली. हळूहळू IPLच्या धर्तीवर जगभरात ट्वेन्टी-20 लीगचं पेव फुटलं.
सुरुवातीच्या काही वर्षात पुजारा कोलकाता नाइट रायडर्स संघाचा भाग होता. मग विजय माल्ल्यांच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ताफ्यात गेला आणि तिथून प्रीती झिंटाच्या किंग्स इलेव्हन पंजाबच्या दलात सामील झाला.
त्यानंतर IPLने पुजाराला नाकारलं. तसं होणं स्वाभाविक.
IPLची एक मॅच तीन तास चालते - प्रत्येक इनिंग दीड तासाची. 11 खेळाडूंना मिळून 20 ओव्हर मिळतात, म्हणजे साधारणत: पहिल्या चार ते पाच बॅट्समनला खेळण्याची संधी जास्त.
बॉलर्सचं आयुष्य आणखी वाईट. प्रत्येक बॉलरला चार ओव्हर्स मिळतात. बॅट्समन पिचवर आला की त्याने बॉलच्या ठिकऱ्या करायला घेणं, हे प्रमुख काम. कमीत कमी बॉलमध्ये बॉलरला जेवढं तुडवता येईल तेवढं उत्तम. ज्याचा स्ट्राईक रेट जास्त त्याची पत जास्त. बॉलचा शेप बदलेल इतकं बदडलंत तर बेस्टच.
24 चेंडूतही किमया दाखवणारे बॉलर्स आहेत, पण एकूणात टोलेजंग फटकेबाजी मार्केट गणिताच्या दृष्टीने खपणीय.
पुजारा या सगळ्या कल्लोळापासून दूर लोटला जाणं अगदीच स्वाभाविक. क्रिकेटचा प्राण असलेली खेळपट्टी जोखण्यासाठी पुजारा तब्येतीत वेळ घेतो. अजिबात हयगय नाही.
ऑफस्टंपबाहेरचा बॉल बॅट वर करून सोडता येतो, यावर पुजाराची श्रद्धा आहे. 57 चेंडू आणि नावावर 2 धावा असं समीकरण त्याला अस्वस्थ करत नाही. या काळात पुजाराला पाहणं म्हणजे तीर्थक्षेत्री तादात्म्य पावलेल्या सच्च्या भाविकाला पाहण्यासारखं आहे.
वाईड बॉलला बॅट लावणं पुजारा पाप मानतो. तीन स्लिप आणि गलीच्या डोक्यावरून अपर कट वगैरे अंगलट येणारं धाडस तो करत नाही. ऑकवर्ड पोझिशनमध्ये येऊन पुल किंवा हूक मारत नाही. डाऊन द ट्रॅक येऊन सिक्स वगैरे ठोकत नाही.
लेगसाइडला कीपरच्या बाजूने फोर मारण्याचा मोह त्याला होत नाही. स्टायलिश फ्लिक वगैरे स्टंटच्या फंदात तो पडत नाही. राइड हँड बॅट्समनचा लेफ्ट हँड बॅट्समन होऊन रिव्हर्स स्विच, रिव्हर्स हिट, पॅडल स्वीप, दिलस्कूप अशा प्रेक्षणीय गोष्टी त्याला भुरळ घालत नाहीत.
प्रत्येक बॉल बॅटच्या जवळ येईपर्यंत डोळ्यात तेल घालून पाहतो. बॉल यशस्वीपणे तटवून काढणं हे लुप्त होणारं कौशल्य पुजारा प्राणपणाने जपतो. प्रत्येक बॉलवर रन करायलाच हवी, असं त्याला जराही वाटत नाही. सेहवाग-वॉर्नर यांच्याप्रमाणे एका सेशनमध्ये सेंच्युरी ठोकावी, असं बंडखोरी विचार त्याच्या मनाला शिवत नाहीत. त्याची अशी एक लढाई असते.
बॉलरच्या नावावर डॉट बॉलच्या नोंदी वाढू लागतात. मोठी जहाजं खोल समुद्रात नांगर टाकून उभी असतात. पुजारा खेळायला आली की नांगर मोड ऑन होतो. दुसऱ्या एंडचा प्लेयर कितीही आक्रमकपणे खेळत असला तरी पुजारा आपल्या तत्वाशी प्रामाणिक राहतो.
बॉलवर नजर बसली, खेळपट्टीचा नूर कळला आणि बॉलर्स दमू लागले की पुजाराचं काम सुरू होतं. बॅकफूट-फ्रंटफूट यापैकी कधी कुठे जायचं हे एव्हाना पक्कं झालेलं असतं. एकेरी-दुहेरी धावांची वारंवारता वाढते. खणखणीत कव्हर ड्राइव्ह गवताला झिणझिण्या आणतो. बॅटला हलकेच वळवत चेंडू थर्डमन बाउंड्रीला धाडला जातो. पायावर मिळालेल्या चेंडूला मिडविकेट बाऊंड्री दिसते. बुंध्यात पडलेल्या बॉलवर करकरीत स्ट्रेट ड्राईव्ह अनुभवायला मिळतो. बॉलर चिडतात. चेंडू जोरात आपटून छाताडावर सोडला जातो.
पुजारा बचावाची ढाल काढतो. त्याच्या बॅट किंवा ग्लोव्ह्जला लागून बॉल कीपर किंवा स्लिपच्या दिशेने उडत नाही. तो बॉलची सगळी शक्ती परतावून लावतो. पुजारा बीट झाला, त्याला मामा बनवला असं खूपच दुर्मिळतेने घडतं. स्पिनरचं आक्रमण सुरू होतं. आजूबाजूला 4-5 फील्डर्सचं रिंगण असतं. एक कड सगळा खेळ खलास करू शकते. पण पुढे पाय टाकून सिंगल ढकलली जाते. बॅकफूटला जाऊन तटवून काढलं जातं. कॅचचा धोका टाळण्यासाठी ऑफस्टंपच्या बाहेरून सावधपणे स्वीप केलं जातं.
अनाकर्षक वाटू शकणाऱ्या या प्रत्येक इनिंगच्या प्रोसेसने पुजाराला कंटाळा येत नाही. आंघोळ झाल्यावर भाविक मंडळी ज्या श्रद्धेने पोथी वाचतात, त्याच लयीत पुजारा इनिंग उलगडतो. ड्रिंक्स ब्रेक, लंच, टी असे विश्राम येत राहतात. या मैफलीत हॅमस्ट्रिंग दुखावणं, पायात गोळे येऊन, लोळण घेणं असल्या सबबी नसतात. घामाने ओले होणाऱ्या ग्लोव्हजसाठी बदली खेळाडूला तो उठसूट पळवत नाही.
अव्वल बॉलर्ससमोर, जिवंत खेळपट्यांवर, लांब दूरवर बाउंड्री असणाऱ्या मैदानांवर, प्रतिस्पर्धी संघाला मजबूत आवाजी पाठिंबा असताना पुजारा निग्रहाने लढत राहतो. दिवसदिवस तो खेळपट्टीवर पडीक असतो, पण कधीच अगतिक वाटत नाही. कोकणातल्या नागमोडी रस्त्यांवर एसटी घाट चढत जाते तसं पुजारा शतकाकडे वाटचाल करतो.
स्लेजिंगचा म्हणजे शेरेबाजीचा पुजारावर काहीच परिणाम होत नाही. अनुल्लेखाने कसं मारतात हे कोणी पुजाराकडून शिकावं. बॉलर बॉलच्या साह्याने सगळी अस्त्रं परजतात. शाब्दिक बोलंदाजीही करतात. सरतेशेवटी पुजाराच्या नावावर शतक असतं. शतकानंतर सेलिब्रेशनही एखाद्या सत्संगाप्रमाणे असतं. हेल्मेट काढून प्रेक्षकांना अभिवादन- एवढंच. हेल्मेट डोक्यावर चढवून पुजारा पुन्हा कामाला लागतो.
सकाळी हवेत किंचित गारवा असतो, दुपारी उन्हं डोक्यावर येतात आणि दिवसअखेरीला सूर्य कललेला असतो. खेळपट्टीवर राहूनच पुजाराचे सगळे ऋतू पाहून होतात. तो विकेट फेकत नाही, बॉलरला त्याची विकेट कमवावी लागते. मात्र ते होईपर्यंत इतिहास घडलेला असतो.
ऑस्ट्रेलिया दौरा सुरू होण्यापूर्वी सगळी चर्चा विराट कोहलीभोवती केंद्रित होती. भारतीय संघ ऑस्ट्रेलियातल्या पहिल्यावहिल्या मालिका विजयाच्या उंबरठ्यावर असताना सगळ्या बातम्या आणि चर्चेचा केंद्रबिंदू चेतेश्वर पुजारा आहे. आयुष्यात झटपट काहीच नाही, शॉर्टकट कामी येत नाही, अथक परिश्रम करावे लागतात या उक्तीचा प्रत्यय घडवत पुजाराने एकहाती मालिकेचं पारडं भारताच्या बाजूने झुकवलं.
IPLमध्ये संघांनी नाकारलं म्हणून ट्वुटरवर पुजाराने नाराजी व्यक्त केली नाही. रणजी स्पर्धांमध्ये, इंग्लंडमध्ये यॉर्कशायरसाठी खेळत पुजारा धावांची भूक भागवत असतो.
या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पुजाराने 1,868 मिनिटं फलंदाजी करताना 1,258 चेंडू खेळून काढले. तीन शतकं, एका अर्धशतकासह पुजाराने चार कसोटींमध्ये मिळून 521 धावा केल्या. याच दमदार प्रदर्शनासाठी पुजाराची मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या निमित्ताने 19 भारतीय खेळाडू डाऊन अंडर आहेत. IPLचं कंत्राट नावावर नसलेला पुजारा संघातला एकमेव खेळाडू आहे. गेली अनेक वर्षं अनसोल्डची पाटी बघणारा पुजारा आता मोस्ट सेलेबल प्रॉपर्टी झाला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)