'...आणि मुंबईच्या किनाऱ्यांवर नावालाही मासे उरणार नाहीत'

    • Author, संकेत सबनीस
    • Role, बीबीसी मराठी, प्रतिनिधी

मुंबईकरांना गणपती विसर्जनाच्या दिवशी पाण्यात जेली फिश आणि स्टींग रे या माशांनी चावा घेतला. पण, ही घटना एका अभ्यासकाला मुंबईच्या मत्स्यसंपदेकडे घेऊन गेली. आज या घटनेमुळेच 'मरीन लाईफ ऑफ मुंबई' या मोहिमेला सुरुवात झाली आहे.

10 सप्टेंबर 2013 चा तो दिवस होता. मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर दीड दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात झाली होती. कुटुंबासह लोकांनी मोठी गर्दी केली होती.

मी तेव्हा मुंबई महापालिकेच्या सुरक्षा पथकाचा आणि लाईफ गार्ड टीमचा समन्वयक म्हणून हा सगळा सोहळा पाहत होतो. विसर्जनासाठी एक-एक गणपती समुद्राच्या पाण्यात जाऊ लागले.

प्रत्येक जण आपल्या घरच्या गणपतीसह गुडघाभर पाण्यात जात होता. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याचा गजर सुरूच होता. ढोल-ताशे दणाणून वाजत होते. तेवढ्यात एकच गोंधळ उडाला. लोकांनी एकच आरडा-ओरडा सुरू केला. या गोंधळाने ढोल-ताशांचा आवाजही थांबला. पाण्यातून बाहेर येत लोक सैरा-वैरा धावू लागले.

वयाची पन्नाशी गाठलेले सागरी अभ्यासक प्रदीप पाताडे यांना त्यावेळी आलेला अनुभव अगदी डोळ्यासमोर चित्र उभं राहील असा विषद करून सांगत होते.

ते पुढे सांगतात, "समुद्रातून बाहेर पडलेले काही जण तर किनाऱ्यावर येऊन वाळूत अक्षरशः गडाबडा लोळत होते. आमच्या बचाव पथकाचे लोक पटकन या लोकांच्या दिशेनं धावत गेले.

सगळे जण पायाला काहीतरी चावल्याची तक्रार करत होते. लाईफ गार्ड टीम आणि महापालिकेचे कर्मचारी हे ऐकून बुचकळ्यात पडले. मी मात्र, घडला प्रकार समजून चुकलो होतो.

विसर्जनाला समुद्रात गेलेल्यांवर स्टींग रे आणि जेली फिश या माशांचा हल्ला झाला होता. या मौसमात हे मासे किनाऱ्यांकडे आपला मोर्चा वळवतात.

दोन दिवस आधीच इथल्या कोळ्यांच्या जाळ्यात स्टींग रे आणि जेली फिश मोठ्या प्रमाणात आल्याचं मी पाहिलं होतं. त्यामुळे हे तेच मासे होते हे मला कळलं. या माशांमुळे शरीराला डंख झाल्यास, तीव्र वेदना होतात. पण, त्यांचं विष शरीरात पसरतं की नाही हे कोणालाच माहीत नव्हतं.

पाण्यातून बाहेर आलेल्या 70-80 जणांना आम्ही हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. डॉक्टरांनाही कळत नव्हतं नेमकं काय झालं. या प्रत्येकाचं निरीक्षण करण्यासाठी हॉस्पिटलनं त्यांना एक दिवस ठेऊन घेतलं. तेव्हा हे प्रकरण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलं होतं. चौकशीचे आदेशही देण्यात आले.

मात्र, मूळ कारणाकडे कोणाचंच लक्ष गेलं नाही. ते म्हणजे अरबी समुद्रातले विलक्षण मासे!"

प्रदीप पाताडे यांच्या मनात या घटनेमुळे खूप मोठं कुतूहल निर्माण झालं होतं.

नोकरीसोडून निसर्गाकडे धाव...

पाताडेंनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्वतःला निसर्गाच्या अभ्यासात झोकून दिलं. मुंबईतल्या धारावीमध्ये राहत असल्यानं ते समोरच असलेल्या महाराष्ट्र नेचर पार्कमध्ये फुलपाखरं-पक्ष्यांचा अभ्यास करण्यासाठी नेहमीच जायचे. पण, पक्षी आणि फुलपाखरांबद्दल अनेकांना माहिती असते.

अरबी समुद्रातल्या माशांबद्दल सामन्यांमध्ये अजूनही कुतूहल आणि गूढ कायम असल्याचं त्यांना या प्रसंगानंतर दिसून आलं. या घटनेनंतर पाताडेंनी मुंबईच्या सागरी वैविध्याचा अभ्यास करण्याचा निश्चय केला.

मुंबईकरांना मासे चावले. पण मी मात्र माशांच्या अधिक जवळ गेलो, असं पाताडे सांगतात.

गिरगावात लहानपण गेल्यामुळे पाताडेंना अरबी समुद्र आणि त्यातले सागरी जीव यांच्याबद्दल आपुलकी आणि कुतूहल पहिल्यापासूनच होतं. 1992 ला ते गिरगाव चौपाटीवरच्या मफतलाल स्विमिंग पूलचे सदस्य झाले आणि त्यानंतर विंड सर्फिंग, बोट कयाकिंग हे क्रीडा प्रकारही त्यांनी आत्मसात केले.

मुंबईतल्या लाटांवर स्वार होऊन विंड सर्फिंग करताना अनेक मासे, अनोखे सागरी जीव त्यांच्या आजूबाजूनं गेल्याचं त्यांनी पाहिलं होतं. गिरगावातली राहती इमारत पडल्यानंतर ते धारावीमधल्या म्हाडाच्या ट्रांझिट कँममध्ये रहायला आले. याकाळात आयुष्यातल्या चढ-उतारांकडे दुर्लक्ष करत त्यांनी सागरी अभ्यासावर लक्ष केंद्रीत केलं.

विलक्षण किनारे

मुंबईचे किनारे खूप विलक्षण असून त्यांची भौगोलिक रचना सागरी जीवसृष्टीला पोषक असल्याचं पाताडे सांगतात.

ते पुढे सांगतात की, "मुंबईच्या किनाऱ्यांजवळील खडकाळ भागामुळे प्रवाळांच्या वाढीस तो उपयुक्त ठरतो. मुंबई लगतच्या किनाऱ्यांवर म्हणूनच प्रवाळ, गॉर्गेनिअन फॅन यांचं अस्तित्व दिसून येतं. मात्र, यांचा अभ्यास म्हणावा तसा झालेला नाही. तसंच, इथल्या किनाऱ्यांवरील प्रदूषणामुळे आणि मुंबईच्या शहरीपणामुळे इथे सागरी जीव वास्तव्य करतात याचं भानच कोणाला राहिलेलं नाही."

ते पुढे सांगतात की, "आज हाजी अली, कफ परेड, गिरगाव, जुहू इथल्या किनाऱ्यांवर खेकड्यांच्या आणि समुद्री गोगलगायींच्या दुर्मिळ जाती आम्हाला आढळल्या आहेत. याचबरोबर श्रीम्प्स, जिवंत शंख-शिंपले, प्रवाळ, कोळंबी इतकंच काय ऑक्टोपस, सीहॉर्स, सीपाईप आणि डॉल्फिनसुद्धा मुंबईच्या किनाऱ्यालगत दिसून आले आहेत."

सागरी वैविध्याची नोंद नाही

मुंबईत आढळणाऱ्या या सागरी वैविध्याची विशेष नोंद नसल्याबद्दल पाताडे खंत व्यक्त करतात. 1947-48 च्या काळात ब्रिटीशांनी इथले किनारे आणि सागरी वैविध्याबद्दल काही नोंदी केल्या होत्या. त्यानंतर, 1970 च्या आसपास काही वैज्ञानिकांनी आपल्या संशोधनासाठी मुंबईच्या सागरी जिवनाबाबत नोंद केली होती. मात्र, याव्यतिरिक्त कोणताही अभ्यास झाला नसल्याचं पाताडे बीबीसीसोबत बोलताना सांगत होते.

मुंबईच्या सागरी वैविध्याचा अभ्यास आजवर का झाला नाही याबाबत 'सेन्ट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट'मध्ये (CMFRI) वैज्ञानिक म्हणून काम केलेल्या विनय देशमुख यांनीही बीबीसीकडे आपलं मत व्यक्त केलं.

देशमुख म्हणतात, "मुंबईच्या सागरी संपदेबाबत 1920, 1947-49 आणि 1970-73 या काळात विविध संशोधकांनी प्रबंध, शोधनिबंध सादर केले आहेत. मी स्वतः 1973 मध्ये असा प्रबंध सादर केला होता. या काळात कॅमेरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाची वानवा असल्यानं अनेक गोष्टींची नोंद होऊ शकली नाही. विशेषतः आम्ही तेव्हा पाहिलेल्या सागरी संपदेचे फोटोही आज उपलब्ध नाहीत."

'मरीन वॉक'

दोन वर्षें सतत मुंबईचे सागरी किनारे पालथे घातल्यावर पाताडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या प्रयत्नांना एक नाव दिलं. त्यांनी 'मरीन लाईफ ऑफ मुंबई' नावानं फेसबुक पेज सुरू केलं.

यासाठी त्यांच्या सोबतीला 30 वर्षीय सिद्धार्थ चक्रवर्ती आणि 27 वर्षीय अभिषेक जमालाबाद हे तरुण अभ्यासक धावून आले. या पेजवर मुंबईच्या जवळपास आढळलेल्या मत्स्यसंपदेची माहिती देण्यास त्यांनी सुरुवात केली.

पाताडे सांगतात की, "8 फेब्रुवारी 2017 ला आम्ही मरीन लाईफ ऑफ मुंबईच्या कामास सुरुवात केली. कोणतीही संस्था स्थापन करण्याऐवजी आम्ही आमच्या अभियानाला फक्त नाव दिलं. या अंतर्गत उपक्रम म्हणून शहरांमध्ये होणाऱ्या हेरीटेज वॉकप्रमाणे किनाऱ्यांवर ओहोटीच्यावेळी मरीन वॉक घेण्याची संकल्पना आम्हाला सुचली.

दर महिन्याला दोन-तीन मरीन वॉक आम्ही आयोजित करतो. हे मरीन वॉक मोफत असतात. आजवर 1000 हून अधिक विद्यार्थी आणि संशोधकांनी या वॉकला हजेरी लावली आहे. लोकांनी त्यांच्या जवळच असलेल्या या समुद्राखालचं जीवन जाणून घ्यावं."

समुद्री गोगलगायी ते ऑलिव्ह रिडले कासव

प्रदीप पाताडे आणि त्यांच्या मरीन लाईफ ऑफ मुंबईमधल्या सहकाऱ्यांना मुंबईच्या किनाऱ्यांवर दुर्मिळ जातीच्या सी स्लग म्हणजेच समुद्री गोगलगायी आढळून आल्या आहेत.

समुद्री शैवाल आणि प्रवाळांवर उपजिविका करणाऱ्या या गोगलगायींच्या 11 प्रजाती खार-दांडा, जुहू, हाजी अली, कार्टर रोड इथल्या किनाऱ्यांनजीक आढळून आल्यात. यात स्मार्गडीनेला, प्लोकॅमोफोरस, डेन्ड्रोडोरिस, क्रेटेना, मॅरिओनिआ, अॅक्टोनोसायक्लस यांसारख्या अत्यंत दुर्मिळ प्रजाती मुंबईच्या किनाऱ्यावर आढळत असल्याची माहिती पाताडे यांनी दिली.

तर, मुंबईतील वर्सोव्याच्या किनाऱ्यावर नुकत्याच ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाची 100 पिल्लं आढळून आली होती. वर्सोवा किनाऱ्यावर स्वच्छता करणारे अफ्रोज शहा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या कासवांना समुद्रात जाण्यासाठी मार्ग करून दिला होता. त्यामुळे किनाऱ्यांची स्वच्छता केल्यानं मुंबईत पुन्हा सागरी संपदा आपलं पूर्वीचं रुप धारण करू शकते असं पाताडे यांनी सूचित केलं.

...तर, सागरी जीवन संपून जाईल

मुंबईतल्या किनाऱ्यांवर होणारं प्रदूषण या मत्स्यसंपदेच्या मूळावर उठल्याचं पाताडेनी स्पष्ट केलं.

ते सांगतात, "सध्या प्रदूषित आणि प्रक्रिया न केलेलं सांडपाणी समुद्रात जात आहे. त्याचबरोबर प्लास्टिक आणि कचरा हे देखील थेट समुद्राला जाऊन मिळत आहे. त्यामुळे मुंबईतली सागरी परिसंस्था प्रदूषित झाली आहे."

यापुढे जाऊन प्लास्टिकच्या समस्येबद्दल पाताडे सांगतात की, "सध्या प्लास्टिक कचऱ्यासोबत समुद्रतळाशी जात आहे. तिथं या प्लास्टिकचे छोटे-छोटे तुकडे होऊन त्यांचा थर तयार झाला आहे. यामुळे तळाला असलेल्या सागरी जिवांचं अस्तित्व धोक्यात आला आहे."

सरकारने या मुद्द्यावर लक्ष घालण्याची मागणी करताना पाताडे म्हणाले, "सरकारनं तातडीनं समुद्रात जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया होत आहे की नाही याची तपासणी करावी. तसंच ज्या कारखान्यांमधून दुषित पाणी समुद्रात जात आहे, त्यांच्यावर कारवाई करावी. नाहीतर मुंबईच सागरी जीवन संपून जाईल."

वैज्ञानिक देशमुख यांनी देखील याप्रकरणी अधिक प्रकाश टाकत सध्याच्या प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त केली.

ते म्हणतात, "मुंबईत किनाऱ्यांवर पॉईँट डिस्चार्ज म्हणजेच ब्रिटीशांनी पूराचं पाणी समुद्रात सोडण्यासाठी बांधलेल्या वाहिन्या आहेत. या वाहिन्यांमधून पाणी थेट अरबी समुद्रात जातं. यातून बऱ्याचदा सांडपाणीही येतं. त्याचबरोबर मुंबई महापालिकेचं दररोज 400 मेगा लिटर म्हणजे काही कोटी लिटर सांडपाणी समुद्रात सोडलं जातं. या पाण्यावर तीन टप्प्यांत प्रक्रिया करणं अपेक्षित असताना त्यावर फक्त प्राथमिक प्रक्रिया म्हणजेच गाळून ते पाणी समुद्रात सोडलं जातं."

देशमुख पुढे सांगतात, "सांडपाणी समुद्रात गेल्यानं पाण्यातला ऑक्सीजन कमी होण्यास सुरुवात होते. ऑक्सीजन कमी झाल्यानं मासे आणि इतर सागरी जिवांचा मृत्यू होतो. मी 1973 मध्ये जेव्हा संशोधन केलं तेव्हा समुद्रात आढळणाऱ्या पॉलीकीट अॅनिमल्स म्हणजेच कृमी वर्गातल्या प्राण्यांच्या 20 प्रजाती मी शोधल्या होत्या. त्यातल्या आता 10 सुद्धा आढळत नाहीत. भविष्यात सांडपाणी जाण्याचं प्रमाण असंच वाढल्यास धोकादायक परिस्थिती उद्भवेल आणि मुंबईच्या किनाऱ्यांवर मासे नावालाही उरणार नाहीत."

'सांडपाणी समुद्रात जाणं अपेक्षित नाही'

दरम्यान, गिरगाव चौपाटीवर दूषित पाणी समुद्रात जात असल्याबद्दल मुंबई महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे प्रमुख अभियंता विद्याधर खंडकर यांच्याशी बीबीसीनं बातचीत केली.

याबद्दल बोलताना खंडकर म्हणतात की, "मुंबईला लागून असलेल्या सागरी किनाऱ्यावर असे 103 डिस्चार्ज पॉईंट म्हणजेच पूराचं पाणी पुन्हा समुद्राकडे नेणाऱ्या या जलवाहिन्या आहेत. या वाहिन्यांना शहरातील सांडपाण्याच्या वाहिन्या जोडणं अपेक्षित नसतं. परंतु, काही ठिकाणी सांडपाण्याच्या वाहिन्याही या जलवाहिन्यांना जोडल्या आहेत. त्यामुळे या वाहिन्यांमधून दूषित पाणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही."

गिरगावच्या समुद्र किनाऱ्यावर दिसून आलेल्या दूषित पाण्याबद्दल आणि प्लास्टिक कचऱ्याबद्दल मुंबई महापालिकेच्या 'डी' वॉर्डचे सहाय्यक आयुक्त मोटे यांच्याशी आम्ही चर्चा केली.

यावर मोटे सांगतात की, "गिरगाव चौपाटीवर 24 तास सफाईचं काम सुरू असतं. त्यामुळे तिथं असा कचरा दिसून येणार नाही. काही स्थलांतरीत नागरिकांकडून कचरा केला जात असल्याचं आमच्या पाहण्यात आलं आहे. यावर लवकरच उपाय करण्यात येईल. तसंच, दूषित पाणी जर समुद्रात जात असेल तर आम्ही त्याची तत्काळ दखल घेऊ."

हेही वाचलंत का?

हे पाहिलं आहे का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)