You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिकेच्या FBIच्या विरोधात राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांची रशियाला साथ
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी 2016 मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियाने हस्तक्षेप केल्याच्या FBIच्या दाव्याविरोधात पुतिन यांची बाजू उचलून धरली.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबरोबर फिनलंडला सुरू असलेल्या शिखर परिषदेच्या दरम्यान अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या (FBI) विरोधात हे विधान केलं आहे. अमेरिकेतील निवडणुकीत रशियाला हस्तक्षेप करण्याचं काही कारण नव्हतं असं ते म्हणाले.
अमेरिकेच्या प्रकरणांत हस्तक्षेप केला नसल्याचा पुतिन यांनीही पुनरुच्चार केला आहे.
दोन्ही नेत्यांनी फिनलँडची राजधानी हेलसिंकीमध्ये बंद दरवाज्याआड दोन तास चर्चा केली.
कुठलाही विशेष अजेंडा या भेटीसाठी ठरला नव्हता, असं अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन म्हणाले.
अमेरिका आणि रशिया यांच्यात अनेक मुद्द्यांवर अनेक वर्षांपासून मतभेद आहेत. 2016मध्ये झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकांमध्ये रशियानं हस्तक्षेप केल्याच्या आरोपांनंतर या दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये कटुता अधिकच वाढली.
पण बैठकीनंतर ट्रंप यांनी ट्वीट करत "दोन्ही देशांतल्या संबंध बिघडवण्यासाठी अनेक वर्षांपासून सुरू असलेला मूर्खपणा जबाबदार" असल्याचं म्हटलं आहे.
त्यावर रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयानेही "एकदम बरोबर" म्हटलं आहे.
निवडणुकीत हस्तक्षेप करण्याबाबत त्यांना स्वतःच्या देशातल्या गुप्तचर यंत्रणेवर जास्त विश्वास आहे की रशियावर असा प्रश्न चर्चेनंतर पत्रकार परिषदेत राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांना विचारला.
त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, "राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणतात की त्यांनी असं काहीही केलेलं नाही. रशियानं हस्तक्षेप करायचं कोणतंच कारण मला दिसत नाही."
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हिलरी क्लिंटन यांच्या विरोधात रशियाने वातावरणनिर्मिती केली आणि सोशल मीडियावर खोट्या बातम्या पेरण्यापासून सायबर हल्ल्यांसाठी सरकारच्या अनुमतीने अभियान चालवलं असा निष्कर्ष FBI आणि अमेरिकेच्या गुप्तचर संघटनांनी काढला होता.
ट्रंप यांच्याविरोधात संताप
ट्रंप यांच्या रशियाची बाजू उचलून धरणाऱ्या भूमिकेवर अमेरिकेत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
अमेरिकेच्या सिनेटचे सभापती पॉल रायन म्हणाले, "रशिया आपलं मित्रराष्ट्र नाही हे ट्रंप यांनी लक्षात ठेवावं."
"रशिया आणि अमेरिका यांचे नैतिक पातळीवर कुठेही विचार जुळत नाही. हे आमच्या मूळ तत्त्वांच्या विरुद्ध आहे," असंही ते म्हणाले.
रिपब्लिक पक्षाचे नेते जॉन मॅकन म्हणाले की, "अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची ही निराशाजनक कामगिरी आहे."
रिपब्लिकन पक्षाचे नेते लिंडसे ग्रॅहम हे सिनेट आर्म्ड सर्व्हिसेस कमिटीचे सदस्य आहेत. त्यांनी एका ट्वीटमध्ये "2016च्या निवडणुकीबाबत रशियाला जाब विचारण्याची एक संधी गमावली", असं लिहिलं.
डेमॉक्रॅटिक पक्षाचे नेते चक शुमर यांनी लागोपाठ केलेल्या ट्वीट्समध्ये म्हणाले, "यामुळे आमच्या स्पर्धकांची ताकद वाढली आहे आणि त्याचवेळी आमच्या आणि मित्रपक्षांच्या संरक्षण यंत्रणा दुर्बळ करण्याचा हा प्रकार आहे."
परिषदेला होता विरोध
अमेरिकेच्या काही राजकारण्यांनी रशियाबरोबरची ही भेट आधीच रद्द करण्याची मागणी केली होती. कारण विशेष वकील रॉबर्ट मुलर यांनी रशियाच्या 12 मिलिट्री इंटेलिजन्स एजंटांना डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांचा निवडणूक प्रचार हॅक करण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.
सोमवारी पुतिन यांनी अमेरिकेच्या चौकशी अधिकाऱ्यांना रशियाला येऊन अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची परवानगी दिली.
त्याबदल्यात रशियासुद्धा अशाच प्रकारची विचारपूस करण्याची मागणी करेल असं पुतिन म्हणाले.
उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांनी मात्र अमेरिकेच्या वाणिज्य विभागात केलेल्या एका भाषणात पुतिन यांच्याशी झालेल्या चर्चेबाबत ट्रंप यांची पाठराखण करत ट्रंप यांची प्रशंसा केली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)