You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'बाळंतपणात वाढलेलं वजन लगेच कमी करणं हा माझा मूर्खपणा होता'
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी प्रतिनिधी
"माझ्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर मी अक्षरशः नरकयातना भोगल्यात," हे वाक्य आहे प्रसिद्ध पॉपगायिका बियॉन्सेचं.
व्होग मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत तिनं तिच्या बाळंतपणाचे, त्यानंतर वाढलेल्या वजनाचे आणि ते वजन लगेचच कमी करण्यासाठी तिनं केलेल्या चुकीच्या गोष्टींचे अनुभव शेअर केले आहेत.
"पहिल्या बाळंतपणानंतर मी ते सगळं ऐकत गेले जे लोकांनी, समाजानं मला सांगितलं. मी कसं दिसावं, माझं शरीर कसं असावं आणि मी तसंच केलं!"
"बाळंतपणानंतर तीन महिन्यांतच वजन कमी करून पूर्वीच्या फिगरला यायचा मी निर्धार केला होता. त्याकरता स्वतःला खूप त्रास दिला मी. तसं व्हावं म्हणून मी माझ्या गाण्याचे कार्यक्रमही आयोजित केले."
"आता मागे वळून बघताना तो सगळा मूर्खपणा वाटतो," ती सांगते.
दुसऱ्या बाळंतपणाच्या वेळेस मात्र तिनं हा मूर्खपणा केला नाही.
"मी माझ्या वाढलेल्या वजनात खूश होते. मी स्वतःला आहे तसं स्वीकारलं होतं. अजूनही माझे दंड, खांदे, मांड्या जाड आहेत पण ठीक आहे ना!"
"माझं ओटीपोट अजूनही सुटलेलं आहे आणि ते सुटलेलं पोट कमी करायची मला काही घाई नाही. ते माझ्या खऱ्या आयुष्याचा एक भाग आहे."
बियॉन्से हे म्हणाली आणि त्यानिमित्ताने बाळंतपणानंतर वाढलेलं वजन कमी करण्यासाठी होणारी धडपड, वजन कमी होत नसेल तर त्या स्त्रीला सहन करावं लागणारं सामाजिक दडपण आणि टोमणे यांचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.
आजही बाळंतपणानंतर स्त्रीच्या वाढलेल्या वजनावर विनोद केले जातात. ऐश्वर्या रायचं बाळंतपणानंतर वाढलेलं वजन तर जणू काही अख्ख्या भारताची समस्या बनली होती.
'आधी शेवग्याची शेंग होती आता भोपळा झाली,' टाईपचे मेसेज व्हॉटसअॅपवर फॉरवर्ड केले जातात. यासगळ्याचा त्या स्त्रीच्या मानसिकतेवर काय परिणाम होत असेल?
कल्याणला राहणाऱ्या गृहिणी भारती पितळे सांगतात, "वाईट वाटतं. माझं सीझर झालं, त्यामुळे माझं वजन खूपच वाढलं होतं. काहीजण चिडवायचे. अगं, किती वजन वाढलंय. तेव्हा थोडं मन खट्टू व्हायचं पण खरं सांगू का, मी वजन कमी करण्यासाठी काही वेगळं केलं नाही."
भारतींचं वजन नंतर काही इतर आरोग्य समस्यांनी वाढलं. उपचार झाले तेव्हा कमी झालं. पण ते होईपर्यंत त्यांना अधूनमधून टोमणे जरूर ऐकावे लागले.
"माझी आई म्हणायची की जसं जसं बाळं मोठं होतं, तसं तसं त्याच्या मागे फिरून वाढलेले वजन आपोआप कमी होतं. बाळंतपणात दूध, तूप, शिरा, सुकामेवा अशा खाण्याचा मारा होत असल्याने वजन वाढतं हे भारतींना मान्य आहे. पण ते खाणं बाळ-बाळंतिणीसाठी गरजेचं आहे," असं त्या म्हणतात.
"बाळाचं अंगावरचं दूध बंद झालं की असं खाणं आपण बंद करतो. वजन कमी व्हायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे धीर धरायचा."
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. संजय चव्हाण ठामपणे सांगतात की, "गरोदरपणानंतर वाढलेलं वजन कमी व्हायला निदान 8-9 महिने लागतात. तेही व्यवस्थित डाएट आणि हलका व्यायाम केला तर. त्यामुळे तेवढा वेळ तर दिलाच पाहिजे."
"गरोदरपणाच्या पूर्ण कालावधीत बाळंतिणीचं वजन कमीत कमी 8 ते 10 किलो वाढतंच. हे खूप नॉर्मल आहे. बाळ झाल्यानंतरही ते वजन फार फारतर 3-3.5 किलो कमी होतं. उरलेलं वजन कमी व्हायला वेळ लागतो, त्यासाठी अजिबात घाई करता कामा नये," असं ते सांगतात.
"मुळात नॉर्मल डिलिव्हरीनंतर बाईचं शरीर पूर्ववत व्हायलाच 2 महिने लागतात. सिझर असेल तर आणखी जास्त दिवस. पूर्ववत म्हणजे गर्भाशयाचा आकार नेहमीसारखा होणं, शरीराची झीज भरून निघणं. त्यानंतर ती महिला व्यवस्थित व्यायाम करू शकते."
वजन वाढायचं आणखी एक कारण म्हणजे आपल्या जुन्या पद्धती. आपल्याकडे बाई बाळंत झाली की तिला भरपूर तूप खायला घालणं, डिंकाचे लाडू खायला घालणं, तिच्या हालचालींवर बंधन आणणं अशा गोष्टी केल्या जातात.
आरोग्यासाठी तूप खायला हवं हे मान्य, पण ते प्रमाणात असलं पाहिजे. पूर्वीसारखी परिस्थिती आता नाही त्यामुळे पूर्वीच्या खाण्यापिण्याच्या समजुतीही बदलायला हव्यात. आईला दूध चांगलं येण्यासाठी या गोष्टी खायला घालायची पद्धत होती, पण आता डॉक्टर आईला दूध व्यवस्थित यावं यासाठी सप्लिमेंट देतात.
"त्यामुळे रोजचा वरण, भात, भाजी, पोळी, कोशिंबीर असा चौरस आहार बाळंतिणीसाठी पुरेसा असतो. शरीरात बिनकामाच्या कॅलरीज साठत नाहीत," असं डॉ. चव्हाण सांगतात.
सामाजिक दडपण
डॉ. चव्हाण हे नमूद करतात की बाळंतपणानंतर सगळ्याच नाही, पण काही बायकांना वाढलेल्या वजनापायी टोमणे सहन करावे लागतात. त्यामुळेच बहुदा बायका बाळंतपण झालं की लगेच वजन कमी करायची धडपड करायला लागतात.
"एखादी सून दिसायला चांगली असेल, नीटनेटकी राहात असेल आणि बाळंतपणानंतर तिचं वजन वाढलं की सासरचे लगेच डॉक्टरला विचारतात, हिचं वजन कसं कमी होईल? बरं, महिला त्यांच्या दिसण्याबद्दल संवेदनशील असतात त्यामुळे कोणाकडून असं काही ऐकलं की जास्त दुःखी होतात. अशात काही आततायीपणा केला तर त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. आईलाही आणि कधी कधी बाळालाही," डॉ. चव्हाण यांनी स्पष्ट केलं.
दुष्परिणाम
लगेच वजन कमी व्हावं म्हणून काही बायका कडक डाएटिंग किंवा अतिव्यायाम करतात. त्याबद्दल बोलताना डॉ संजय म्हणतात, "बाळ अंगावर पित असेल तर आईनं चौरस आहार घेतला पाहिजे. अतिचरबीयुक्त किंवा जंकफूड नको, पण अगदी स्वतःची उपासमारही नको. कारण त्याचे शरीरावर वाईट परिणाम होतात.
एकतर बाळंतपणानंतर आईच्या शरीरातलं कॅल्शिअम कमी झालेलं असतं. त्यात डाएट किंवा अतिश्रम केले तर अशक्तपणा जाणवणं, अॅनिमिया होणं, कुपोषण असे त्रास होऊ शकतात. याचा नंतरच्या आयुष्यावरही परिणाम होतो. काही बायकांना वर्षानुवर्ष पाळी न येणं, ओव्हल्युशन न होणं, पुढच्या गरोदरपणाच्या वेळेस त्रास होणं असेही प्रश्न उद्भवू शकतात. कधी कधी वंध्यत्वाचा सामनाही करावा लागतो."
काय करायला हवं? काय नको?
डॉ. चव्हाण याच्याविषयी सविस्तर प्रतिक्रिया देताना खालील मुद्दे सांगतात.
नॉर्मल डिलिव्हरी असेल तर बाळंतपणानंतर दोन महिन्यांनी हलका व्यायाम सुरू करायला हवा. शिवाय,
- कमी कॅलरीचं घरचं जेवणं घ्यावं.
- शरीराला त्रास होईल असं डाएटिंग किंवा व्यायाम नको.
- काहीही झालं तरी वजन कमी करण्याच्या गोळ्या घ्यायला नको. त्याचा बाळाच्या वाढीवरही परिणाम होतो.
- बाळंतपणानंतर वजन वाढणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. प्रयत्न केल्यावर ते हळूहळू कमी होतं. त्यासाठी खूप दडपण घ्यायची गरज नाही.
- जेवणात सुकामेवा घ्यायचा असेल तर बदाम आणि अंजीर खावेत. काजू शक्यतो टाळावेत.
- गरोदरपणा ही नैसर्गिक गोष्ट आहे. तो आजार नाही, त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल तर अजिबात हालचाल न करणंही योग्य नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)