You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
निवडणुकीआधी ट्रंप ज्युनियर 'रशियन वकिलांना भेटले होते'
निवडणुकांची माहिती घेण्यासाठी जून 2016मध्ये माझा मुलगा रशियाच्या वकिलांना भेटला असल्याची कबुली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिली आहे.
जून 2016 मध्ये डोनाल्ड ट्रंप यांच्या मुलाने रशियन वकील नतालिआ वेसेल्नीटस्काया यांची भेट घेतली होती. या भेटीचे पडसाद सातत्याने उमटत असतात. या भेटीबाबतची ट्रंप यांची कबुली याप्रकरणासंदर्भातलं सगळ्यात स्पष्ट निवेदन आहे.
विशेष सरकारी वकील रॉबर्ट म्युलर अमेरिकेच्या गुप्तहेर संस्थांनी दिलेल्या अहवालावरून अधिक तपास करत आहेत. या अहवालात म्हटलं आहे की, निवडणुकांचे निकाल ट्रंप यांच्या बाजूने झुकवण्यात रशियनांचा हात होता.
मात्र डोनाल्ड ट्रंप यांनी कोणत्याही स्वरूपाच्या संगनमताचा इन्कार केला आहे.
यासंदर्भात सुरू असलेली चौकशी म्हणजे देशातलं सगळ्यात मोठं राजकीय षड्यंत्र असल्याचं ट्रंप यांनी म्हटलं आहे. दरम्यान 2016 मध्ये झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत कोणत्याही स्वरूपाचा हस्तक्षेप किंवा संगनमताचा रशियाने इन्कार केला आहे.
या निवडणुकीत हिलरी क्लिंटन यांना नमवत ट्रंप यांनी बाजी मारली.
ट्रंप काय म्हणाले?
वॉशिंग्टन पोस्ट, सीएनएन आणि एपी या अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी ट्रंप यांच्यासंदर्भात बातमी दिली होती. रशियन वकील वेसेलनीटस्काया यांची भेट झाल्याच्या मुद्यावरून मुलगा अडचणीत येऊ शकतो यामुळे डोनाल्ड ट्रंप चिंतेत होते.
यावर ट्रंप म्हणाले, "माझ्या मुलाने कोणाची भेट घेतली यासंदर्भातलं वृत्तांकन फेक न्यूज आहे. तथ्यांची मोडतोड करून ही बातमी देण्यात आली आहे."
ते पुढे म्हणाले, "प्रतिस्पर्ध्यांची माहिती मिळवण्यासंदर्भात मुलाने भेट घेतली होती. नियमांच्या चौकटीत बसणारी अशी ही भेट होती. अशा भेटी राजकारणात नियमितपणे होतात. यापेक्षा यात काहीही नाही. मला याची माहिती नव्हती."
हे ट्वीट का महत्त्वाचं?
ट्रंप यांचं आताचं ट्वीट त्यांच्या आधीच्या निवेदनांच्या विरोधात जाणारं आहे.
न्यूयॉर्क टाइम्सने याबाबत पहिल्यांदा बातमी दिली होती. त्यावेळी डोनाल्ड ट्रंप ज्युनियर यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. अमेरिकेच्या नागरिकांनी रशियन मुलांना दत्तक घेण्याबाबत बारगळलेल्या योजनेसंदर्भात ही भेट असल्याचं ट्रंप ज्युनियर यांनी म्हटलं होतं.
या बैठकीत राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीतील उमेदवार हिलरी क्लिंटन यांना हानी पोहोचवणारी माहिती देण्यात येईल हे समजल्यानंतर ट्रंप ज्युनियर यांनी बैठकीसाठी होकार दिल्याचं सांगितलं. या बैठकीबाबत झालेला इमेल तपशीलही डोनाल्ड ट्रंप ज्युनियर यांनी जाहीर केला होता.
डोनाल्ड ट्रंप ज्युनियर यांनी दिलेल्या वक्तव्याबाबत डोनाल्ड ट्रंप यांना कल्पना होती, असं वृत्त अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी दिलं होतं. सुरुवातीला ट्रंप यांच्या टीमने अशा बातम्यांचा इन्कार केला होता. परंतु प्रत्यक्षात डोनाल्ड ट्रंप यांनीच या वक्तव्याचा मसुदा तयार केल्याचं वकिलांनी सांगितलं.
हिलरी क्लिंटन यांच्याबाबतची माहिती मिळवण्यासाठी ट्रंप ज्युनियर आणि रशियन वकील यांची बैठक झाल्याचं डोनाल्ड ट्रंप यांनी आता सांगितलं आहे. यावरूनच त्यांचं आधीचं वक्तव्य दिशाभूल करणारं होतं हे उघड झालं आहे असं अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी म्हटलं आहे.
ज्युनियर ट्रंप यांची बैठक वादग्रस्त का?
निवडणूक प्रचार मोहिमेदरम्यान प्रतिस्पर्धी उमेदवारांबद्दल तपशीलवार माहिती शोधून काढणं सर्रास होतं. मात्र दुसऱ्या देशाच्या सरकारकडून किंवा दुसऱ्या देशाचा नागरिक असलेल्या व्यक्तीकडून मदत घेणे अमेरिकेच्या कायद्यानुसार मान्य नाही. या कायद्याचं उल्लंघनाप्रकरणी ट्रंप ज्युनियर अडचणीत येऊ शकतात.
हिलरी यांच्याबाबतची माहिती मिळवण्यासाठी ट्रंप ज्युनियर यांचा उत्साह त्यांना अडचणीत टाकू शकतो.
बैठकीत ट्रंप ज्युनियर यांना हिलरी क्लिंटन यांच्याबद्दल कुठलीही विशेष माहिती मिळालेली नसल्याचा दावा ट्रंप यांच्या वकिलांनी केला.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)