You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जगातल्या 'सगळ्यांत म्हाताऱ्या' माणसाला बिडी सोडणं जातंय जड
- Author, मोहम्मद अली
- Role, बीबीसी प्रतिनिधी, केप टाउनहून
फ्रेडी ब्लॉम हे क्रिकेटर तर नाहीत, पण त्यांनी आयुष्यात खरीखुरी सेंच्युरी मारली आहे. आणि केवळ शतकच पूर्ण न करता, ते आज 114 नॉट आऊट आहेत. आणि लवकरच ते जगातील सर्वांत वयोवृद्ध म्हणून ओळखले जाण्याची शक्यता आहे.
पण या वयातही हे ब्लॉम आजोबा एक प्रयत्न करत आहेत, तो म्हणजे स्मोकिंग सोडण्याचा.
"मी खूप वर्षांपूर्वीच दारू पिणं सोडलं पण स्मोकिंग अजून सुटत नाहीये. मी रोज दोन-तीन पिल्स ओढतोच."
पिल्स म्हणजे दक्षिण अफ्रिकेतली विडी. एका कागदाची सुरळी बनवून त्यात तंबाखू भरून सिगरेटसारखी ती ओढली जाते.
"मी माझी स्वतःची तंबाखू वापरतो, कारण मी सिगरेट पीत नाही. कधीकधी पिल्स ओढायची खूप इच्छा लागते. मी दरवेळी म्हणतो मी आता स्मोकिंग सोडणार, पण मला माहीत असतं मी स्वतःशीच खोटं बोलतोय. मला वाटतं माझी छातीच मला स्मोकिंग करायला सांगतेय आणि मग मी पिल्स ओढतो. मी यासाठी सैतानाला दोष देतो, तो खूप शक्तिशाली आहे, तोच माझ्याकडून हे काम करून घेतो," असं ते मिश्कीलपणे सांगतात.
हे ऐकल्यावर त्यांच्याकडे पाहिलं की सर्वांत आधी हाच विचार येतो की मग या वयातही ते इतके ठणठणीत कशी आहेत? ते दिसायला उंच आणि धिप्पाड आहेत, चालताना कशाचाही आधार घेत नाहीत. फक्त त्यांच्याशी बोलताना थोडं मोठ्या आवाजात बोलावं लागतं. ही एक गोष्ट सोडली तर त्यांना कसलाही त्रास नाही.
8 मे रोजी ते 114 वर्षांचे झाले. असं म्हटलं जात आहे की ते जगातले सर्वांत वयोवृद्ध व्यक्ती आहेत. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं तपासणी केल्यानंतर त्यांच्या नावे विक्रमाची नोंद होईल.
सप्टेंबर 2017मध्ये जमैकाच्या वॉयलेट मॉस-ब्राऊन यांचं निधन झालं. त्या 117 वर्षांच्या होत्या.
मग दीर्घायुष्याचं रहस्य काय?
"जगातील सर्वांत वृद्ध महिला किंवा पुरुष अशी नोंद करण्यासाठी आम्ही वंशशास्त्रज्ञांची मदत घेतो. त्यांच्याकडून दुजोरा आल्यावर आम्ही त्यांना प्रमाणपत्र देतो," असं गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचं म्हणणं आहे.
तुमच्या या दीर्घायुष्याचं रहस्य काय? असं विचारलं असता ते सहज सांगतात, "विशेष काही नाही. फक्त एकच गोष्ट आहे, देवाच्याच हातात सर्वकाही आहे. त्याच्याकडेच सर्व शक्ती आहेत. आपल्या हातात काही नसतं. मी तर काय केव्हाही वर जाऊ शकतो, पण त्यानेच मला हे आयुष्य दिलं."
"मी एकदम धडधाकट आहे. माझं हृदयसुद्धा व्यवस्थित काम करत आहे. पण माझे पाय आता थोडे थरथरतात. पूर्वी मी जसा चालतायचो, आता तसा चालू शकत नाही," ते खणखणीत आवाजात अफ्रिकन भाषेत बोलत होते.
त्यांना केप टाउनमध्ये जवळपास सगळेच ओळखतात. एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणं त्यांचं आयुष्य आहे. तिथले मंत्री, व्यावसायिक, खेळाडू हे लोक त्यांना भेटण्यासाठी येत असतात.
नुकताच स्थानिक सुपरमार्केट आणि सरकारच्या विभागानं त्यांचा वाढदिवस साजरा केला होता. तेव्हा त्यांनी मोठ्या केक कापला होता.
"लोकांचं प्रेम पाहून छान वाटतं," असं ते सांगतात.
'फक्त एकदाच गेले होते हॉस्पिटलमध्ये'
ब्लॉम यांची पत्नी जेनेटा त्यांच्यापेक्षा 29 वर्षांनी लहान आहे. त्या दोघांचं लग्न होऊन 48 वर्षं झाली आहेत.
"आतापर्यंत ते फक्त एकदाच हॉस्पिटलमध्ये गेले आहेत," त्या सांगतात. खूप वर्षांपूर्वी त्यांना एकदा गुडघेदुखीचा त्रास झाला होता, तेव्हा ते हॉस्पिटलमध्ये गेले होते.
"अनेक जणांना त्यांचं वय किती आहे, याचा अंदाजही येत नाही," असं त्या सांगतात.
त्यांनी ओळखपत्रासाठी अर्ज केला होता तेव्हा त्यांचं खरं वय किती आहे? असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यांच्या जन्माच्या वेळी दक्षिण अफ्रिकेत इंग्रजांचं राज्य होतं. इंग्रजांनी ज्या नोंदी करून ठेवल्या होत्या त्या लंडनला आहेत, असं त्यांना कळलं. मग ब्लॉम यांच्या भाचीने थेट लंडन गाठलं आणि त्यांच्या जन्माचा दाखला मिळवला.
त्यांच्या जन्माचे रेकॉर्ड पूर्व लंडनमध्ये एका कार्यालयात होते. तिथं जाऊन त्यांच्या भाचीनं ते आणले. त्या रेकॉर्ड्सवरून त्यांची जन्मतारीख 8 मे 1904 आहे हे समजलं.
त्यांचा जन्म दक्षिण अफ्रिकेतल्या अॅडलीडमध्ये झाला. काही वर्षांनंतर त्यांचं कुटुंब केप टाउनला गेलं. ते कधी शाळेत गेले नाही, त्यामुळं त्यांना लिहिता वाचता आलं नाही.
पण त्या गोष्टीचं त्यांना फारसं दुःख नाही. उलट ते आपल्या लहानपणीच्या इतर आठवणींमध्ये रमतात.
"लहानपणी मला सकाळी उठून फिरायला जायला आवडायचं. मी गुलेलनं पक्षी मारायचो. कधी जर मी भरपूर पक्ष्यांची शिकार कोली तेव्हा माझाच मला अभिमान वाटायचा," असं ते सांगतात.
सुरुवातीला त्यांनी शेतमजूर म्हणून काम केलं, नंतर ते बांधकाम कंपनीमध्ये गवंडी म्हणून काम करू लागले.
"आम्ही पूर्ण केप टाउनमध्ये भिंती बांधल्या आहेत. मी खूप वर्षं तिथं काम केलं. माझ्या वयाची 80 वर्षं पूर्ण झाल्यावरही मी हे काम करत राहिलो," असं ते सांगतात.
त्यांनी खूप मोठा काळ आपल्या डोळ्यांनी पाहिला आहे. ते ज्या भागात राहतात त्या भागात गुन्हेगारीचं प्रमाण वाढल्याचं ते सांगतात.
'त्या काळी आतासारखी गुन्हेगारी नव्हती'
"तो काळ चांगला होता. आताच्या सारखं तेव्हा खून आणि दरोडे नव्हते पडत. कुणाला काही त्रास होत नव्हता," ते सांगतात.
"तुम्ही दिवसभर झोपून राहिला आणि झोपेतून जागं झाल्यावर घरातल्या सर्व वस्तू पाहिल्या तर त्या जागच्या जागी दिसायच्या. पण आता परिस्थिती बदलली आहे," असं ते सांगतात.
इंग्रजांच्या राजवटीत जन्मलेल्या ब्लॉम यांना आम्ही विचारलं की तेव्हाच्या आणि आताच्या राजकारणात काय फरक पडला आहे? ते सांगतात, "आम्हाला कामापासून फुरसतच नव्हती मिळत. त्यामुळं राजकारणातलं फारसं काही माहीत नव्हतं."
त्या काळातल्या राजकारणाचा आपल्या आयुष्यावर काही प्रभाव नव्हता, असं जरी त्यांना वाटत असलं तरी एक गोष्ट ध्यानात घेण्यासारखी आहे. ती म्हणजे त्यावेळच्या मजूर आणि कष्टकरी वर्गाला राजकारणाशी काही घेणं देणं नसायचं.
त्या काळात शेताचे मालक इंग्रज असतील तर मजुरांना त्यांचा फार त्रास नव्हता. त्यांना एकजूट होण्याची किंवा संघटीत होण्याची बंदी होती.
त्यांच्या पत्नी जेनेटा यांनी सांगितलं, "खाण्यापिण्याची काही तक्रार नसायची आणि ते काही विशेष खात नाहीत. त्यांना रोजच्या जेवणात मटण आवडतं पण ते भाज्या देखील भरपूर खातात."
ब्लॉम यांना सकाळी साडेचारला उठून काम करण्याची सवय होती पण आता ते निवांत उठतात. त्यांची सर्व कामं ते स्वतःच करतात. त्यांना शूज घालण्यासाठी थोडा त्रास होतो इतकंच. दाढी करण्यासाठी ते त्यांच्या नातवाची मदत घेतात.
"मी आता काही फारसं काम करत नाही. मला शिडीवर पण चढता येत नाही. मी दिवसभर घरीच बसून असतो. पण टीव्हीवर येणारे 'फालतू' कार्यक्रम पाहायला माझ्याकडे वेळ नसतो," असं ब्लॉम सांगतात.
टीव्ही पाहण्याऐवजी ते घराबाहेर बसतात, तंबाखू काढतात, कागदाची सुरळी करून त्यात तंबाखू भरतात आणि पुन्हा एकदा त्या 'सैतानाच्या अमलाखाली' येऊन पिल्सचा एक झुरका मारतात.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)