You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज जिंकून रचला इतिहास, सिडनी कसोटी अनिर्णित
पावसाच्या सातत्यपूर्ण व्यत्ययामुळे सिडनी कसोटी अनिर्णित ठरली आणि दमदार सांघिक प्रदर्शनाच्या बळावर भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. भारतीय संघाने ही मालिका 2-1 अशी जिंकली.
ऑस्ट्रेलियात मालिका विजय साकारणारा भारत हा केवळ पाचवा संघ ठरला आहे. याआधी वेस्ट इंडिज, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड या संघांनी ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली आहे. 71 वर्षांमध्ये भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर फक्त सात कसोटी सामन्यांमध्ये विजय साकारता आला आहे. मात्र मालिका विजयाने त्यांना नेहमीच दुरावलं होतं.
मात्र विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने दिमाखदार खेळ करत ऑस्ट्रेलियात मालिका विजयाचा दुष्काळ संपवला. मालिकेत खेळपट्टीवर नांगर टाकून मॅरेथॉन खेळी साकारणाऱ्या चेतेश्वर पुजाराला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
भारतीय संघाने यापूर्वी न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, इंग्लंड, श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान, झिम्बाब्वे या देशांमध्ये कसोटी मालिका जिंकली आहे.
सिडनी कसोटीत भारतीय संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टीवर भारतीय संघाने 622 धावांचा डोंगर उभारला.
चेतेश्वर पुजाराने 373 चेंडूत 193 धावांची खेळी साकारली. विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने 15 चौकार आणि एका षटकारासह 159 धावांची खेळी केली. रवींद्र जडेजाने 81 तर मयांक अगरवालने 77 धावा केल्या.
डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादवच्या पाच विकेट्सच्या बळावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 धावांत गुंडाळला. ऑस्ट्रेलियातर्फे मार्कस हॅरिसने सर्वाधिक 79 धावा केल्या.
तीनशेहून अधिक धावांची आघाडी हातात असल्याने विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. तब्बल 31 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियावर मायदेशात फॉलोऑनची नामुष्की ओढवली.
पण पावसाच्या व्यत्ययामुळे चौथ्या दिवशी फक्त 25 षटकांचा खेळ होऊ शकला.
पाचव्या दिवशीचं पहिलं सत्र पावसामुळे वाया गेलं. दुसऱ्या सत्रातही पाऊस कायम राहिल्याने उर्वरित दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)