पेपरफुटी आणि कॉपी रोखण्यासाठी अल्जेरिया सरकारचा अजब निर्णय

पेपरफुटी तसंच कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी आफ्रिकेतल्या अल्जेरिया या देशात परीक्षेच्या काळामध्ये देशभरातली इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येत आहे.

अल्जेरियामध्ये 20 ते 25 जून या काळात हायस्कूल डिप्लोमा परीक्षा होत आहेत. या परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी, परीक्षा सुरू झाल्यानंतर दररोज तासभर देशातल्या सर्व प्रकारच्या इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.

2016मध्ये या परीक्षांच्या काळात मोठ्या प्रमाणात पेपरफुटी झाली. त्यामुळे कॉपीचं प्रमाणही वाढलं होतं. परीक्षा सुरू होण्यापूर्वी आणि झाल्यावरही ऑनलाइन लीकचे प्रकार यावेळी उघडकीस आल्यामुळे सरकारनं हा निर्णय घेतला आहे.

गेल्या वर्षी प्रशासनानं, इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या सर्व कंपन्यांना सोशल मिडियाची सेवा बंद ठेवण्याची सूचना केली होती. पण, या सूचनेचा पुरेसा परिणाम झाला नाही.

शिक्षण मंत्री नुरिया बेनगॅब्रीट यांनी अॅनाहर या अल्जेरियन वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं की, "परीक्षेच्या संपूर्ण कालावधीत फेसबुक संपूर्ण देशभर ब्लॉक केलं जात आहे. हा निर्णय घेताना सरकारला बराच विचार करावा लागला. परंतु पेपरफुटी होत असल्याचं दिसत असताना आपण हातावर हात ठेवून बसणंही योग्य नाही."

याचबरोबर, देशभरातल्या 2,000 परीक्षा केंद्रांमध्ये इंटरनेट अॅक्सेस असलेली सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणं घेऊन जाण्यास विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना सक्त मनाई करण्यात आली आहे.

तपासणीसाठी प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर्सही बसवण्यात आलेली आहेत. पेपर छपाई केंद्रांमध्येही कॅमेरे तसंच मोबाईल जॅमर्स लावण्यात आले असल्याची माहिती बेनगॅब्रीट यांनी दिली.

या परीक्षेस सुमारे सात लाख विद्यार्थी बसले आहेत आणि परीक्षेचा निकाल 22 जुलै रोजी लागणं अपेक्षित आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)