ISचे खतरनाक डावपेच : जिहादसाठी महिला आणि कुटुंबाचा वापर

    • Author, बीबीसी मॉनिटरिंग
    • Role, विश्लेषण

इंडोनेशियातल्या सुरबाया या शहरात लागोपाठ दोन दिवस झालेल्या बाँब हल्ल्यांनी बरेच प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्या पद्धतीनं हे हल्ले झाले त्या भोवती हे प्रश्न फिरत आहेत.

काही कुटुंबांनी घडवून आणलेल्या या हल्ल्यांना आंतरराष्ट्रीय माध्यमांनी 'Family attacks', 'Family bombings' असं नाव दिलं आहे. जिहादी हल्ल्यांची ही नवी व्यूहरचना तर नाही, असा धोक्याचा इशारा यातून मिळत आहे.

कुटुंबांनी घडवून आणलेल्या या हल्लांची जबाबदारी कथित इस्लामिक स्टेट (IS) ग्रुपनं घेतली आहे. 13 आणि 14 मे रोजी झालेल्या या हल्ल्यांत 3 चर्च आणि पोलीस मुख्यालयाला लक्ष्य करण्यात आलं.

ISनं केलेल्या दाव्यात हे हल्ले कुटुंबीयांनी घडवल्याचा कोणताही उल्लेख नाही. पण ज्या पद्धतीनं यातील एका हल्ल्याचं वर्णन करण्यात आलं आहे, ते पाहाता ISला या हल्ल्याच्या पद्धतीची त्रोटक माहिती द्यायची होती, असं दिसतं.

हल्ल्यांसाठी बाँबर म्हणून मुलांचा वापर

इंडोनेशियामध्ये झालेल्या हल्ल्यांतली सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे त्यात झालेला मुलांचा वापर. रविवारी आई आणि दोन मुलींनी एका चर्चवर हल्ला केला. यातल्या एका मुलीचं वय 9 वर्षं आणि दुसऱ्या मुलीचं वय 12 वर्षं होतं. तर वडील आणि त्यांच्या 2 मुलांनी 2 चर्चवर हल्ले केले. या हल्ल्यांतल्या एका मुलाचं वय 16 वर्षं आणि दुसऱ्या मुलीचं वय 18 वर्षं होतं.

दुसऱ्या दिवशी 5 जणांच्या कुटुंबानं दोन मोटरसायकलींवरून पोलीस मुख्यालयावर हल्ला केला. या कुटुंबाची 8 वर्षांची मुलगी बचावली आहे.

ISनं या हल्ल्यांत मुलांचा किंवा महिलांचा सहभाग असल्याचं म्हटलेलं नाही. पण जिहादी हिंसाचारात मुलांचा आणि महिलांचा वापर ISसाठी नवा नाही.

ISनं डिसेंबर 2016मध्ये गेमसारखा एक व्हीडिओ प्रसिद्ध केला होता. यात मुलं 'शत्रूं'चा माग घेतात आणि शेवटी त्यांना गोळ्या घालतात किंवा त्यांचा शिरच्छेद करतात, असं दाखवण्यात आलं आहे.

2017मध्ये ISनं धर्मांतर केल्याचा दावा केलेली 2 मुलं मोसूलमध्ये आत्मघातकी हल्ला करताना दाखवण्यात आलं आहे. तर काही याझदी मुलांनी ISसाठी हल्ले केल्याचा दावा करण्यात आला होता.

मे 2017मध्ये जेव्हा ISचा इराकमध्ये त्यांचा गड असलेलं मोसूल आणि सीरियातल्या राक्कावरची पकड ढिली होत होती तेव्हा मोठ्या प्रमाणावर भरती सुरू केल्याचं ISने म्हटलं होतं. या दाव्याशी संबंधित व्हीडिओमध्ये 10 ते 13 वयाच्या दिसणाऱ्या मुलांची ISचे सैन्य म्हणून भरती होत असल्याचं दाखवण्यात आलं होतं.

महिलांचा सहभाग

IS बंडखोरीचे संदेश मुलांमध्ये पसरवत असल्याचं दाखवल जात असलं तरी असं मुलींच्या बाबतीत क्वचितच दाखवण्यात आलं. वस्तुस्थिती अशी आहे की ऑक्टोबर 2017पर्यंत महिलांना हिंसक जिहादमध्ये सहभागी करून घेण्याला ISचा विरोध होता.

पण सीरिया आणि इराकमध्ये भूभाग गमवावे लागल्यानं युद्धाच्या बदलत्या स्थितीत ISनं सशस्त्र जिहाद महिलांसाठी आवश्यक आहे, अशी भूमिका घेतली.

ISनं फेब्रुवारी महिन्यात प्रसिद्ध केलेल्या व्हीडिओत महिला पुरुषांशी लढत असल्याचं दाखवण्यात आलं होतं. पण हा बदल फक्त मुलींपेक्षा प्रौढ महिलांशी संबंधित होता.

ISनं मुलींनी सशस्त्र जिहादमध्ये सहभागी व्हावं, यासाठी आवाहन केल्याचं दिसून आलेलं नाही.

यामुळे चर्चवर आई आणि मुलींनी जो हल्ला केला त्याचा उल्लेख शहीद होण्यासाठीचा हल्ला असा नसल्याचं दिसून येतं. पण वडील आणि 2 मुलींनी जे दोन हल्ले घडवले त्याचा उल्लेख मात्र शहीद होण्यासाठीचा हल्ला असा करण्यात येत आहे.

कारण काय आहे?

ज्या कुटुंबांनी हे हल्ले घडवले त्यांनी हा पॅटर्न का स्वीकारला हे स्पष्ट झालेलं नाही.

काही स्थानिक विश्लेषकांचं मत आहे की, अशा प्रकारची व्यूहरचना जाणीवपूर्वक केली असावी. कुटुंबांसह असलेल्या प्रौढांवर सहसा कोणी संशय घेत नाही. पण एकटा पुरुष किंवा स्त्री 'ऑपरेटिव्ह' असतील तर त्यांच्यावर संशय घेतला जाऊ शकतो. याचाच अर्थ असा की मुलांना 'शस्त्रसामुग्री'सह आणण्यात आलं होतं.

जिहादींनी नेहमीच तुरुंगात असलेल्या मुस्लिमांबद्दल त्यातही महिलांबद्दल काळजी व्यक्त केली आहे आणि याचा वापर जिहादसाठी आवाहन करताना केला आहे.

ISनं या व्यूहरचनेचं अजून समर्थन केलेलं नाही. क्रूरपणासाठी आणि हिंसक विचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या ISसाठी याचं समर्थन करणं कठीण आहे.

ISच्या आधीची अल कायदा या संघटनेनं 2005मध्ये जॉर्डनमधल्या एका हॉटेलमध्ये हल्ला घडवण्यासाठी एक महिला आणि तिच्या पतीची निवड केली होती. पण तिच्याकडच्या स्फोटकांचा स्फोट झाला नाही. या महिलेचं नाव साजिदा अल रिशवाई असं आहे. तिचं तुरुंगात असणं हे जिहादी गटांसाठी कलंकासारखं ठरलेलं आहे.

(बीबीसी मॉनिटरिंग जगभरातल्या टीव्ही, रेडिओ, प्रिंट आणि वेब माध्यमांतून प्रकाशित होणाऱ्या बातम्या आणि विश्लेषण देण्याचं काम करतं. बीबीसी मॉनिटरिंगच्या बातम्या तुम्ही ट्विटर आणि फेसबुकवरदेखील वाचू शकता.)

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)