You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
स्पेन : विश्वासमतात राहॉय पराभूत, सँचेझ होणार नवे राष्ट्राध्यक्ष
स्पेनचे राष्ट्राध्यक्ष मारिआनो राहॉय यांच्याविरोधातल्या अविश्वास प्रस्तावाला बहुमत मिळाल्याने त्यांच्यावर पायउतार होण्याची वेळ आली आहे.
देशातल्या प्रमुख पक्षांपैकी एक असलेल्या सोशलिस्ट पक्षानं राहॉय यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला होता. शुक्रवारी झालेल्या मतदानानंतर सोशलिस्ट पक्षाचे नेते पेद्रो सँचेझ हे राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार आहे.
"आम्ही आमच्या देशाच्या लोकशाहीच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहीत आहोत," असं पेद्रो सँचेझ या मतदानाच्या आधी म्हणाले.
सत्ताधारी पीपल्स पार्टीवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर राहॉय यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. अशा अविश्वास प्रस्तावानंतर पराभूत होणारे राहॉय हे आधुनिक स्पेनमधले पहिलेच नेते ठरले आहेत. ते 2011 पासून ते राष्ट्राध्यक्ष होते.
प्रकरण काय?
पीपल्स पार्टीचे माजी खजिनदार लुइस बार्सेनस यांना 33 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाल्यानंतर भ्रष्टाचाराचं प्रकरण समोर आलं होतं. माद्रिदच्या उच्च न्यायालयानं लुइस यांना लाच, पैशाची अफरातफर आणि करसंबंधित गुन्ह्यांसाठी दोषी ठरवलं होतं.
1999 ते 2005 दरम्यान पक्षासाठी निधी उभारताना चालवण्यात आलेल्या गोपनीय मोहिमेशी हे प्रकरण संबंधित होतं.
बास्क नॅशनल पक्षानं (PNV) अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे. या पक्षाच्या संसदेतल्या पाच जागांना महत्त्वपूर्ण मानलं जात आहे.
कोण आहेत पेद्रो सँचेझ?
मारिआनो रहॉय अविश्वास ठराव हरल्यानंतर स्पेनचे नवे राष्ट्राध्यक्ष पेड्रो सँचेझ होतील असं निश्चित झालं आहे. ते अर्थतज्ज्ञ आणि माजी बास्केटबॉलपटू आहेत.
2014मध्ये जेव्हा ते स्पॅनिश सोशलिस्ट पार्टीचे नेते बनले तेव्हा त्यांच्याबद्दल फारसं कुणाला माहीत नव्हतं. पण त्यांनी आपल्या सहकाऱ्यांचा विश्वास जिंकला आणि पक्षाची घडी व्यवस्थित बसवण्याचा संकल्प केला. सोशलिस्ट पुन्हा सत्तेत येतील, असा विश्वास त्यांनी पक्ष सहकाऱ्यांमध्ये निर्माण केला.
2015 आणि 2016 मध्ये ते सलग दोनदा पराभूत झाले. त्यांनी राष्ट्राध्यक्ष मारिआनो यांना पाठिंबा न दिल्यामुळे त्यांच्यावर पक्षाचं नेतेपद सोडण्याची वेळ आली होती. तेव्हा देशात राजकीय संकट उभं राहिलं आणि सोशलिस्ट पक्षातही वाद होऊ लागले.
पण कालांतराने त्यंनी सोशलिस्ट पार्टीच्या निवडणुकांमध्ये आघाडी मिळवली आणि पुन्हा पक्षप्रमुख झाले. यासोबतच ते राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या शर्यतीत आले.
ज्या पक्षाने अविश्वास ठराव दाखल केला आणि त्यामुळे विद्यमान पंतप्रधानांना पायउतार व्हावं लागलं तर त्याच पक्षाच्या नेत्याला सरकार चालवावं लागतं, असं स्पेनची राज्यघटना सांगते. अर्थात त्या नेत्याला संसदेत बहुमत सिद्ध करावं लागतं. त्यामुळे 46 वर्षीय मवाळ पण महत्त्वाकांक्षी पेद्रो यांची पंतप्रधानपदी वर्णी लागली.
कमालीची गोष्ट म्हणजे, सँचेझ यांच्या पक्षाचे स्पेनच्या संसदेत एक चतुर्थांशपेक्षा कमी सदस्य आहेत, तरीदेखील ते देशाचं नेतृत्व करणार आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)