गझनीत वर्चस्वाची लढाई, दक्षिण अफगाणिस्तान पुन्हा तालिबान्यांच्या ताब्यात जाण्याची भीती

कंदहार आणि काबुल यांना जोडणाऱ्या महामार्गावरील महत्त्वाचं शहर असलेल्या गझनी या शहरात तालिबान आणि अफगाण लष्करात गेल्या शुक्रवारपासून संघर्ष सुरू आहे.

यामध्ये 100च्यावर लष्करी आणि पोलीस जवान ठार झाले आहेत. तर तालिबानच्या 200 सैनिकांना ठार केल्याचं सरकारनं म्हटलं आहे. या संर्घषात 30 नागरिकही ठार झालेत.

तालिबाननं शुक्रवारी सकाळी या शहरावर हल्ला केला. शुक्रवारी यात 16 लोक ठार झाले होते. जर गझनी शहर तालिबानच्या हाती पडलं तर दक्षिण अफागाणिस्तानचा काबुलशी संपर्क तुटू शकतो. त्यामुळे या शहराला भौगोलिकदृष्ट्या मोठं महत्त्व आहे.

अफगाणिस्तानचे लष्कर प्रमुख शरीफ याफ्तील यांनी हे शहर बंडखोरांच्या ताब्यात पडण्याची कोणताही शक्यता नसल्याचं म्हटलं आहे. तर अफगाणिस्तानातले अमेरिकी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल मार्टिन ओडोनेल यांनी हे शहर आणि तिथली सरकारी कार्यालयं लष्कराच्या ताब्यात असल्याचं म्हटलं आहे.

अमेरिकेनं तालिबानचा हल्ला मोडून काढण्यासाठी हवाई हल्ले केले आहेत. पण प्रत्यक्षातली स्थिती वेगळीच असल्याचं चित्र पुढं येत आहे.

गझनीमधले लोकप्रतिनिधी चमन शहा इहतेमदी यांनी रॉयटर्सला दिलेल्या माहितीत सरकारची पिछेहाट झाल्याचं म्हटलं आहे.

"राज्यपालांचं कार्यालय, पोलीस मुख्यालय, गुप्तचर यंत्रणेचं कार्यालय फक्त सरकारच्या ताब्यात आहे." एएफपीचे वार्ताहर सांगतात की, तालिबानचे सैनिक लपून नाहीत, ते शहरभर फिरत आहेत.

अनेक पोलीस चेक पॉईंट तालिबानच्या ताब्यात असून सरकारी कार्यालयांना आग लावण्याचे प्रकार सुरू आहेत. लोकांना शहरातून बाहेर जाता येणं कठीण झालं आहे.

शहरातून बाहेर पळून गेलेले एक नागरिक अब्दुल वकील यांनी रॉयर्टसला दिलेल्या माहितीत म्हटलं आहे की, "शहरात सर्वत्र जाळपोळ सुरू असून सगळीकडे मृतदेह दिसत आहेत."

अफगाण सरकार सोबत शांतीसाठी चर्चा करावी असा दबाव तालिबानवर येत असतानाच हा हल्ला झाला आहे. जून महिन्यात कतारमध्ये तालिबान आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांत गुप्त बैठक झाली होती.

त्यामध्ये ईददरम्यान 3 दिवस शस्त्रसंधी करण्यावर एकमत होऊन दोन्ही बाजूंनी ही शस्त्रसंधी पाळली होती.

दरम्यान गझनी शहरातला अन्न आणि पाणीसाठा संपत असल्याचं युनायटेड नेशन्सनं म्हटलं आहे. युनायटेड नेशन्सच्या अफगाणिस्तानमधल्या शाखेनं जवळपास 2 लाख 70 हजार लोक प्रभावित झाल्याचं म्हटलं आहे. शहरातली संवादची साधनं आणि वीज पुरवठा खंडित झाला आहे.

गझनी शहरातल्या काही कार्यकर्त्यांनी काबुलमध्ये सोमवारी निषेध मोर्चा काढला होता. इनायत नासीर म्हणाले, "गझनी शहरात मानवी संकट निर्माण झालं असून सरकारनं परिस्थिती नियंत्रणात आणली नाही तर एका आठवड्यात हे शहर तालिबानच्या ताब्यात जाईल." तालिबानच्या हल्ल्याची शक्यता पूर्वीच त्यांनी सरकारला कळवली होती, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान अफगाण सरकारनं या शहरात 1000 सैनिकांची जादा कुमक पाठवली आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)