You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अखेर 17 दिवसांनी किलर व्हेलने आपल्या मृत पिल्लाला दूर केलं
तिचं बाळ खूप आधीच गेलं होतं, पण तिचं मन त्याला आपल्यापासून दूर करण्यास तयार नव्हतं. तिने त्या बाळाबरोबर तब्बल 1,600 किलोमीटर प्रवास केला आणि अखेर 17 दिवसांनंतर त्याला जाऊ दिलं.
ती होती एक किलर व्हेल आणि तिचं बाळ म्हणजे तिचं पिलू - एक छोटी व्हेल जिचा कदाचित जन्म होताच मृत्यू झाला असावा.
या व्हेलवर लक्ष ठेवून असलेल्या सेंटर फॉर व्हेल रिसर्चच्या वैज्ञानिकांनी सांगितलं की, या व्हेलने हॅरो सामुद्रधुनीमधल्या आपल्या सोबतींबरोबर सॅल्मन माशांच्या एका मोठ्या गटाचा पाठलाग केला. ही सामुद्रधनी कॅनडाच्या व्हॅनकुव्हर बेटाजवळ आहे.
"या व्हेलने आपला दुःखाचा प्रवास पूर्ण केला आहे आणि आता तिचं वागणं खूप वेगळं आहे," असं या वैज्ञानिकांनी सांगितलं.
किलर व्हेल आपल्या मृत पिल्लांना जवळपास एक आठवडा तरी सोबत ठेवण्यासाठी ओळखल्या जातात. पण तब्बल 17 दिवस आपल्या मृत पिल्लाला उराशी बाळगून ठेऊन या व्हेलने कदाचित एक रेकॉर्ड प्रस्थापित केला असावा, असं जाणकार सांगतात.
J-35 या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या किलर व्हेलने तिच्या या कृतीनं संपूर्ण जगाचं लक्ष आकर्षून घेतलं आहे. व्हॅनकुव्हर बेटाजवळ 24 जुलैला या किलर व्हेलला प्रथम तिच्या मृत पिल्लासह पाहण्यात आलं होतं. याच दिवशी त्या पिल्लाचा मृत्यू झाला असावा, अशी शंका व्यक्त होत आहे. मृत्यूचं कारण मात्र कळू शकलेलं नाही.
"या किलर व्हेलचे नुकतेच काही फोटो घेण्यात आले असून सध्या तिची परिस्थिती उत्तम असल्याचं दिसून येत आहे. तिच्या पिल्लाचं मृत शरीर अमेरिका आणि कॅनडा दरम्यानच्या सॅलिश समुद्राच्या तळाशी गेलं असल्यानं त्याचं आता शवविच्छेदन करणं अवघड आहे," अशी माहिती सेटंर फॉर व्हेल रिसर्चने एका निवेदनात दिली.
कॅनडा आणि अमेरिका या दोन्ही देशांनी सदर्न रसिडेंट किलर व्हेलला संरक्षित प्रजाती म्हणून घोषित केलं आहे. चिनूक सॅल्मन मासे हे या व्हलेचं प्रमुख खाद्य असून या सॅल्मन माशांची घटलेल्या संख्येचा फटका किलर व्हेलच्या संख्येलाही बसला आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)