You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सीरियावर मिसाइल हल्ल्यासाठी तयार रहा : ट्रंप यांचा रशियाला इशारा
कथित रासायनिक हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्युत्तर म्हणून रशियाचं मित्रराष्ट्र असलेल्या सीरियावर मिसाइल सोडू असं ट्वीट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केलं आहे.
शनिवारी सीरियातील डौमू येथे रासायनिक हल्ला झाल्याचे वृत्त आहे.
'रशिया तयार रहा. मिसाइल येत आहे. छान, स्मार्ट अशी मिसाइल्स येत आहेत', अशा शब्दांत ट्रंप यांनी आपल्या भावना ट्वीटद्वारे व्यक्त केल्या आहेत.
अमेरिकेच्या मिसाइल तसंच साजेसं प्रत्युत्तर देण्यात येईल अशी धमकी रशियाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
बंडखोरांच्या ताब्यातील डूमा येथे रासायनिक हल्ला घडवून आणल्याचा आरोप बशार अल असादप्रणित सरकारवर आहे. मात्र सरकारने या आरोपांचं खंडन केलं आहे.
गॅस किलिंग अॅनिमल अर्थात गॅसचा मारा करून नागरिकांना यमसदनी धाडणारी माणसं अशा शब्दांत ट्रंप यांनी सीरियाच्या नेत्यांवर टीका केली आहे.
'रशियाबरोबरचे आमचे संबंध दुरावले आहेत. शीतयुद्धावेळेपेक्षाही आताचे रशियाबरोबरचे संबंध बिघडले आहेत. असं होण्याचं काहीच कारण नाही. रशियाने आपली अर्थव्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीने आमच्याशी सहकार्य करायला हवं. तसं करणं सोपंही आहे. सर्व देशांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. शस्त्रास्त्रांचा हव्यास कसा कमी होणार'? असं ट्वीट ट्रंप यांनी केलं आहे.
रासायनिक हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सीरियावर लष्करी आक्रमण करण्यासाठी अमेरिका, युके आणि फ्रान्स एकत्र येऊन काम करत आहे.
सीरिया प्रश्नावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ट्रंप यांनी लॅटिन अमेरिकाचा पहिला अधिकृत दौरा रद्द केला. 'सीरियातील घडामोडींना चाप बसावा यासाठी मर्यादित स्वरुपाचे आक्रमण करण्यापेक्षा प्रचंड प्रमाणावर सैन्याद्वारे आक्रमण करण्याचा अमेरिका मनसुबा याद्वारे स्पष्ट झाला आहे', असं बीबीसीच्या बार्बरा प्लेइट अशर यांनी सांगितलं.
ट्रंप यांच्या ट्वीटनंतर प्रशासन सीरियासंदर्भात सज्ज झालं आहे. सीरियातील डूमा येथे नेमकं काय घडलं याचा अमेरिका अभ्यास करत आहे. ट्रंप यांच्या सूचनेप्रमाणे अमेरिकेचं लष्कर कोणत्याही स्वरुपाच्या आक्रमणासाठी तय्यार आहे असं अमेरिकेचं डिफेन्स सेक्रेटरी जेम्स मॅटिस यांनी सांगितलं.
दरम्यान सीरियाबाबत अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही मात्र सर्व पर्याय पडताळून बघण्यात येत आहेत असं व्हाइट हाऊसच्या प्रवकत्या सारा सँडर्स यांनी स्पष्ट केलं.
सीरियातील रासायनिक हल्ल्यांचा बालेकिल्ला असणाऱ्या तळांना लक्ष्य करण्यात येईल असं फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी सांगितलं.
सीरियावर लष्करी आक्रमणाच्या मोहिमेसाठी कुमक पाठवण्याकरता इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे तयार आहेत. अशा कार्यवाहीसाठी संसदेची मान्यता घेणं अनिवार्य आहे. मात्र थेरेसा यांनी याप्रश्नासंदर्भात संसदेचा कौल जाणून घेतलेला नाही.
अमेरिकेच्या नौदलातर्फेस संचालित USS Donald Cook ही युद्धनौका मेडिटेरियन समुद्रात आक्रमणासाठी सज्ज आहे. दरम्यान रशियाच्या युद्धनौकांनी सीरियातील टार्टूस हा तळ सोडल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
काय घडलं होतं डूमात?
राजधानी दमास्कसजवळच्या डूमा हा बंडखोरांच्या ताब्यातील प्रांत आहे. विषारी रसायनांनी भरलेले बॉम्ब सरकारच्या विमानांनी डूमावर डागले असा आरोप विरोधकांनी केला होता. जीवघेण्या अशा या रसायनांमुळे 500 बाधित व्यक्तींवर उपचार करण्यात आल्याची माहिती द सीरिया-अमेरिकन मेडिकल सोसायटी अर्थात (SAMA) दिली आहे. या हल्ल्यात 70हून अधिक जणांनी जीव गमावला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक आरोग्य संघटनेनं या हल्ल्याने बाधित परिसरात जाऊन जखमींवर उपचार करण्यासाठी प्रवेश मिळावा यासाठी अनुमती मागितली आहे.
या हल्ल्यात प्रतिबंधित रसायनांचा वापर करण्यात आला का हे समजून घेण्याकरता 'द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स' (OPCW) चमू लवकरच सीरियात दाखल होणार आहे.
रशियाचं लष्कर असलेल्या भागातून बंडखोरांनी काढता पाय घेतला आहे. डूमा येथे सीरिया आणि रशियाच्या फौजांनी आक्रमण केलं होतं.
रशियाची प्रतिक्रिया काय?
पाश्चिमात्य देशांचा सीरियात हस्तक्षेप वाढावा यासाठी रासायनिक हल्ल्यासारखे गोष्टी सांगितल्या जातात. डूमा येथून जमा करण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये रासायनिक अंश सापडला नसल्याचं रशियाचं म्हणणं आहे.
सीरियाप्रकरणी सदसदविवेकबुद्धी जागृत ठेऊन निर्णय घेतला जाईल, जेणेकरून परिस्थिती नियंत्रणात येईल असं मत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी व्यक्त केलं. रशियाद्वारे सर्व आंतरराष्ट्रीय शिष्टाचारांचं पालन केलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)