चीन 'अमेरिकेविरुद्ध हल्ल्यांची तयारी' करतोय - पेंटागॉनचा इशारा

अमेरिकेविरोधात हल्ले करण्यासाठी चीन आपल्या लष्कराला कदाचित प्रशिक्षण देत आहे, असा इशारा पेंटागॉनने एका अहवालात दिला आहे. पेंटागॉन हे अमेरिकेचं संरक्षण मुख्यालय आहे.

अमेरिकन संसद अर्थात काँग्रेसला सादर केलेल्या या अहवालात असं म्हटलं आहे, युद्धक्षेत्रावर जास्त लढाऊ विमानं पाठवण्याची तयारी चीन करत आहे.

चीनने आपल्या संरक्षणावरील खर्च वाढवून 190 अब्ज डॉलर केल्याच्या गोष्टीकडे या अहवालात लक्ष वेधण्यात आलं आहे. हा खर्च अमेरिकेच्या संरक्षण क्षेत्रातील खर्चापेक्षा एक तृतियांश आहे.

चीनने अद्याप या अहवालावर काही भाष्य केलं नाही.

आणखी काय आहे या अहवालात?

हवाई हल्ल्यांबाबतचा हा इशारा म्हणजे चीनच्या लष्करी आणि आर्थिक महत्त्वकांक्षाचं द्योतक आहे, असं अमेरिकेला वाटतं.

"गेल्या तीन वर्षांमध्ये चीनच्या लष्करानं (People's Liberation Army किंवा PLA) समुद्री भागावर आपली बाँबहल्ल्यांची क्षमता वाढवली आहे. अमेरिका आणि अमेरिकेच्या सहकारी राष्ट्रांना सहज लक्ष्य करू शकतील, अशा भागांची पाहणी करून त्यांनी आधीच रणनीती आखली असावी," असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

अशा सरावातून ते काय साध्य करू इच्छितात, हे अनाकलनीय आहे, असं देखील या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

चीन अमेरिकेच्या गौम भागावर हल्ला करू शकतं. चीन लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी नव्यानं आखणी करत असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

पुढच्या 10 वर्षांत चीन आपल्या संरक्षणावरचा खर्च 240 अब्ज डॉलरपर्यंत नेऊ शकतो, असा अंदाजही पेंटागॉनने व्यक्त केला आहे.

चीन आपल्या भव्यदिव्य अवकाश योजना आखत आहे आणि त्यांचाच अवकाशाच्या लष्करीकरणाला जाहीररीत्या विरोध आहे, याकडे देखील अमेरिकेने लक्ष्य वेधलं आहे.

दरम्यान, जूनमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनीच अमेरिकेच्या लष्कराची सहावी शाखा - एक अवकाश सैन्य किंवा space force उभारणार असल्याचं जाहीर केलं होतं.

प्रशांत महासागरात चीनच्या वाढत्या प्रभावाकडे लक्ष्य वेधून त्यावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अजूनही या भागावर अमेरिकेचंच वर्चस्व आहे.

अजून दुसरा संवेदनशील भाग आहे तो म्हणजे दक्षिण चिनी समुद्र. चीनसह अनेक देशांनी या समुद्रावर आपला हक्क सांगितला आहे. या भागातून अमेरिकेची लढाऊ विमानं उड्डाणं करत असतात. या भागातून फिरण्याचं आपल्याला स्वातंत्र्य आहे हे दाखवण्यासाठी ते हे करतात.

चीननं या भागात अनेक बेटांवर आपले लष्करी तळ थाटले आहेत. तसेच सरावासाठी बाँब टाकणाऱ्या मशीनदेखील दाखले केल्या आहेत.

आणखी एक संवेदनशील भाग म्हणजे तैवान. चीन सैन्याचा वापर करून बळजबरीने तैवानला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू शकतो, असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

बहुतांश रिपोर्ट ही चीनच्या वाढत्या लष्करी सामर्थ्यावर भाष्य करणारी आहे, पण त्याबरोबरच एका गोष्टीकडे या रिपोर्टमध्ये लक्ष वेधण्यात आलं आहे. ते म्हणजे चीनकडून निमलष्करी सैन्याची भरती केली जात आहे. हे सैन्य राखीव स्वरूपाचं असतं आणि या सैन्यात भरती स्थानिक स्तरावर केली जाते.

दक्षिण चिनी समुद्रात वाढणाऱ्या कारवाया याच तुकडीकडून करून घेतल्या जातात, असं निरीक्षण या रिपोर्टमध्ये आहे, असं बीबीसीचे संरक्षण प्रतिनिधी जोनाथन मार्कस यांनी केलं आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)